केरळमध्ये राहत आहेत ५० हजार घुसखोर?

    08-May-2024
Total Views |
 bangladesh
 
कोची : केरळमध्ये ५० हजारांहून अधिक परदेशी घुसखोर बनावट आधार कार्डच्या मदतीने राहत आहेत. हे घुसखोर बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका येथून आले आहेत. देश सोडून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय गुन्हेगारही बनावट आधार कार्डची मदत घेत आहेत. अशी माहिती मिलिटरी इंटेलिजन्सच्या अहवालातून समोर आली आहे.
 
Onmanorama च्या वृत्तानुसार, ही बनावट आधार कार्ड आसाममधील नागाव आणि मधुपूर, पश्चिम बंगालमधील दिनाजपूर आणि नादिया आणि केरळमधील पेरांबवूर येथील आधार कार्ड केंद्रांवर बनवण्यात आली आहेत. या आधार कार्ड केंद्रांमध्ये सुरक्षेचा भंग झाला आहे. येथून मोठ्या प्रमाणात घुसखोरांनी बनावट आधार कार्ड जारी केले असून ते केरळमध्ये राहत आहेत.
 
याआधी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनीही खोट्या आधारकार्डच्या सहाय्याने घुसखोर केरळमध्ये प्रवेश करत असल्याची भीती व्यक्त केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमा भागात सतर्कता वाढवली आहे. तटरक्षक दलानेही गस्त वाढवली आहे.
 
आधार कार्ड बनवण्याच्या यंत्रणेत फेरफार करून बनावट कागदपत्रे दिली जात असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. केरळमध्ये सध्या असलेली आधार कार्ड केंद्रे झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये बसलेले लोक चालवत आहेत. केरळमधील मलप्पुरममध्ये असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे जेथे पश्चिम बंगालमधून आधार कार्ड केंद्र चालवले जात होते.
 
अहवालात असे म्हटले आहे की, केरळमध्ये ज्या भागात बाहेरून येणारे कामगार काम करतात तेथे मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड बनवले जात आहेत. येथे चुकीच्या माहितीच्या मदतीने आधार कार्ड बनवले जात आहे. यामध्ये अनेकांनी छायाचित्रे बदलून आधार कार्ड बनवल्याचे समोर आले आहे.
 
याआधीही बेकायदेशीर रोहिंग्या घुसखोर मृतांची ओळख वापरून बांगलादेश सीमेवरून भारतात घुसत असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्याकडे मृतांच्या नावाने बनवलेले ओळखपत्र मिळत होते. एनआयएनेही या प्रकरणाचा तपास केला होता. याप्रकरणी तामिळनाडूत काही जणांना अटक करण्यात आली होती.