पवार काँग्रेसला शरण

    08-May-2024
Total Views |

Sharad Pawar (2) 

शरद पवार कोणतेही वक्तव्य करताना हजारवेळा विचार करतात. कारण, त्याचे पडसाद देशभर उमटतात, असे त्यांचे कार्यकर्ते अगदी अभिमानाने सांगतात. अशावेळी ऐन निवडणुकीच्या हंगामात पक्ष विलीनीकरणाचा विषय छेडून पवारांनी कार्यकर्त्यांसह अन्य राजकीय पक्षांनाही बुचकळ्यात टाकले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, “पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारतील. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत.” म्हणजे, याचाच अर्थ बारामतीचा निकाल काय असेल, याचा अंदाज पवारांना आलेला दिसतो. एकेकाळी बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा. ते बोट ठेवतील, तो उमेदवार विजयी, अशी इथली समीकरणे. गेल्या 20 वर्षांत मात्र अजित पवारांनी या मतदारसंघात स्वतःची यंत्रणा उभी करीत, वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे यंदा ‘पवार विरुद्ध पवार’ लढतीत, सर्व समीकरणे अजितदादांच्या बाजूने फिरलेली दिसली. बारामती हातून निसटल्याचा अंदाज आल्यामुळेच शरद पवार उद्विग्न झाले असून, पक्षातील उर्वरित लोकप्रतिनिधी साथ सोडून जाण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे. त्यामुळेच लेकीच्या राजकीय भविष्यासाठी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार त्यांच्या मनात रुंजी घालताना दिसतो. वास्तविक, विलीनीकरणाची चर्चा त्यांच्यासाठी नवी नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसने त्यांच्यासमोर पक्ष विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी पवारांनी महाराष्ट्राची कमान सुप्रिया सुळेंच्या हाती देण्याची अट घातल्यामुळे बोलणी फिस्कटली. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे ते पुन्हा काँग्रेसला शरण जाऊ इच्छितात. परंतु, त्यांच्याप्रमाणे इतर सगळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारतील, हा दावा हास्यास्पदच. कारण, काँग्रेसकडे प्रादेशिक पक्षांचा ओढा असता, तर ‘इंडी’ आघाडी मजबूत झाली असती, पण चित्र विपरीत. कित्येक राज्यांत प्रादेशिक पक्ष भाजपसोबत किंवा स्वतंत्र लढताहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा आशावाद फोल ठरावा. निकालानंतर उरसीसुरली ‘इंडी’ आघाडी शाबूक राहील, याचीच शाश्वती नाही. त्यामुळे काँग्रेससोबत प्रादेशिक पक्षांनी जाणे हे पवारांचे दिवास्वप्नच!
पुन्हा मानापमान नाट्य
 
 
एखादे ईप्सित साध्य करण्यासाठी शत्रूशीदेखील गोड बोलावे लागते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक उमेदवारांनी या सूत्राचा अवलंब केलेला दिसतो. उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड मात्र त्याला अपवाद. विरोधकांनी चारही बाजूंनी घेरलेले असताना, पक्षातील साथीदारांना सोबत घेण्याऐवजी त्यांचा पाणउतारा करण्यातच त्या धन्यता मानतात, अशी चर्चा. उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी हायकमांडच्या दूतांनीही ही बाब अचूक हेरली. बोरिवलीतील या कार्यक्रमात भाषण करताना गायकवाड यांनी उबाठा गटाच्या विनोद घोसाळकर यांना मदतीसाठी (उत्तर मध्य मुंबईत) गळ घातली. परंतु, शेजारी बसलेल्या चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे पाहिलेदेखील नाही. किंबहुना, भाषणात त्यांचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे ते कार्यक्रमस्थळावरून तडकाफडकी निघून गेले. उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवताना गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचे बलाढ्य आव्हान असले, तरी पक्षांतर्गत विरोधाची धार त्याहून अधिक तीव्र आहे. त्यावर साखरपेरणीद्वारे मात करण्याची गरज असताना, त्यांच्या वाणीत अजूनही मृदूपणा आलेला नाही. त्यामुळेच भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, अमरजीत मनहास यांनी त्यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवलेली दिसते. हायकमांडने गेल्यावर्षी भाई जगताप यांची खुर्ची काढून गायकवाड यांना मुंबईच्या अध्यक्षपदावर बसवले. तेव्हापासून या दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. भाईंना पुन्हा खुर्चीची लालसा, तर वर्षाताईंना खुर्ची जाण्याची भीती. यावरून सुरू झालेले कुरघोडीचे राजकारण एकमेकांचा काटा काढण्यापर्यंत पोहोचले आहे. त्यात हंडोरे यांच्यासारख्या दलित चेहर्‍याला अपमानित केल्याचा राग अनेकांच्या मनात आहे. दुसरीकडे नसीम खान यांच्या मदतीने मुस्लीम मतांच्या जोरावर विजयी होण्याची स्वप्ने वर्षा गायकवाड यांना पडू लागली आहेत. परंतु, एमआयएमचे उमेदवार रमजानअली चौधरी यांचे वडील आणि नसीम खान यांची जवळीक त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावणारी आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा मनमानी कारभार जसा मुंबई काँग्रेसच्या पतनाला कारणीभूत ठरला, तसाच त्यांचा स्वभावधर्म उत्तर मध्य मुंबईतील पराभवाला कारणीभूत ठरेल, असे अंतर्गत चित्र आहे.

- सुहास शेलार