अमोल कोल्हेंचा राजकीय खात्मा शिरूरची जनताच करणार : प्रवीण दरेकर

    08-May-2024
Total Views |

Pravin Darekar
 
 
शिरूर - जर पाच वर्षात शेतकरी, महिला, तरुण यांच्या अडीअडचणी जो समजू शकत नाही, त्याच्या मागे जनता कधीही उभी राहत नाही. केवळ अभिनय आणि निव्वळ डायलॉगबाजी करून जनतेच्या संवेदना समजत नाहीत. तुमचे नाटक आता शिरूरची जनता वटवू देणार नाही, तुमच्या अभिनयाला भीक घालणार नाहीत. शिरूरच्या जनतेने तुमचा राजकीय खात्मा करायचे ठरवले आहे, अशी खरमरीत टीका भाजपा गटनेते आणि शिरूर लोकसभेचे निरीक्षक आमदार प्रविण दरेकर यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.
 
 
शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शहिद संभाजीराळे सांस्कृतिक भवन, कुरकुंडी येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत दरेकर बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बुटरे पाटील, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, सभापती कैलास लिंभोरे, सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, प्रकाश वाडेकर, जयसिंग दरेकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिलीप नाईकनवरे, भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांसह गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायट्यांचे अध्यक्ष, संचालक उपस्थित होते.
 
 
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान पुन्हा एकदा मोदी व्हावेत, त्यांच्या अब की बार ४०० पार मध्ये आपल्या छत्रपतीच्या भूमितील मावळा जावा या उद्देशाने तुम्ही येथे उपस्थित आहात. ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. पंतप्रधान पुन्हा कोण व्हावेत, या देशाचे भविष्य काय असेल हे ठरविणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे ज्यावेळी पंतप्रधान मोदी हे देशाचा कारभार करताना प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मी कारभार करतोय किंबहुना छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केलेय. शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन मोदी काम करत असतील तर ज्या छत्रपतींची जन्मभूमी आहे त्या परिसरातील खासदार आपला मावळा मोदींच्या सरकारमध्ये असला पाहिजे म्हणून त्यांना निवडून देण्याची गरज आहे.
 
 
अमोल कोल्हे यांच्यावर तोफ डागताना दरेकर म्हणाले की, अभिनेता आणि नेता यात फरक आहे. अमोल कोल्हे अभिनेता आहे. अभिनेता एकवेळ अभिनय नीट करू शकतो. परंतु अभिनय नीट करत असले तरी जनतेची सेवा, विकास करता येणार नाही हे त्यांनी दाखवून दिले. केवळ एखादी मालिका, डायलॉगबाजी, अभिनय करून जनतेच्या संवेदना समजू शकत नाही. रेडिमेड स्क्रिप्ट वाचू शकता परंतु या माझ्या माता भगिनींना पाणी हवेय. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव तुम्ही वाचू शकत नाही. शेतकऱ्यांचे दुःख, अडचणी काय आहेत हे वाचू शकत नाही. तरुणांना रोजगार पाहिजे त्याच्या संवेदना अमोल कोल्हे समजू शकत नाही. ते समजण्यासाठी हृदय असणारा, संवेदनशील माणूस लागतो. ते शिवाजीराव आढळराव पाटील आहेत.
 
त्यांच्या मागे जनता उभी राहणार आहे. आपले नाटक शिरूरची जनता वटवू देणार नाही. तुमचा शेवटचा अंक संपलेला आहे. तुमच्या अभिनयला लोकं भीक घालणार नाहीत. शिरूरवासियांनी कोल्हेचा राजकीय खात्मा करायचे ठरवले असल्याचा घणाघातही दरेकर यांनी केला. दरेकर पुढे म्हणाले की, एका बाजूला १५ वर्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. स्वतःच्या मेहनतीतून एक उद्योग उभा केला. ज्या मातीने मला जन्म दिला त्या मातीचे मला पांग फेडायचे आहेत, उद्योग सांभाळताना मला मातीची सेवा केली पाहिजे म्हणून शिवाजीराव इकडे आले. गेल्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्या पराभवाचा पुरेपूर वचपा काढण्याचे काम या निवडणुकीत करा. आढळराव यांना प्रचंड मतांनी लोकसभेत पाठवा, असे आवाहनही दरेकरांनी उपस्थितांना केले.
 
 
यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना दरेकर म्हणाले की, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेतली त्यांचे सुपूत्र काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताहेत. बाळासाहेबांच्या मागे हिंदूहृदयसम्राट उपाधी लागायची. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यावर हिंदुहृदयसम्राट गायब होऊन जनाब बाळासाहेब झाले याची यांना लाजही वाटत नाही, अशा शब्दांत दरेकरांनी समाचार घेतला.
 
कोल्हेना गावच्या वेशीवरून परत पाठवा!
 
पाच वर्ष तुम्हाला या जनतेने दिली. त्यांच्या गरजा काय आहेत कधी येऊन समजून घेतलात का? केवळ दिल्लीच्या सभागृहात नाटकी भाषण करायचे. प्रभू श्रीरामाची टिंगल करणारी भाषणं करणार. पाच वर्षात एकाही गावात न येता पाच वर्षांनी निवडणूक लढण्याचे धाडस करता. अमोल कोल्हे यांना गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवरूनच परत पाठवले पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.