विभाजनवादी काँग्रेसी मानसिकता

    08-May-2024
Total Views |

Sam Pitroda (1)

अमेरिकेतील तथाकथित वारसा करावरून काँग्रेसला अडचणीत आणणार्‍या सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा अवमानकारक असे वर्णद्वेषी विधान केले. भारतीयांना त्यांच्या वर्णावरून त्यांनी चिनी, आफ्रिकी असे संबोधले आहे. पित्रोदा यांनी आपली विभाजनाला खतपाणी देणारी काँग्रेसी मानसिकताच दाखवून दिली आहे. भारतीयांच्या विविधतेतील एकता या शक्तिस्थळावरच त्यांनी प्रहार करण्याचे पाप त्यांनी केले आहे. त्यामुळे आता सुज्ञ भारतीय मतदारच मतपेटीतून याचे सडेतोड उत्तर काँग्रेसला दिल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.
 
 
अमेरिकेतील वारसा कराबाबत राहुल गांधी यांचे सल्लागार आणि आता राजीनामा दिल्यामुळे ‘ओव्हरसीज काँग्रेस’चे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी गेल्या महिन्यात वादग्रस्त विधान केले होते. त्याच पित्रोदांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले. ‘द स्टेट्समन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पित्रोदा यांनी भारताचे वर्णन ‘वैविध्यपूर्ण देश - जिथे पूर्वेकडील लोक चिनी दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेतील लोक कदाचित गोरे दिसतात आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकींसारखे दिसतात,’ असे म्हणत भारतीयांच्या दिसण्यावर निंदनीय शब्दांत भाष्य केले. नेहमीप्रमाणेच पित्रोदा यांच्या याही वक्तव्यावरुन काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले. भारताच्या विविधतेबाबत त्यांनी दिलेली उपमा अत्यंत चुकीची आणि अस्वीकारार्ह आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आणि नंतर पित्रोदा यांनीच स्वत: आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचीही बातमी येऊन धडकली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मात्र पित्रोदा यांच्या या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. ‘आम्ही भारतीय वेगवेगळे दिसत असून, आम्ही एक वैविध्यपूर्ण देशाचे रहिवासी आहोत. मात्र, आम्ही सर्व भारतीय एक आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी पित्रोदांच्या या वर्णद्वेषी टिप्पणीचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला. त्याचवेळी आपल्या देशाबद्दल थोडी अधिक माहिती घ्या, असा सल्ला भाजपने त्यांना दिला.
 
 राहुल गांधी यांचे सल्लागार म्हणून पित्रोदा यांची भारतीय राजकारणात ओळख. राजीव गांधी यांचेही तेच सल्लागार होते. मात्र, आता विभाजनवादी काँग्रेसी मानसिकता त्यांच्या विधानांतून सातत्याने पाझरताना दिसते. वर्णद्वेषी आणि विभाजनवादाला प्रोत्साहन देणारी त्यांची मानसिकता, ‘फूट पाडा आणि राज्य करा,’ या ब्रिटिश वसाहतवादी मानसिकतेशी साम्य साधणारीच. ब्रिटिशांनी याच पद्धतीने अखंड भारताचे तुकडे पाडत देशावर राज्य केले. काँग्रेसीजन पुन्हा एकदा भारताचे नव्याने विभाजन करण्याचे षड्यंत्र आखत आहेत. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या नावाखाली देशामध्ये विभाजनवादी फुटीचे विचारच पेरण्याचेच पाप केले. ज्या ज्या भागांतून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा एक आणि दोन गेली, त्या त्या भागात हिंसाचार झाला. राहुल यांना सल्ला देण्याचे जे काम पित्रोदा करतात, त्यांनी तर आता त्याही पुढे जात सरळसरळ वर्णद्वेष करणारे वक्तव्य करत, देशातील वेगवेगळ्या प्रांतातील नागरिकांना लक्ष्य करत, वेगळेपणा निलाजरेपणाने दाखवून दिला आहे.
  
भारतीयांची संभावना ‘चिनी’ तसेच ‘आफ्रिकी’ करणार्‍या पित्रोदांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. काँग्रेसला निवडणुकीत अपेक्षित यश मिळत नसल्याच्या वैफल्यातून पित्रोदा यांनी असे विधान केले का? म्हणूनच काँग्रेसला देशाचे नव्याने विभाजन करायचे आहे का? देशातील नागरिक भारतीय म्हणून एक होत असताना, पुन्हा त्यांच्यात भाषा, वर्ण, प्रांत यावरून भेदभाव करायचे आहेत का? गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा ‘दक्षिण भारतीय’ आणि ‘उत्तर भारतीय’ असा थेट भेद काँग्रेसने केला आहेच. दक्षिणेतील काही राज्यांत आजही उत्तर भारतीयांबद्दल तुलनेने ममत्व कमी असल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते वाढीस लागावे, यासाठी ‘काशी तमिळ संगम’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, काँग्रेसने पुन्हा एकदा उत्तर आणि दक्षिण अशी स्पष्ट रेषा आखली. यावेळी दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला लक्षणीय यश मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. भाजपचा जनाधार तेथे वाढीस लागलेला आहे. म्हणूनच पित्रोदा यांनी दक्षिणेतील नागरिकांची संभावना ‘आफ्रिकी’ म्हणून केली असावी का?
 
पित्रोदा यांचे वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद असेच आहे. ज्या अमेरिकेत पित्रोदा वास्तव्यास आहेत, तेथे वर्णद्वेषी टिप्पणी करणे, हा मोठा अपराधच मानला जातो. ‘ब्लॅक’ हा शब्दही तेथे उच्चारणे दंडनीय. मात्र, अमेरिकी पित्रोदा सर्व भारतीयांची त्यांच्या दिसण्यावरून वर्णद्वेषी अवमानास्पद अशी विभागणी करतात. काँग्रेसने जात, धर्म आणि भाषेच्या आधारे भारतीयांचे विभाजन करण्याचे पाप फार पूर्वीच केले आहे. आता पित्रोदा वर्णद्वेषी विभाजनाला खतपाणी देत आहेत. ‘भारतीय विरुद्ध भारतीय’ असेच हे घातकी विभाजन. ‘मोहब्बत की दुकान’ चालवणार्‍या काँग्रेसचा हाच खरा चेहरा. काँग्रेस ‘मोहब्बत’चे नव्हे, तर ‘नफरत आणि वर्णद्वेषा’चे करणारे दुकान चालवते. मुस्लिमांना सर्वाधिक सवलती दिल्या जातील, असे आश्वासन देत काँग्रेसने त्याची एक झलक जाहीरनाम्यात दाखवली. भारतीयांचे पुन्हा जातीपातीत विभाजन करण्यासाठीच, जातनिहाय जनगणना काँग्रेसला हवी आहे. संपत्तीचे पुनर्वितरण काँग्रेसला धर्माच्या आधाराने हवे आहे.
 
देशाची फाळणी धर्माच्या आधाराने झाली, हे काँग्रेस मान्य करत नाही. म्हणूनच, ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटनेत दुरुस्ती करून त्यात घुसवण्यात आला. फाळणीचा आधार हा धार्मिक असल्यानेच, मुस्लिमांना आरक्षण देण्याचे घटनाकारांनी अमान्य केले. हे वास्तव लपवून ठेवत, काँग्रेस मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गातून कर्नाटक तसेच तेलंगणात आरक्षण देते.
पुन्हा सत्तेवर आल्यावर भाजप संविधान बदलेल, असा अपप्रचारही काँग्रेस करत आहे. प्रत्यक्षात घटना कोणी आणि का बदलली? हे सत्य जनसामान्यांना माहिती आहे. संपत्तीचे केंद्रीकरण रोखण्यासाठी काँग्रेसला हिंदूंच्या संपत्तीचे पुनर्वितरण करायचे आहे. त्यासाठी ते सर्वेक्षण करणार आहेत.

ही घटनेची पायमल्ली नव्हे काय? काँग्रेसने आजवर नेहमीच घटनेचा अनादर करत भारताचे तुकडे करण्याचेच पाप केले. वंश, जाती, धर्म, श्रीमंत, गरीब, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशी असे विभाजन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. त्यासाठीच ‘तुकडे तुकडे गँग’ला पाठिंबा दिला. कन्हैय्याकुमारला उमेदवारी दिली. घटनाकारांच्या विरोधात जात मुस्लिमांना आरक्षण दिले. ही वस्तुस्थिती असतानाही सोनिया गांधी या भाजपवर विभाजन केल्याचा ठपका ठेवत, संविधानाचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करतात. ही विसंगतीच सर्व काही स्पष्ट करणारी ठरते.