भस्मीभूत होई हा नश्वर देह!

अंतिम संस्कार (भाग-5) वैदिक षोडश संस्कार-16

    08-May-2024
Total Views |

Antim


वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तँ शरीरम्।
ओ3म् क्रतो स्मर क्लिबे स्मर कृतं स्मर ॥ (यजुर्वेद-40/15)
 
 
अन्वयार्थ
 
(वायु:) जीवात्मा हा (अनिलम् = अन् + इलम्, इलारहितम्) पार्थिव किंवा अभौतिक आहे. तसेच तो (अमृतम्) अमर आहे. (अथ) त्याबरोबरच (इदं शरीरम्) हे शरीर मात्र (भस्मान्तम्) भस्मीभूत होणारे आहे. यासाठी (हे क्रतो) हे क्रियाशील जीवात्म्या, तू (ओम् स्मर) परमपिता परमेश्वराचे मुख्य नाव ओम्चे स्मरण कर! (क्लिबे स्मर) आपल्या स्वतःच्या सामर्थ्याची आठवण ठेव आणि (कृतं स्मर) आपल्या केलेल्या मागील चांगल्या- वाईट कर्मांचे स्मरण कर!
 
विवेचन
 
मृतदेहास स्मशानभूमीत आणल्यानंतर अनुभवी सज्जनांनी उत्तम प्रकारे चिता रचावी. समिधा (लाकडे) व्यवस्थितपणे आडवे व उभे रचून घेण्यासंदर्भात काळजी घेण्यात यावी. चिता रचताना डोक्याकडील भाग किंचित उंचावर, तर पायाकडील भागात उतार राहील, याची दक्षता घेण्यात यावी. मृतदेहास सरणावर ठेवत असताना त्याचे डोके हे उत्तर-ईशान्य किंवा उत्तर- वायव्य या दिशेकडे, तर पाय हे दक्षिण नैऋत्य किंवा दक्षिण आग्नेय असावे. या दिशांचे कारण म्हणजे उत्तर दिशा ही ‘उत् + तर’ म्हणजेच उत्तम प्रकारे तारणारी मानली जाते. ती अग्निप्रधान आहे, तर दक्षिण दिशा ही मात्र अग्निरहित आहे. शरीर अग्नीला समर्पित होत असताना अग्नीची तेजस्विता मृतकाच्या आत्म्याला प्राप्त होवो, ही यामागची भावना! कर्मानुसार आत्मा कोणत्याही स्थितीला प्राप्त होवो, पण आम्हां सर्वांची भावना मात्र त्याच्याकरिता तेज प्रदान करणारीच असावी.
 
 
पाय हे दक्षिणेकडे कशासाठी? तर ही दिशा शांततेची प्रतीक आहे. पायांनी आजपर्यंत गतिशीलता अंगीकारलेली आहे. आत्म्याची गती ही देखील शांततेला प्राप्त होणारी ठरो, ही यामागची भावना. तसेच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या चुंबकवृत्तीमुळे देह लवकर जळतो, हे या मागचे वैज्ञानिक कारण! देहास अशा प्रकारे चितेवर ठेवल्यानंतर त्यावर व्यवस्थितपणे समिधा (लाकडे) रचून जिथे-जिथे रिकामी जागा असेल, तिथे चंदनाचे चूर्ण, फोडलेली सुकी नारळे, तुपात भिजवलेले सुतळीचे बोळे, इत्यादी ठेवण्यात यावे, जेणेकरून चहुबाजूंनी अग्नी प्रज्वलित होणे सोपे जाईल. चिता पूर्णपणे वरच्या भागावर मध्यभागी लहान चंदनकाष्ठ, चूर्ण, कापूर इत्यादी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात यावे. त्यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र, ज्येष्ठ कन्या अथवा निकटस्थ नातेवाईक यांनी लांबट (काठीला बांधलेला) चमचा घेऊन त्यात कापूर ठेवून तो प्रज्वलित करावा.
 
 
नंतर डावीकडून प्रदक्षिणा घालत चितेच्या वरील बाजूस मध्यभागी तो अग्नी समर्पित करावा. त्यानंतर ‘ओम् अग्नये स्वाहा, ओम् सोमाय स्वाहा, ओम् लोकाय स्वाहा, ओम् अनुमतये स्वाहा, ओम स्वर्गाय लोकायत स्वाहा!’ या पाच मंत्रांनी तुपाच्या आहुत्या देण्यात याव्यात. या पाच मंत्रांमध्ये अग्नी, सोम, लोक, अनुमती व स्वर्ग यांच्या नावाने देण्यात आलेल्या, म्हणजे त्या दिव्यतत्वांचे पुण्यस्मरण होय. अग्नी आणि सोम यांचा वैदिक साहित्यात खूप कनिष्ठ संबंध आहे. ‘अग्निषोमात्मकं जगत्!’ म्हणजेच हेच जग अग्नी व सोम या दोन शक्तींनी परिपूर्ण आहे. अग्नी हे तीव्रतेचे प्रतीक आहे, तर सोम हे सौम्यता किंवा शांततेचे! विज्ञानाच्या परिभाषेत ‘पॉझिटिव्ह’ किंवा ‘निगेटिव्ह’ असे म्हणू शकतो. हे जगदेखील अग्नी व सोम (पाणी) या दोन्हींचाच विस्तार आहे. म्हणूनच तिसर्‍यांदा म्हटले आहे - या जगासाठी अर्थात लोकांसाठी स्वाहा! अग्नी व सोम यांच्या गुणांमुळेच मनुष्य ज्या लोकांमध्ये सर्वत्र विचरतो व जीवन जगू शकतो. या जगातील नियमांच्या अनुकूल राहणे यालाच ‘जगणे’ म्हटले आहे. यासाठीच ‘अनुमतये.... अनुकूलतेसाठी स्वाहा!’ आणि शेवटी सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती या पाच गोष्टींचा बोध या आहुतीतून होतो.
 
 
विशेष म्हणजे, अग्नी प्रज्ज्वलित करताना चितेच्या खालून किंवा मध्यभागातून कधीही पेटवू नये, तर तो वरच्या बाजूनेच पेटवावयास हवा. कारण, खालच्या बाजूने अग्नी पेटवल्यास चिता ढासळण्याची व जळणारे प्रेत खाली येण्याची शक्यता असते. म्हणून अग्नी पेटत पेटत वरून खाली यावा, हेच अतिशय सोईस्कर ठरते. अग्नी चांगल्या प्रकारे पेटल्यानंतर क्रमशः 17+63+10+26 अशा एकूण 121 आहुत्या प्रदान करण्याचे विधान आहे. या सर्व आहुत्यांमुळे शरीर पूर्णपणे जळू लागते. मृतदेह चांगल्या प्रकारे भस्मिभूत होण्यास अनुकूलता निर्माण येते. या मंत्रांचा स्वाहाकार होत असताना इतर बाजूला उपस्थित असलेल्या इतर मंडळींनी चितेच्या सर्व बाजूंनी अग्नी पेट घेतला आहे की नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी अधूनमधून कापूर, राळ किंवा तूप टाकून अग्नी तीव्र करण्याचा प्रयत्न करावा.
 
 
याप्रसंगी जे मंत्रोच्चारण केले जात आहेत, त्यात पाच भौतिक तत्त्वांपासून बनलेला हा देह भस्म होऊन त्या त्या तत्त्वांमध्ये विलीन होत आहे. शरीर नश्वर आहे. आत्मा अजर व अमर आहे. त्याच्यासोबत अन्य कोणीही जात नाही. त्याने जीवनभर केलेली शुभ व अशुभ कर्मे हीच त्याच्यासोबत जात आहेत, असा भाव वर्णिला आहे. यासंदर्भात नीतीकाराने खालील श्लोकातून अतिशय मार्मिक भाव विशद केला आहे-
 
धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे,
भार्या गृहद्वारि जन स्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे ,
कर्मानुगो गच्छति जीव एक:॥
 
या जगातून जेव्हा जीवात्मा निघून जातो, त्यावेळी सारे धनवैभव या भूमीवरच पडून राहते. गाई, म्हशी इत्यादी गोठ्यातच उभ्या राहतात. जीवनभर साथ देणारी पत्नी ही दरवाज्यापर्यंत येऊन थांबते. मित्र, बांधव, नातेवाईक हे स्मशानापर्यंत चालत येत असतात. देहदेखील या चितेवर जळत आहे. पण, परलोकात मात्र जे काही जात असेल, तर ते म्हणजे त्याचे चांगले व वाईट असे कर्मच!
याच कर्मांच्या आधारे त्याचा बरा-वाईट पुनर्जन्म ठरू शकतो. या संपूर्ण जगाचा नियंता परमेश्वर आहे, यालाच तर ‘यम’ असे म्हणतात. तो सर्वांना नियंत्रणात ठेवतो. त्याच्या नियमात कोणतीही त्रुटी नाही. तो सर्वांच्या कर्मांची यथायोग्य अशीच फळे देतो. त्याच्या या कर्मफलव्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. म्हणूनच त्या भगवंताच्या न्यायव्यवस्थेला स्वीकारून त्या आत्म्याच्या उत्तम गतीसाठी प्रार्थना करण्याचाच भाव यावेळी उच्चारल्या जाणार्‍या या मंत्रांतून व्यक्त होतो. हे मंत्र म्हणजे दिवंगत आत्म्याप्रति आम्हां सर्वांची सत्कामना प्रकट करणारे आहेत. त्याबरोबरच मृतकांच्या नातेवाईकांना देखील सांत्वना व शांतता प्रदान करण्यासाठीची प्रेरक वचने आहेत. एका मंत्रात म्हटले आहे-
 
 
दिवं ते धूमो गच्छतु स्वर्ज्योति: पृथिवी भस्मनाऽपृण स्वाहा।
 
जळत असलेल्या मृतकाचा धूर द्युलोकापर्यंत पोहोचो. त्याचबरोबर तो स्व: म्हणजेच सुखविशेषापर्यंत असलेल्या ज्योतीला प्राप्त होवो. या भस्माने पृथ्वीला तृप्तता लाभो. प्रारंभिक विवेचित मंत्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की ‘इदं शरीरं भस्मान्तम्!’ हे शरीर नश्वर म्हणजे भस्म होण्यायोग्य आहे. वायू म्हणजेच आत्मा. वा म्हणजे गतिशीलता, तर यू म्हणजे सुगंध! आत्मा हा नेहमी गतिमान असतो, प्रगतीपथावर असतो. पण, ही प्रगती साधारण नव्हे, ती सुगंधयुक्त असावी. त्याच्या गुणांचा व यशाचा दरवळ चोहीकडे पसरवणारा असावा. म्हणूनच या आत्म्यासाठी ‘वायू’ म्हटले आहे. या जगातून निघून जाणारा तो आत्मा हा अनिल आहे. अनिलम् म्हणजेच अभौतिक! ‘न इलम् इति अनिलम्!’ या आत्म्याची उत्पत्ती पाच भौतिक तत्त्वापासून होत नाही. म्हणूनच तो अमर व अनश्वर आहे. हे शरीर मात्र भस्मान्तम् आहे. शेवटी या शरीराचे भस्म होणारच!
 
 
जगातून जाणार्‍या या आत्म्याने काय करावे? तर आपल्या केलेल्या कर्मांना आठवावे. आजपर्यंत या जगात राहून त्याने जी काही चांगली आणि वाईट कर्मे केली आहेत, त्यांची आठवण ठेवावी. यापुढे अनिष्ट कर्म होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच ‘क्लिबे स्मर’ म्हणजेच त्याने आपल्या सामर्थ्याचे स्मरण करावे. आत्म्यामध्ये महान शक्ती आहे. जो या शक्तीला ओळखून स्वतःच्या अस्तित्वाचा बोध करून घेतो, तो कधीही पराजित होत नाही. म्हणून यापुढचे जीवन हे आपल्या सामर्थ्य वाढीसाठी आहे. पण, शेवटी या संपूर्ण जगाचा निर्माता तर यम स्वरूपी आहे. अशा भगवंताचे मुख्य नाव ओम् आहे. त्याचे स्मरण करावे! जीवात्मा हा जेव्हा प्रणव नामाचे शुद्ध अंत:करणाने अर्थपूर्ण स्मरण करतो, तेव्हा तो कधीही दुःखाला प्राप्त होत नाही.
 
 
या अंत्यसंस्कारप्रसंगी उच्चारल्या जाणार्‍या सर्व मंत्रांचा भाव आध्यात्मिक व वैराग्यवृत्ती धारण करण्यास प्रवृत्त करणारा आहे. चिता व्यवस्थित पूर्णांशाने पेट घेतल्यानंतर त्या प्रज्वलित प्रेताच्या चोहीबाजूने जलसेचन करावे. जेणेकरून त्या अग्नीमध्ये इतर कोणतेही जीवजंतू प्रविष्ट होऊन त्यांची हत्या होणार नाही. शेवटी सर्वांनी मिळून दिवंगत आत्म्याच्या शांती व सद्गतीसाठी सामूहिक प्रार्थना करावी. त्यानंतर वस्त्रप्रक्षालन, स्नान, घराची स्वच्छता इत्यादी करून घर व परिसराच्या शुद्धतेसाठी विधिपूर्वक यज्ञ करण्याचे विधान आहे. यामुळे मृतकाचा दूषित वायूचा नायनाट होऊ शकतो व त्याबरोबरच कुटुंबीयांमध्ये दुःख दूर करण्यासाठी सामर्थ्य येऊ शकते.
 
 
त्यानंतर तिसर्‍या दिवशी सकाळी मृतदेहाची राख सावडावी. अस्थिचयन म्हणजेच हाडे गोळा करावीत. एखाद्या शेतात जाऊन तेथे ती हाडे पुरावीत व तिथे वृक्षारोपण करावे, तर राख शेतात सर्वत्र पसरावी. हाडे किंवा राख नद्यांमध्ये फेकून जलप्रदूषण करु नये. हे कृत्य अशास्त्रीय आहे. त्यानंतर या तिसर्‍या किंवा चौथ्या दिवशी घरी शांतियज्ञाचे आयोजन करावे. एवढे केल्यानंतर आता मृतकासाठी कोणतेही कर्तव्यकर्म शिल्लक राहत नाही. आपल्या सामर्थ्यानुसार दिवंगतांच्या स्मरणार्थ दान, परोपकार, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम शुभारंभ इत्यादी कार्यांचा संकल्प अवश्य करू शकतो. श्राद्ध, तर्पण, ब्रह्मभोज, दशक्रिया, इत्यादी कर्मांना वैदिक ग्रंथात कोठेच प्रमाण नसल्याने ते शास्त्रसंमत नाहीत. दुःख निवारण्यासाठी उपनिषद कथा, आध्यात्मिक प्रवचने, शांती प्रार्थना असे कार्यक्रम करणे उचित ठरते. त्याबरोबरच घरातील ज्येष्ठ सुपुत्राच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी सोपवण्याच्या दृष्टीने उत्तराधिकार म्हणजेच गृहाभिषेक कार्यक्रम करणे इष्ट ठरते.
 
(समाप्त)
 
(कृतज्ञता : वाचकांच्या आग्रहानुसार ‘वेदामृतसरिता’ या सदरांतर्गत वैदिक 16 संस्कारांचे अगदी विस्तारपूर्वक विवेचन करण्यात आले. वेदप्रतिपादित षोडश संस्कारशृंखलेतील लेखमालेला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेक अध्यात्मप्रिय, संस्कारप्रिय, धर्मप्रेमी अशा जिज्ञासू वाचकांनी भ्रमणध्वनीवर अतिशय खुल्या मनाने उत्तमोत्तम प्रतिक्रिया दिल्या. यासंदर्भात अधिक माहितीदेखील जाणण्याचा प्रयत्न केला. यास्तव आपणा सर्वांची साभार कृतज्ञता! सदरील वैदिक 16 संस्कारांची उपयुक्तता जिज्ञासू वाचक व असंख्य भारतीयांच्या अंत:करणात रुजो व घरोघरी विशुद्ध स्वरुपातील वैदिक षोडश संस्कारांची परंपरा वाढीस लागो, हीच प्रार्थना!)
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य