‘जब वी मेट’ मध्ये शाहिद-करिना नाही तर ‘ही’ जोडी दिसली असती, दिग्दर्शकांनी केला खुलासा

    08-May-2024
Total Views |

kapoor  
 
मुंबई : करिना कपूर आणि शाहिद कपूर ही जोडी आजही प्रेक्षकांच्या पसंतीची. जब वी मेट (Jab We Met) या चित्रपटाचे चाहते आजही तो चित्रपट बऱ्याचदा पाहत असतीलच. आदित्य आणि गीत ही दोन पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. परंतु, जब वी मेट या चित्रपटात आदित्यच्या (Jab We Met) भूमिकेसाठी दिग्दर्शक इम्तियाज अली यांची पहिली पसंती अभिनेता शाहीद कपूर नव्हताच. जाणून घेऊयात कोणता अभिनेता साकारणार होता आदित्य ही भूमिका.
 
इम्तियाज म्हणाले की, "जब वी मेटसाठी आधी शाहीद माझी पहिली पसंत नव्हता. मी बॉबी देओलला आदित्यची भूमिका ऑफर केली होती. मी जेव्हा बॉबी देओलचा भाऊ अभय देओलसोबत सोचा ना था सिनेमाचं शूट करत होतो तेव्हाच मी बॉबीला जब वी मेटसाठी कास्ट करण्याचा विचार केला होता. सोचा ना था सिनेमा बनून रिलीज व्हायला पाच वर्ष लागली होती. या वेळात मी बॉबी सोबत बराच वेळ घालवला. तो माझ्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक आहे. म्हणूनच त्याला घेऊन जब वी मेट करायचं ठरवलं होतं. मात्र बरीच वर्ष गेल्यानंतरही सिनेमा काही बनला नाही. बॉबी तेव्हा वेगळ्या कामात होता त्यामुळे मला वाटलं ठीक आहे हा सिनेमा एकत्र होणार नाही."
 
पुढे ते म्हणाले की, "बऱ्याच वर्षांनी मी शाहीदला या सिनेमासाठी विचारणा केली. मला आदित्यच्या भूमिकेसाठी शाहीद फारच छोटा आहे असं वाटत होतं. मात्र नंतर त्यालाच फायनल करण्यात आलं. गीत च्या भूमिकेसाठी आधी मी प्रिती झिंटाला विचारणा केली होती. पण शाहीदला फायनल केल्यानंतर करीना कपूरच माझी पहिली पसंत होती. प्रिती झिंटा खरंतर पहिली आहे जिने माझ्या स्क्रीप्टची स्तुती केली होती. कारण माझा हा सिनेमा अनेकांनी रिजेक्ट केला होता. कोणीच घ्यायला तयार नव्हतं. पण प्रितीला स्क्रीप्ट आवडली होती. म्हणूनच आधी बॉबी देओल आणि प्रिती झिंटासोबत मी चित्रपट करणार होतो," असे त्यांनी सांगितले.