"मी साहेबांचा मुलगा असतो तर..."; अजित पवारांची खदखद

    09-May-2024
Total Views |

Ajit Pawar 
 
पुणे : मी जर पवार साहेबांचा मुलगा असतो तर मला नक्कीच संधी मिळाली असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून मला डावलण्यात आलं, अशी खदखद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली. गुरुवारी शिरुर येथे महायूतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मधल्या काळात आम्ही सर्वांनी पवार साहेबांना विनंती केली की, तुम्ही आता ८० वर्षांच्या पुढे गेले आहात. आम्हाला परवानगी द्या, आम्ही चांगलं काम करु. त्यावेळी साहेबांनी मला सांगितलं की, ठीक आहे अजित मी आता राजीनामा देतो. मलाही हे सगळं कुणावर तरी सोपवायचं आहे. तुम्ही हे सगळं चालवा."
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! उबाठा गटाच्या नेत्याला तडीपारीची नोटीस
 
"लोकांचं साहेबांवर प्रेम असल्याने त्यांना वाटतं की, दादांनी या वयात साहेबांना सोडायला नको होतं. पण मी त्यांना सोडतच नव्हतो. मी त्यांना फक्त म्हणालो की, तुम्ही घरी बसा. तुमची तब्येत सांभाळा आणि आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही ३२ वर्ष तुमचं ऐकत आलो आहोत. तुम्ही म्हणाल ते आम्ही करत आलो," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "३०-३२ वर्षांत मी कधीही पवार साहेबांचा शब्द मोडला नाही. पण आता साठीच्या पुढे गेल्यावर किती दिवस ऐकायचं. आम्हाला कधीतरी संधी मिळेल की, नाही? त्यामुळे आता भावनिक होऊ नका. पवार साहेब आमचं दैवत आहेत यात दुमत नाही. पण प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला हवी. मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला नक्कीच संधी मिळाली असती. परंतू, फक्त मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी दिली नाही. हा कसला न्याय?," असा सवाल त्यांनी केला.