"शाळेच्या वेळेत नमाज पठण करायचे असल्यास सरळ रजा घ्या"; शिक्षणमंत्र्यांचे शिक्षकांना आदेश

    08-May-2024
Total Views |
 education minister
 
जयपूर : राजस्थानमधील शाळांमध्ये मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. शाळेत फक्त मुख्याध्यापकांनाच मोबाईल फोन ठेवण्याची परवानगी असेल. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी ही घोषणा केली आहे. शाळांमध्ये मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी शिक्षकांना दिल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच आता शिक्षकांना नमाज अदा करण्यासाठीही शाळा सोडता येणार नाही.
 
शिक्षणमंत्री मदन दिलावर म्हणाले की, सरकारी शाळांमध्ये मोबाईल फोनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ते म्हणाले की, शाळांमधील शिक्षक दिवसभर मोबाईलवर शेअर मार्केट पाहत राहतात. शिक्षक त्यातच मग्न राहतात आणि मुलांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होते.
 
मदन दिलावर म्हणाले की, सरकारी शिक्षकाने मोबाईल सोबत आणल्यास त्याचा फोन मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागेल. त्याचबरोबर मुख्याध्यापकांनाच मोबाईल सोबत ठेवण्याची परवानगी असेल. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी मोबाईल फोन हा आजार असल्याचे सांगितले आहे.
 
एवढेच नाही तर नमाजच्या नावाखाली शाळेतून गायब होणाऱ्या शिक्षकांवरही अंकुश ठेवण्यात आला आहे. प्रार्थना आणि पूजेच्या नावाखाली शाळा सोडणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मदन दिलावर यांनी सांगितले. कोणत्याही शिक्षकाला धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तो सुट्टी घेऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
 
दिलावर म्हणाले की, शिक्षक गायब झाल्याने मुलांच्या शिक्षणात अडथळा येतो. भैरूजी, बालाजीची पूजा आणि नमाज पठणाच्या नावाखाली सरकारी शाळांमधील शिक्षक शाळा सोडणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्यांना जावे लागले तर त्यांनी रजा घ्यावी. मुलांना शिकवण्यापूर्वी शिक्षकांनी स्वतःचा अभ्यास करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
जो कोणी या गोष्टी लक्षात ठेवणार नाही, त्यांच्यावर निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई केली जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिक्षणात यापूर्वीच केलेले सर्व आदेश, सूचना आणि नियमांचे पालन करण्याचा शाळांचा प्रयत्न आहे. सरकारी शाळांमधील क्रीडांगणावरील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.