३० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन

    08-May-2024
Total Views |

NMMC
नवी मुंबई, दि.८ : प्रतिनिधी जुन्या इमारतींमधील घरांमध्ये अंतर्गत फेरबदलाची कामे करताना स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. नेरुळ, सेक्टर १७ येथील जिमी टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर ०६ येथील तुलसी भवन, तसेच सन २०१६ मध्ये अशाच प्रकारच्या अपघाताने जिवित हानी झालेली असल्याच्या घटना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत. हे पाहता ३० वर्षे जुन्या इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून ऑडिट करुन घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करुन सदर इमारत धोकादायक असल्यास पावसाळयापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६४ अन्वये प्रवर्गनिहाय धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतात. सी-१ प्रवर्गातील इमारती या मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिकाम्या करणेबाबत त्या त्या सहकारी गृहनिर्माण संस्थाना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६५(अ) नुसार, ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे, अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित गृहनिर्माण संस्थेने एक वर्षाच्या मुदतीच्या आत नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून करुन घेणे अनिवार्य आहे. अशा सदनिकांमध्ये अंतर्गत बदल करताना ज्यामध्ये लाद्या बदलणे, अंतर्गत असलेले आरसीसी कॉलम किंवा बीम यांची दुरुस्ती करताना सदनिकेच्या फ्लोअरींगचा स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

त्या अनुषंगाने, नवी मुंबई महानगरपालिकेस लागू असलेल्या निवासी आणि वाणिज्य वापरातील इमारतींनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे प्रमाणपत्रासह नियमानुसार वास्तुविशारदामार्फत महानगरपालिकेच्या परवानगीसह देखरेखीखाली कामे करणे आवश्यक आहे. केवळ अंतर्गत फेरबदलाचे काम करताना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र हे काम करताना संबंधित संबंधित सोसायटीस माहिती देणे आवश्यक आहे. सोसायटीनेही हे काम नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या देखरेखीखाली होत असल्याची खात्री करावी. भविष्यात अशा इमारतींमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित सदनिका किंवा वाणिज्य वापराचे गाळेधारक यांना व सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांना देखील जबाबदार धरण्यात येईल. जेणेकरुन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची कृपया नोंद घेणेबाबत याव्दारे नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे.