"तुम्ही फक्त विकासकामांची नक्कल केली!" शिरुरच्या खासदारांना खरमरीत पत्र!

    08-May-2024
Total Views |
 
Amol Kolhe
 
मुंबई : कावळ्याला सोन्याचे पंख लावल्याने तो गरुड होत नाही, तुम्ही तर 'कोल्हे' आहात, राजे नाहीत. तुम्ही फक्त विकासकामांची नक्कल केली, अशी सणसणीत टीका शिरुरमधील एका मतदाराने खासदार अमोल कोल्हेंवर केली आहे. लंडनस्थित असलेल्या या मतदाराने मागच्या ५ वर्षांत कोल्हेंनी केलेल्या कामाचा पाढाच वाचला.
 
राज्यात लोकसभा निवडणूक सुरु असताना शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर खेड तालुक्यातील व सध्या लंडनमध्ये कायदा आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांचे शिक्षण घेत असलेल्या क्रांतीसिंह गडदे या तरुणाने जोरदार टीका केली. कोल्हेंच्या विविध सामाजिक आणि राजकीय भूमिकांवरुन त्याने निशाणा साधला.
 
हे वाचलंत का? -  विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर!
 
"गेले अनेक दिवस आपण लोकसभेच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी जात आहात. पण आमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून मागच्या ५ वर्षांत आपण हेच प्रश्न संसदेत मांडणं अपेक्षित नव्हतं का?" असा सणसणीत सवाल या मतदाराने अमोल कोल्हेंना विचारला आहे. तसेच आपण आपल्या लोकसभेच्या कारकिर्दीत एक अभिनेता म्हणून विकासकामांची केवळ नक्कल केली, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
 
 
गतकाळात अमोल कोल्हे यांनी कलम ३७०, राम मंदिर, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांचा स्वार्थासाठी केलेला वापर, जातीपातींच्या राजकारणाविषयी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका या राष्ट्रविरोधी शक्तींना पुरक आहेत. अशा भूमिका घेत असताना कोल्हेंनी मतदारसंघातील विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या तरुणाने केली आहे. याशिवाय खासदार कोल्हेंना खाजगी संस्थेने दिलेल्या 'संसदरत्न' पुरस्काराची तुलना या तरुणाने चित्रपटसृष्टीतील 'फिल्मफेअर अवार्ड' सोबत केली आहे.
 
वाचा संपूर्ण पत्र...
 
मा. श्री. अमोल कोल्हे साहेब, सप्रेम नमस्कार, पत्रास कारण की, २०१९ च्या शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून मागील ५ वर्षांत आपण केलेल्या कार्याबद्दल आपल्याशी हितगुज साधणेबाबत... गेली अनेक दिवस आपण लोकसभेच्या प्रचारार्थ बोलण्यासाठी विविध ठिकाणी जात आहात. एक मतदार म्हणून याकडे पाहिल्यावर माझ्या मनात प्रश्न उपस्थित होतो की, आमच्या लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून कार्यरत असताना मागील ५ वर्षांत आपण हेच प्रश्न संसदेत मांडणे अपेक्षित नव्हते का? ज्या कलम ३७० अंतर्गत आपल्या हिंदुस्थानात आपलेच हिंदू निर्वासित म्हणून राहिले ती इतिहासातील रक्तानं माखलेली कलम ३७० ची जखम ज्यावेळी मोदी सरकारकडून दूर केली जात होती आणि देशाच्या एकसंधतेचा जेव्हा निर्णय होत होता त्यावेळी आपण देशाच्या संसदेत गैरहजर होता. ज्यांनी कश्मीर खोऱ्यात राजेशाही केली, ज्यांच्यामुळे कश्मीर खोऱ्यात रक्ताचे पाट वाहिले, लक्षावधी हिंदूंच्या कत्तली झाल्या, त्या शेख अब्दुल्लांच्या देशद्रोही औलादी आणि मेहबुबा मुफ्ती यांना कलम ३७० रद्द केले जात असताना नजर कैदेत ठेवल्याने तुम्ही आणि तुमच्याच पक्षाच्या राजकन्या सुप्रियाताई मगरीचे नक्राश्रू गाळत होतात ! त्यावेळी तुम्हाला हिंदूंचे अश्रू दिसले नाहीत ? त्याच कलम ३७० मुळे हिंदू स्त्रियांच्या कपाळावर लावलेलं हिरवं कुंकू दिसलं नाही ? ज्यांनी जगभरात अल्लाहू अकबरचे नारे देत, जिहादच्या नावाखाली नंग्या तलवारी नाचविल्या त्यांच्याबद्दल एक शब्दही न बोलता कोट्यावधी हिंदूंची अस्मित असणाऱ्या भगवान प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असताना तुम्ही "महाराष्ट्रात रामाच्या नावावर तलवारी नाचवू नका" असे विधान करून मा. पवार साहेबांना खुश करण्याचं काम अत्यन्त इमानदारीने केलं! हे तेच पवार साहेब आहेत, ज्यांनी १९९३ साली मुंबईमध्ये प्रत्यक्षात १२ बॉम्बस्फोट झाले असताना, १३ वा बॉम्बस्फोट मुस्लिम बहुल परिसरात (मस्जिद बंदर) येथे झाला असा जावई शोध लावून हिंदूंना कलंकित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हे तेच पवार साहेब आहेत, ज्यांनी आयुष्यभर जातीपातींच राजकारण केलं आणि तुम्ही तुमचं ईमान असल्या व्यक्तीच्या पायाशी वाहून छत्रपती शिवरायांच्या विचारांना नारळ दिलात.
 
कोल्हे साहेब, तुम्ही स्वराज्यरक्षक संभाजी मालिका केली. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना ३९ दिवस अनन्वित अत्याचार करून, छळ करून ठार मारलं तो छळ तुम्ही दाखविला नाही कारण तुम्हाला भीती होती हिंदू समाजात औरंगजेबाबद्दल आणि त्याच्या नाजायज औलादींबद्दल द्वेष निर्माण होईल. ज्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका करत तुम्ही लोकांना भावनिक करून मते मिळवून स्वतःची राजकीय व आर्थिक पोळी भाजत आलात. औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' नामकरण होत असताना तुम्ही मात्र हे नामकरण करून काय होणार आहे असा प्रश्न उपस्थित केला. ज्या संभाजी ब्रिगेडची तहहयात अहमदशाह अब्दाली, बाबर, अकबर, औरंगजेब, अफजलखान यांचा उदो उदो करण्यात गेली, तुम्ही त्याच संभाजी ब्रिगेडची पालखी अत्यंत निष्ठेने वाहून, एक अभिनेता म्हणून छत्रपतींच्या विचारांना अत्यंत इमान इतबारे तिलांजली देत आलात..
 
कोल्हे साहेब आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी तुमच्याकडे मतदारसंघातील शिवछत्रपतींच्या जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी परिसरात 'शिवसृष्टी' व अखिल विश्वाला पसायदान रुपी अमृत देणाऱ्या माऊलींच्या आळंदीत 'ज्ञानसृष्टी' उभारण्यासाठी निवेदने दिलेली होती. परंतु जनतेला कोरड ब्रह्मज्ञान पाजणारे तुम्ही हे पूर्ण करू शकला नाहीत. आपल्या लोकसभा मतदार संघात आपण मागील ५ वर्षांत फिरलाच नाहीत. जून २०२२ मध्ये माझ्या शिवे आणि पंचक्रोशीतील गावांवर चक्रीवादळाचा आघात होऊन जीवितहानी झाली असताना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही साधी भेट देखील याभागाला देऊ शकला नाहीत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आक्रोश मोर्चे काढता? कांद्याला हमीभाव भेटावा म्हणून 'ढोंग' रचता? आपण आपल्या लोकसभेच्या कारकीर्दीत एक अभिनेता म्हणून विकासकामांची केवळ नक्कल केलीत. ज्या 'संसदरत्न' पुरस्काराची तुम्ही तुतारी वाजवत फिरता आहात, तो पुरस्कार चेन्नई येथील 'प्राईम पॉइंट फाउंडेशन' ही खाजगी संस्था देते. अशा संसदरत्न व फेल्म फेअर अवॉर्ड यात आम्हाला काही रस नाही. याउलट तुमच्यासारख्या एका निष्क्रिय खासदाराला एका खाजगी संस्थेकडून संसदरत्न पुरस्कार भेटतो हा या २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट विनोद आहे.
 
तुम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत! तुम्ही म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नाहीत! कोल्हे साहेब, कावळ्याला सोनेरी पंख लावले म्हणून तो राजहंस होत नाही, तो कावळाच असतो आणि तुम्ही तर 'कोल्हे' आहात, राजे नाहीत! छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न पाहिलं, 'अहद तंजावर तहद पेशावर' ते स्वप्न साकार करण्यासाठी देशाच्या अखंडतेसाठी उभे राहा. महाराष्ट्राच्या इतिहासातील खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, गणोजी शिर्के या मातीत विष कालविणाऱ्यांच्या पंगतीत बसू नका. ही माती देशाभिमान आणि स्वामीनिष्ठेसाठी प्राणप्रणाला लावणाऱ्या तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बांदल देशमुखांची आहे त्यांचा वारसा घ्या ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती संभाजी महाराज की जय !
 
तुमचाच,
ॲड. क्रांतीसिंह गडदे
(मतदार शिरूर लोकसभा) सध्या वास्तव्य - लंडन, युके