निवडणूकीनंतर पवारांना उबाठा गट...; फडणवीसांची प्रतिक्रिया

    08-May-2024
Total Views |

Sharad Pawar & Devendra Fadanvis 
 
जालना : निवडणूकीनंतर शरद पवारांना त्यांचा गट आणि उबाठा गट चालवणं कठीण जाणार आहे. त्यामुळे हे दोन्ही गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. निवडणूकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी केला होता. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पवार साहेब द्रष्टे आहेत. त्यांना या निवडणूकीचा निकाल लक्षात येत आहे. त्यामुळे निवडणूकीनंतर त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट चालवणं कठीण जाईल, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या निवडणूकीनंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होतील, याबद्दल मला खात्री पटली आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  अखेर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामकरणावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब!
 
तसेच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहराच्या नामकरणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. ते म्हणाले की, "अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही एकही प्रस्ताव आणला नाही. ज्यावेळी तुमचं बहुमत संपलं आणि राज्यपालांनी सरकार बरखास्त करण्याचं पत्र दिलं त्यादिवशी तुम्ही नामांतर करण्याचा ठराव केला. पण त्यादिवशी तुम्हाला अधिकारच नव्हता. हे नामांतर करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारकडूनही आम्हीच मंजूरी आणली आणि आता हायकोर्टाचीही मंजूरी मिळाली आहे. तुमच्याकडे अडीच वर्ष वेळ होता पण तुम्ही त्यावेळी झोपला होतात," असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.