‘उत्तर मुंबई’ला ‘उत्तम मुंबई’ करण्याची पीयूष गोयल यांची गॅरेंटी

    09-May-2024   
Total Views |
 piyush goyal
 
भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते, देशाचे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री, माजी रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, वाणिज्यमंत्री आणि अशाच महत्त्वपूर्ण खात्यांचा यशस्वीपणे पदभार सांभाळलेले पीयूष गोयल. मूळचे मुंबईकरच असलेल्या गोयल यांना यंदा भाजपकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ‘उत्तर मुंबई’ला ‘उत्तम मुंबई’ करण्याचा संकल्प गोयल यांनी व्यक्त केला आहे. तेव्हा नेमकी उत्तर मुंबईकरांसाठी पीयूष गोयल यांची ‘गॅरेंटी’ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी ऋतुवल नवले यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
 
तुम्ही 35 वर्षांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात आहात. केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदेही भूषवली. भाजपसाठी ‘संकटमोचक’ म्हणून तुम्ही कायम उभे राहिलात. तुमच्या मातोश्रीसुद्धा माटुंग्यामधून आमदार होत्या. त्यांच्यासाठीही तुम्ही काम केलं आहे. मात्र, स्वतःसाठी मत मागण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या अनुभवाविषयी काय सांगाल?
 
खरंच खूप छान अनुभव आहे. मी पंतप्रधान मोदीजींचा आभारी आहे की, त्यांनी मला ही संधी दिली. पंतप्रधानांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेमध्ये राहून अधिक संवेदनशीलतेने अधिक चांगले काम करण्याची मला शक्ती मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
 
मोदींच्या विकासाची ‘गॅरेंटी’ घेऊन भाजप प्रचारात उतरली आहे. मोदींचे शिलेदार म्हणून उत्तर मुंबईतील मतदारांना तुम्ही कोणती गॅरेंटी देणार आहात?
 
जेव्हा मी या मतदारसंघात आलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की, या भागात मोठे आधुनिक रुग्णालय नाही. पण आता, या भागात ४०० बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले आहे. त्यांचा  १००० बेडपर्यंत विस्तार करण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे गोराईमध्येही नर्सिंग होम नव्हते. तेही सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेची दोन स्थानके आधुनिक करण्यात आली आहेत, उर्वरित दोन स्थानकांचेही लवकरच आधुनिकीकरण करण्यात येईल. गोरेगावपर्यंत असलेला उपनगरीय रेल्वेचा हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत आणण्यासाठी काम सुरु आहे. तसेच कोकणात जाण्यासाठी बोरिवलीवरून थेट रेल्वेगाड्या असतील. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांमध्ये राहणारेही अनेक नागरिक आहेत. त्यांचे पुनर्वसन होऊन, त्यांना पक्की घरे मिळतील. जिथे ते राहत आहेत, त्याच ठिकाणी त्यांचे पुनर्वसन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार कोटी नागरिकांना आजपर्यंत पक्की घरे दिली आहेत. आणखीन तीन कोटी नागरिकांना पक्की घरे देण्याचा त्यांचा मानस आहे. देशाच्या प्रत्येक व्यक्तीला पक्के घर मिळेल, ही मोदीजींची गॅरंटी आहे आणि हीच गॅरंटी आम्ही उत्तर मुंबईतही लागू करू!
 
गोपाळ शेट्टी यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम गेल्यावेळी उत्तर मुंबई मतदारसंघातून केला होता. यावेळेस काँग्रेसने तुमच्याविरोधात भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. फारशा परिचित नसलेल्या पाटील यांच्या चेहर्‍यामुळे तुमच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?
 
निवडणूक ही आमच्यासाठी फक्त निवडणूक नसते. जनतेमध्ये जाण्याची, जनतेच्या समस्या समजून घेण्याची आणि त्यांच्यासोबत नातं जोडण्याची एक संधी असते. लोकांमध्ये गेल्याने त्यांच्याशी जोडले गेल्याने आपल्याला नवीन कल्पना सुचतात. जर मी लोकसभा निवडणूक लढवत नसतो, तर माझ्या लक्षात आलेच नसते की, या मतदारसंघात मोठे रुग्णालय नाही. मला झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देणे किती महत्त्वाचे आहे, हे सुद्धा लक्षात आले नसते. माझ्यासाठी तर हे एक धार्मिक यात्रेप्रमाणे आहे. निवडणूक तर जिंकूच, पण लोकांची भेट घेऊन माझेही मनोबल वाढत आहे.
 
२०१४ आणि २०१८ यानंतर आताच्या २०२४ च्या निवडणुकीत देशात आणि विशेषत्वाने मुंबईत नेमका काय फरक तुम्हाला जाणवतो?
 
मला वाटतं की, नागरिकांनी मोदीजींचा १० वर्षांचा कार्यकाळ पाहिला आहे. अनुभवला आहे. त्यामुळे मोदीजींची विश्वसनीयता आणि लोकप्रियता आणखीन वाढलेली दिसते.
 
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल?
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत एक विकसित देश नक्की होणार. २० मे रोजी जर तुम्ही मतदान न करण्याची चूक केलीत, तर देशासाठी हे नुकसान आहे. म्हणूनच माझी सर्व मतदार बंधू-भगिनींना विनंती आहे की, शत प्रतिशत मतदान करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आशीर्वाद द्या. पुढील पाच वर्षं सुखी आणि सुरक्षित जीवनासाठी मोदी आवश्यक आहेत.

ऋतुवल नवले

आबासाहेब गरवारे महाविद्यालयातुन पदवी आणि डी. बी. एस. डेहराडूनहून एम. ए. (जर्नालिजम आणि मास कम्युनिकेशन ) पर्यंत शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणुन कार्यरत. राजकारण, इतिहास, खेळ, या विषयांत रस. दुर्ग भ्रमंती, पर्यटन आणि चित्रपटांची आवड.