सॅम पित्रोदा काँग्रेसमधून बाहेर!

    08-May-2024
Total Views |
Sam Pitroda
 
 
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण भारतीय आफ्रिकन दिसतात तर पूर्व भारतीय चिनी दिसतात, या ताज्या वक्तव्याद्वारे काँग्रेसला अडचणीत आणल्यानंतर अखेर बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाला पित्रोदा यांच्या वक्तव्यानंतर देशभरातून टिका सहन करावी लागली होती. त्यानंतर अखेर बुधवारी सायंकाळी पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश यांनी दिली.
 
ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या मर्जीने पदाचा राजीनामा दिला असून काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी लोकसभा निवडणुकीच्य चौथ्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वी पुन्हा एकदा काँग्रेसला अडचणीत आणले आहे. भारतातील विविधतेचा दाखला देताना त्यांची चक्क वर्णभेदी टिप्पणी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पित्रोदा म्हणाले की, भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात सर्वजण एकत्र राहतात. येथे पूर्व भारतातील लोक चीनच्या लोकांसारखे, पश्चिम भारतात राहणार अरबांसारखे आणि दक्षिणेत राहणारे आफ्रिकी लोकांसारखे दिसतात. मात्र असे असूनही सर्वजण एकत्र राहतात, असे पित्रोदा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
 
भाजपने या वक्तव्यानंतर काँग्रेसवर जोरदार टिका केली. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले, काँग्रेसचे नेतृत्व हे परदेशी मुळाचे आहे. त्यामुळेच सर्व भारतीयांचे मूळ विदेशी असल्याचा काँग्रेसचा समज झाला आहे. परिणामी भारतीयांचे मूळ विदेशात शोधण्याचे काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेस नेते आणि राहुल गांधींच्या ‘कुख्यात’ उस्तादांचे खरे मनसुबे याद्वारे उघड झाले आहेत. हा विषय केवळ राजकारणाचा नसून याद्वारे भारताच्या अस्तित्वालाच नख लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या या घातक मानसिकतेमुळे भारतास धोका असल्याचेही त्रिवेदी यांनी म्हटले आहे.
 
भाजपच्या चौफेर हल्ल्यानंतर हतबल झालेल्या काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माध्यमप्रभारी जयराम रमेश यांनी पित्रोदा यांचे वक्तव्य अयोग्य असल्याचे म्हटले आहे. सॅम पित्रोदा यांनी भारतातील विविधतेला दिलेली उपमा अत्यंत चुकीची आणि अस्वीकार्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावाही जयराम रमेश यांनी केला होता.