हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकाचा समावेश

    08-May-2024
Total Views |
 Poonch Terror Attack
 
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये दि. ४ मे २०२४ रोजी हवाई दलाच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्याचे काही फोटोही समोर आले आहेत. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी लष्कराचा माजी सैनिक असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दल त्यांचा शोध घेत आहेत.
 
समोर आलेल्या माहितीनुसार, पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची नावे इलियास फौजी, अबू हमजा आणि हदून अशी आहेत. यातील इलियास फौजी हा आधी पाकिस्तानी लष्करात कमांडो होता आणि नंतर त्यांने भारतात घुसखोरी करून दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय अबू हमजा हा लष्कर-ए-तैयबाचा कमांडर आहे.
 
तिन्ही दहशतवादी पीएएफएफ नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा प्रभाव कमी झाल्यानंतर या दहशतवादी संघटनेने डोकं वर काढले.तिन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रेही समोर आली असून, त्यात ते शस्त्र घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांच्या शोध घेण्यासाठी सुरक्षा दल पुंछ आणि राजौरी भागात मोठी शोध मोहीम राबवत आहे.
 
दि. ४ मे रोजी पूंछमध्ये हवाई दलाच्या जवानांच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला होता. हवाई दलाचे जवान सीमाभागातून ट्रकमध्ये बसून परतत होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अचानक ट्रकला घेरले आणि गोळीबार केला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले. त्यानंतर विकी पहाडे यांना या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले.
  
दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी सांगितले की, हल्ल्याच्या दिवशी सुमारे २० मिनिटे गोळीबार सुरू होता. त्यामुळे मुले घाबरली. स्थानिकांनी सांगितले की, अनेकदा हवाई दलाचे लोक या भागात येत असत आणि मुलांना चॉकलेटचे वाटप करत असत. घनदाट जंगलात हा हल्ला झाल्यामुळे त्यांना दहशतवादी दिसले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
  
दहशतवाद्यांची माहिती समोर येण्याच्या एक दिवस आधी मंगळवार, दि. ७ मे २०२४ सुरक्षा दलांना काश्मीरमध्ये मोठे यश मिळाले. काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये कमांडर बासित दारचाही समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यासह काश्मिरी पंडित आणि शीख शिक्षकाच्या हत्येप्रकरणी तो फरार होता.