दक्षिण मुंबईत धनुष्यबाणाला मत म्हणजेच मोदींना मत : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

    08-May-2024
Total Views |
 
Lodha
 
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मागील दोन दिवस येथील नागरिकांशी भेटून संवाद साधत आहेत. जनतेच्या सेवेसाठी काय करायला हवे याबाबत नागरिकांची मते जाणून घेणे आणि त्यांच्या काही समस्या असल्यास त्यासाठी उपाययोजना करणे हा उद्देश मंत्री लोढा आपल्या भेटीतून साध्य करत आहेत. तसेच ते या लोकसभा क्षेत्रातील सर्व स्तरातील नागरिकांना महायुतीच्या उमेदवारास मतदान करण्यास प्रोत्साहित करत आहेत.
 
नागरिकांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, "प्रथमतः सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या की, यावेळी दक्षिण मुंबईत मोदीजींचे चिन्ह धनुष्यबाण आहे. तिसऱ्या क्रमांकावर यामिनी ताईंचे नाव आणि धनुष्य बाणाचे चिन्ह आहे ते आपण दाबावे जेणेकरून मोदीजींना मत मिळेल. सर्वाना प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ अपुरा असल्याने यामिनी ताईंच्यावतीने आज आपणास आवाहन करण्यासाठी मी आलो आहे. १८, १९, २० अशी जोडून सुट्टी आल्याने साहजिक आहे आपणास कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्याची इच्छा होईल तरीही आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानास उपस्थितीत राहावे. देशाच्या विकासासाठी आपले मत मोदीजींना म्हणजेच दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंना द्यावे," अशी विनंती त्यांनी केली.
 
पुढे ते म्हणाले की "लोकसभेची ही निवडणूक म्हणजे मोदीजींची आणि आमचीसुद्धा एकप्रकारे एक परीक्षाच आहे. १० वर्षात काय प्रगती झाली त्यावरून जनता आमचे मूल्यांकन करणार आहे. १० वर्षांपूर्वी देशाची परिस्थिती कशी होती हे सर्वच जाणतो. देशात दंगली व्हायच्या, आतंकवादी हल्ले व्हायचे, अर्थव्यवस्था डगमगली होती. अशा परिस्थितीतून मार्ग काढून मोदीजींनी १० वर्षात देशाची परिस्थिती बदलली आहे. त्यासाठीच आपण सर्वांनी मोदीजींना मत देऊया, आपल्या देशाचा सुवर्णकाळ परत आणूया," असेही ते म्हणाले.