सेलिब्रिटी व जाहिरातदार सुद्धा दिशाभूल जाहिरातीसाठी जबाबदार ठरतील, ' हा ' न्यायालयाचा मोठा निर्णय

आता स्वयंघोषणा करणे न्यायालयाने जाहिरातदारांना अनिवार्य केले

    08-May-2024
Total Views |

Supreme court
 
 
मुंबई: आता जाहिरातदारांना जबाबदारीने जाहिराती कराव्या लागणार आहेत केवळ जाहिरातदारांना नाही तर इनफ्लूएंसर, सेलिब्रिटी यांनाही कुठल्याही उत्पादनाची जाहिरात जबाबदारीने करावी लागणार आहे. बाबा रामदेव यांच्या १४ उत्पादनांवर उत्तराखंड नियामक मंडळाने बंदी घातली होती. न्यायालयाने बेजबाबदार जाहिरात म्हणून पतांजली कंपनीला माफी मागावी लागली होती.याच धर्तीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आगामी काळात अवास्तविक व भ्रामक जाहिरातांना चाप घालण्याचे निर्देश दिले आहेत.
 
याविषयी न्यायालयाने जाहिरातदार, सेलिब्रिटी, इनफ्लूएंसर यांना सक्त ताकीद देत अशा जाहिरातींवर रोख घालण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारच्या जाहिराती केल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यक्ती अथवा संस्थांना घ्यावी लागेल असे स्पष्ट शब्दात त्यांनी म्हटले आहे. 'या सेलिब्रिटी, जाहिरातदार,अथवा इनफ्लूएंसर यांना यासंबंधीची जबाबदारी घेत जाहिरात दोषमुक्त असेल याची खातरदारी करावी लागेल' असे म्हटले आहे. याबद्दलची घोषणा हिमा कोहली व एहसानूदीन अमनउल्ला या न्यायाधीशांच्या खंडपीठाने केली आहे.
 
आता जाहिरात बनवाताना जाहिरातदार केबल टीव्ही नियमांचे व जाहिराती नियमांचे पालन करत जाहिरात प्रदर्शित करण्यापूर्वीच स्वयं घोषणा नियामक संस्थेला करावी लागणार आहे. जाहिरात प्रदर्शित करण्यापूर्वीच यांची घोषणा ब्रोडकास्ट सेवा पोर्टलला करावी लागणार आहे. स्वयं घोषणा ही वृत्तपत्रे अथवा प्रिंट मिडियालाही लागू असणार आहे. या स्वयंघोषणेचे मुख्य उद्दिष्ट विनाकारण अडथळे आणणे नसून मूलभूत नियमांची पायमल्ली न करणे हे उद्दिष्ट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
 
याशिवाय' पेड इनफ्लूएंसर ' यांनाही ही जाहिरात पेड असल्याची घोषणा करावी लागणार आहे. सरकारलाही जाहिराती नियंत्रणासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ग्राहकांनीही या संदर्भात जागरुकता ठेवून तक्रार निवारणासाठी दिशाभूल जाहिराती पडताळणीसाठी पाठवण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.