"मी 'तसं' नव्हे 'असं' म्हणालो..."; काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत पवारांचं स्पष्टीकरण

    09-May-2024
Total Views |
 
Sharad Pawar
 
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असं मी बोललेलो नाही. मी बोललो की, त्यामुळे विचारधारा एक असल्याने आणि एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही पटल्यामुळे त्यापद्धतीने आम्ही काम करत आहोत, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे. निवडणूकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असं वक्तव्य पवारांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
शरद पवार म्हणाले की, "सरसकट प्रादेशिक पक्ष नाही पण काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या जवळ असलेले काही पक्ष आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करत आहेत. गांधी, नेहरूंची विचारधारा आणि अनेक वर्षांचा एकत्र काम करण्याचा अनुभव यामुळे हळूहळू आपण अधिक एकत्र काम करावं, अशी भावना आहे."
 
हे वाचलंत का? -  "मी साहेबांचा मुलगा असतो तर..."; अजित पवारांची खदखद
 
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असं मी बोललेलो नाही. मी बोललो की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जवळपास २००१ पासून आजपर्यंत एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्ष एकत्र होते. यावेळीसुद्धा अनेक मतदारसंघ असे आहेत जिथे काँग्रेसचा उमेदवार होता तिथे राष्ट्रवादी सहाकार्य करत होती आणि जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार होता तिथे काँग्रेस सहकार्य करत होती. त्यामुळे विचारधारा एक असल्याने आणि एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही पटल्यामुळे त्यापद्धतीने आम्ही काम करतो आहे," असे ते म्हणाले.
 
तसेच उद्धव ठाकरेदेखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणी आमच्यासारखीच आहे, असेही ते म्हणाले होते. याबाबत बोलताना आता शरद पवार म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मी काहीही बोललो नाही. शिवसेना ही सहकारी म्हणून काम करते पण त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे," असेही ते म्हणाले.