आपण सगळे मिळून बंड करु असं राऊत म्हणाले होते; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

    08-May-2024
Total Views |

Sanjay Raut
 
मुंबई : आपण सगळे मिळून बंड करु असं संजय राऊत अयोध्येत म्हणाले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
"१४ जून २०२२ रोजी अयोध्येमध्ये शिंदे माझ्या रुममध्ये आले आणि मला म्हणाले की, माझ्यामागे ईडी आणि सीबीआय लागले आहेत. हे माझं तुरुंगात जाण्याचं वय नाही. आपण मोदींसोबत जाऊ असं ते मला म्हणाले," असा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केला होता.
 
हे वाचलंत का? -  पवारांच्या वक्तव्याला पटोले आणि वडेट्टीवारांचा दुजोरा, म्हणाले...
 
यावर बोलताना नरेश म्हस्केंनी मोठा खुलासा केला आहे. "अयोध्येमध्ये संजय राऊत, मी आणि एकनाथ शिंदे एकत्र बसलो होतो. त्यावेळी संजय राऊतांनी मला सांगितलं की, आपण सर्व मिळून बंड करु. मी तुमच्यासोबत आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच हे मी अतिशय जबाबदारीने बोलत असल्याचेही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊतांनी शाहू महाराजांचा पराभव स्विकारला आहे का? राजघराण्याला राजकारणात आणू नये. छत्रपती संभाजी महाराजांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास उद्धव ठाकरेंनीच विरोध केला होता. ते सुद्धा शाहू महाराजांचेच पुत्र होते. मग त्यांना का विरोध केला? याचं उत्तर त्यांनी द्यावं," असेही ते म्हणाले आहेत.
 
ठाणे लोकसभा मतदारसंघात महायूतीकडून शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने उबाठा गटाच्या राजन विचारेंना तिकीट दिले आहे. दरम्यान, याठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी थेट लढत होणार आहे.