रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतील राष्ट्रवाद

    08-May-2024   
Total Views |
 
ravindra
 
एखाद्या कवितेला राष्ट्र गीताचा दर्जा मिळतो काय आणि त्या देशाच्या सीमेत राहणारी सर्व लोक त्या गीताचा सन्मान करतात. राष्ट्रगीत सुरु होताच हातातील काम बाजूला टाकून उभी राहतात. राष्ट्रगीत कोणत्याही वेळी गाऊ किंवा वाजवू शकत नाही, त्यासाठीही नियम आहेत. खरतर हे मूळ बंगाली भाषेतलं गीत. भारतो भाग्यो बिधाता या नावाने रवींद्रनाथ टागोर यांनी डिसेंबर 1911 मध्ये लिहिलेले. या संपूर्ण कवितेतलं एक कडवं आपण राष्ट्रगीत म्हणून गातो. साधारण ५२ सेकण्ड या गीताला लागतात. पण त्यापुढचे गीत काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. तसेच रवींद्रनाथांच्या लेखनशैलीविषयी मला बोलायचं आहे.
पुढचं कडवं आहे,
अह रह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगण ऐक्य विधायक जय हे, भारत भाग्यविधाता
पहिल्या कडव्यात बंगाल सिंध प्रांतापासून उत्कल म्हणजे उडिया ते द्रविड पर्यंत सर्व स्थळांचे ऐक्य दिसते तर या कडव्यात संप्रदाय आणि संस्कृतीचे ऐक्य दिसून येते. टागोरांची कविता खरी राष्ट्रवादी. राष्ट्राबद्दलचा आदर त्यांच्या शब्दाशब्दातून ओसंडून वाहतो. केवळ आपले भारताचेच नाही तर बांगला देशाचे राष्ट्रगीताची त्यांच्याच कवितेतून घेतले आहे. आमार सोनार बाङ्ला, आमि तोमाय भालबासि। बरं ही गीते मुळात लिहिलीत बंगाली भाषेत तेव्हा भारत आणि बांगलादेशचे ठीक. पण श्रीलंकेचे राष्ट्रगीत सुद्धा त्यांच्याच कवितेतून प्रेरणा घेऊन लिहिले गेले आहे. पुढच्या कडव्यात तेदेशाची काळाशी असलेली बांधिलकी स्पष्ट करतात.
पतन अभ्युदय बंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुख रित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
भारत हा केवळ देश नाही तर सारथी आहे. सतत फिरत असलेली चाके लावलेला सारथी. जो आपल्याला प्रगतीच्या मार्गावरून घेऊन सतत प्रवास करत आहे. हा प्रवास त्रासदायक, क्लेशदायक आहे पण याला छेडणारा हा शंखनिनाद करत आपण पतगती करायला हवी, आपला मार्ग निष्कलंक करायला हवा. आता प्रश्न आहे, भारताचे हे वर्णन कोणत्या काळातले आहे. भारत १९४७ साली स्वतंत्र झाला तरीही ही कविता टागोरांनी मात्र ११ डिसेम्बर १९११ या दिवशी लिहिलीय. त्यावेळी देश असाच होता की! अंधकार माजला होता. हेच वर्णन पुढच्या कडव्यात आहे.
घोर तिमिर घन निबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
देश असा मूर्च्छित झाला आहे. जागृतावस्था येणे तातडीने गरजेचे आहे.
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
पण तरीही तू भाग्यविधातच आहेस. या गांजलेल्या देशाला सकारात्मक नजरेने भाग्यविधाता म्हणणे टागोर भविष्य पाहू शकत होते का? की ते देशाचे मोल जाणून होते? काहीही असो. त्यांच्या प्रत्येक ओळीत आशा भरून राहिली आहे. ते पुढे म्हणतात,
रात्र प्रभातिल उदिल रवि च्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
भारत भाग्य विधाता.
टागोरांची ही कविता संस्कृतचा मोठा प्रभाव असलेली आहे, तेव्हा संपूर्ण भारताला सर्व ज्ञातीपंथीयांना, राज्यांना एकत्र सांधणारी आहे.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.