पवारांच्या वक्तव्याला पटोले आणि वडेट्टीवारांचा दुजोरा, म्हणाले...

    08-May-2024
Total Views |

Patole & Wadettivar 
 
मुंबई : निवडणूकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. या वक्तव्याला काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिला आहे. शरद पवारांच्या म्हणण्यात तथ्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
 
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, "येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेस आणि आमच्यामध्ये मला काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. परंतू, कोणताही निर्णय हा सामूहिकपणे घेतला जाईल. उद्धव ठाकरेदेखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणी आमच्यासारखीच आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार! खुद्द पवारांनीच केला दावा
 
यावर नाना पटोले म्हणाले की, "प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत देशपातळीवर चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राहूल गांधी पुण्याला आले असताना त्यांनी मला सांगितलं की, अनेक पक्षांचा प्रस्ताव आहे. त्यामुळे देशात भाजपच्या ताणाशाही प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी मोट बांधावी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहावं, अशी भूमिका देशातील अनेक प्रादेशिक पक्षांनी मांडली आहे. शरद पवार सांगतात त्यात तथ्य आहे."
 
तसेच विजय वडेट्टीवारांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "शरद पवारांच्या म्हणण्यात तथ्य आहे. पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांच्याकडे दुरदृष्टी असून ते खोलवर विचार करुन बोलतात. त्यामुळे २०२४ मध्ये सत्तापरिवर्तन होणार आणि भरकटलेले पक्ष काँग्रेसमध्ये येतील. काँग्रेस पुन्हा मजबूतीने या देशाची धूरा सांभाळेल," असे ते म्हणाले.