‘चिन्मय मिशन’द्वारा स्वामी चिन्मयानंद यांचे १०८वे जयंती वर्ष

    07-May-2024
Total Views |
Chinmay Mission
 
आज बुधवार दि. ८ मे. परमपूज्य गुरूदेव स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचा १०८वा जयंती दिवस. तसेच दि. ८ मे २०२३ ते ८ मे २०२४ हे संपूर्ण वर्ष स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे १०८वे जयंती वर्ष म्हणून ‘चिन्मय मिशन’च्या संपूर्ण विश्वभरातील केंद्रे व आश्रमांमध्ये साजरे झाले. अनेकविध आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून हे वर्ष साजरे झाले. त्यानिमित्ताने गुरूदेव स्वामी चिन्मयानंदांचे संक्षिप्त चरित्र व ‘चिन्मय मिशन, कल्याण’ या नवोदित केंद्राची वाटचाल याविषयी माहिती देणारा हा लेख...

'चिन्मय मिशन’ ही एक जागतिक आध्यात्मिक संस्था. या संस्थेची औपचारिक स्थापना दि. ८ ऑगस्ट १९५३ या दिवशी झाली. या संस्थेची मुख्य शाखा - सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट सांदिपनी साधनालय, पवई, मुंबई येथे असून, संपूर्ण विश्वभर एकूण ३३६ शाखा आहेत. आधुनिक युगपुरुष परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद चिन्मय मिशन जागतिक आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक. त्यांनी अखंड भक्तीने मधुर झालेल्या कर्मयोगाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. बालकृष्ण मेनन, भावी स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म दि. ८ मे १९९६ रोजी पराकुट्टी व कुट्टन मेनन यांच्या एर्नाकुलम येथील उच्चभ्रू घराण्यात झाला. सनातन हिंदू परंपरेच्या संस्कारांमुळे अनेक संतमहात्मे त्यांच्या घरी येत असत. बालपणापासून अतिशय हुशार, बुद्धिमान होता. वाचन, पोहणे, बॅडमिंटन इत्यादीची त्याला आवड होती. घरच्या संस्कार व शिस्तीमुळे बालपणापासूनच देव-धर्माचे बाळकडू मिळाले.

पुढील उच्च शिक्षण लखनौ विद्यापीठात इंग्रजी साहित्य व विधी या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. तो काळ होता पारतंत्र्याचा. १९४२ साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. लवकरच त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले. त्यांना भूमिगत व्हावे लागे. भूमिगत राहून स्वातंत्र्य लढा सुरूच होता. परंतु, अखेर त्यांना अटक झाली व तुरुंगात डांबण्यात आले. अनेक महिने भयानक अवस्थेत तुरुंगात राहावे लागले. छळ, उपासमार, अस्वच्छता, खेळती हवा नाही, अशा वातावरणात तुरुंगात टायफस, ज्वर अशा रोगांच्या साथी पसरल्या व कैदी मरू लागले. कैदी काय, ते तर भारताचे कोवळे अवघ्या २०-२२ वर्षांचे तरूण युवा क्रांतिकारी होते. इंग्रज अधिकार्‍यांनी कागदपत्रांच्या कारवाया टाळण्यासाठी मरायला टेकलेल्या कैद्यांना बाहेर रस्त्यावर फेकून देण्यास सुरूवात केली. या काळात बालनला जीवन व जग याचे अवलोकन करण्याचा अवसर मिळाला.

अनेक निष्प्राण देह तुरुंगाबाहेर जाताना त्यांनी पाहिले. मृत्यूची सत्यता दृष्टीआड करता येत नाही, हे त्यांना जाणवत गेले. पण, जीवनाचा अर्थ का? या जगात अधिक शाश्वत असे काही आहे काय? असले तर ते काय? असा विचारांचा आतील सूक्ष्म प्रवास सुरू झाला. तरुण बालन मेनन भावी स्वामी चिन्मयानंदलाही टायफसच्या साथीने पछाडले. ब्रिटिश अधिकार्‍याच्या लक्षात आले आणि मेननलाही बाहेर रस्त्यावर फेकून दिले. सुदैवाने एका हिंदुस्तानी ख्रिश्चन महिलेने त्यांना घरी नेले व स्वत:च्या मुलासारखी शुश्रुषा केली. तिचा मुलगा सैन्यात होता. तिला तिच्या मुलाची आठवण झाली व तिने बालनला वाचविले. त्यानंतर पुढे त्यांनी विधी व इंग्रजी साहित्यातील पदवी मिळवून पत्रकारिता निवडली.

१९४५ साली राजकीय घडामोडीचे केंद्र असलेल्या दिल्लीला ते पोहोचले. ‘नॅशनल हेरॉल्ड’च्या संपादकीय विभागात रुजू झाले. लवकरच एक ‘तडफदार पत्रकार’ असा लौकिक प्राप्त झाला. भारतीय जीवन, इतिहास, संस्कृती व अर्थात स्वातंत्र्याची अपरिहार्यता, यांसारख्या प्रचलित विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत असत. ते स्थानिक मंडळांमध्ये लोकप्रिय बनले. मात्र, त्यांचे मन त्यात रमेना. राजकीय जीवन, सामाजिक चळवळी, बौद्धिक चर्चा याहूनही जीवनात अधिक काहीतरी आहे. ते निश्चितपणे काय आहे, या शोधाची जिज्ञासा तीव्र होत गेली. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. तसेच युरोपीय तत्त्वज्ञानही अभ्यासले. रोज रात्री ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप ते करीत असत. स्वामी शिवानंद, स्वामी विवेकानंद, रामतीर्थ, अरविंदो, रमण महर्षी आणि इतर अनेकांचे ग्रंथ त्यांच्या हाती लागले. स्वामी शिवानंदांच्या साहित्याचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. ‘भले व्हा अन् भले करा, सेवा करा, प्रेम करा, चित्तशुद्धी करा, ध्यान करा, साक्षात्कारी व्हा व मुक्त व्हा’ अशी विचारधारा ‘डिव्हाईन लाईफ सोसायटी’ची होती.

प्रभावित होऊन हा अत्यंत पुरोगामी तरुण १९४७च्या उन्हाळ्यात शिवानंदांच्या आश्रमात अध्यात्माचा खरा अर्थ जाणण्याच्या उद्देशाने व जीवनांत खरंच काही अर्थ आहे का? याचा शोध घेण्यासाठी दाखल झाला. नवीन लेखासाठी चांगला विषय आहे, असे त्याला वाटले. स्वामी शिवानंद, त्यांचा सहवास, त्यांचे चरित्र, त्यांची दिनचर्या व कार्य पाहून मेनन भारावून गेला. आश्रमाचे वातावरण व ज्ञान पाहून प्रेरित झाला. परिवर्तन झाले. त्याने पाहिले की, आपण तर भारताला ब्रिटिशांच्या जुलमातून स्वतंत्र करत आहोत. पण, इथे तर प्रत्येक जीव या जन्म-मरणाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी समर्पण आहे. तेही पूर्णपणे निष्काम, अतिपवित्र. दि. २५ फेब्रुवारी १९४९ शिवरात्रीच्या शुभदिनी स्वामी शिवानंदांनी मेनन यांना विधीपूर्वक संन्यास दीक्षा दिली. आता ते ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’ झाले. अर्थात, शुद्ध चैतन्य आनंद स्वरूप आहे असा.

स्वामीजींनी काही काळ आश्रमात राहून सेवा दिली व अध्ययन केले. परंतु, त्यांचा ज्ञानमार्ग होता. स्वामी शिवानंदांनी त्यांना गंभीर वेदांत अध्ययनासाठी स्वामी तपोवन महाराजांकडे जाण्यास सांगितले. स्वामी तपोवन हे ‘हिमवत् विभूती’ म्हणूनच प्रसिद्ध होते. अत्यंत विरक्त. उत्तरकाशीहून खाली ते कधी आलेच नाहीत. या अत्यंत करडे व शिस्तप्रिय गुरूंकडे काही वर्षे अध्ययन, तप व सेवा केली. अत्यंत खडतर अशा कसोटीस ते उतरले. उत्तम अधिकारी शिष्य बनले. लोकसेवा अध्ययनानंतर गंगेकिनारी बसले असताना त्यांना गंगा मातेकडून प्रेरणा मिळाली. ‘मला जे ज्ञान मिळाले आहे ते मी या गंगेप्रमाणेच सगळीकडे वाटेन. गंगा ज्याप्रमाणे हिमालयात पवित्र स्थानी असूनही अखिल भूमीला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी खालच्या दिशेने अखंड वाहात आहे, तसेच मी देखील हे ज्ञान वाटत फिरेन,’ असा त्यांनी निर्धार केला.

गुरूंची आज्ञा घेण्यास गेले. पण, प्रसिद्धी पराङ्गमुख, विरक्त तपोवन स्वामिनी हिमालयातच आत्मानंदात राहण्यास सांगितले. गुरू म्हणाले, ‘लोकांना हवे असेल तर तुझ्याप्रमाणे येतील इथे. तू त्यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही.’ पण, रजोगुणी, उत्साही चिन्मयानंद स्वामींना काही रुचेना. त्यांनी पुन्हा गुरूंना विनंती केली, ‘खाली देशात जाऊन आपल्या पवित्र ग्रंथांची संपत्ती, त्यातील विचारधन आपल्या देशबांधवांना वाटावे, अशी माझ्यामध्ये प्रचंड ऊर्मी आहे. गंगा जशी आपल्या सार्‍या स्फूर्तीदायक लहरींनी सर्वांना संजीवन व प्रेरणा देते, तसे प्रवाहित होऊन मला खाली जायचे आहे.’ सहा महिने भारतभ्रमण पदयात्रा परवानगी तर मिळाली नाही. पण, ‘संन्याशासारखी भटकंती कर, लोकांची अजूनही तयारी नाही - ते तुला समजू शकणार नाहीत,’ अशी प्रतिक्रिया मिळाली. सहा महिने खांद्यावर झोळी घेऊन कधी एखाद्या देवळात, झाडाखाली वा कधी ओळखीच्या व्यक्तीच्या घरी राहून संपूर्ण देश भ्रमण केले.

१९५१च्या सुमारास स्वामी चिन्मयानंदांनी आपली भारत यात्रा संपविली व ते उत्तरकाशीला तपोवन कुटीर येथे परतले. भारतभ्रमण करताना त्यांची ज्ञानदानाची इच्छा अधिकच तीव्र झाली. कारण, भ्रमण करताना त्यांनी लोकजीवन जवळून पाहिले. आपल्या संस्कृती व धर्माचा झालेला र्‍हास त्यांनी पाहिला. लोक पोटभरू शिक्षणाने गुलाम बनले आहेत, गांजले आहेत, दारिद्य्रात खितपत पडले आहेत. हे सर्व पाहून उलट आता आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांतील ज्ञानाचा खजिना समाजात लुटण्यासाठीची इच्छा अधिकच तीव्र झाली. आपले समृद्ध, परंतु विस्मृतीत गेलेले वेदांत तत्वज्ञान जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविणे हेच आपले जीवनकार्य आहे, अशी त्यांची खात्री पटली होती. आध्यात्मिक व आर्थिक अवनती पाहून, त्यांनी ज्ञानयज्ञांची मालिका देशांतील सर्व शहरांतून, नगरातून आयोजित करण्याचा निर्णय घेतला. गुरूच्या आशीर्वादा शिवाय जाणे शक्य नव्हते. त्यांनी पुन्हा स्वामी तपोवन महाराजांची अनुमती मागितली. स्वामी तपोवन महाराज म्हणाले, “ठीक आहे जा आणि आपले ज्ञानयज्ञ सुरु करा. परंतु, एक अट आहे की, आपल्या श्रोत्यांमध्ये वक्त्यासहीत किमान पाच लोक असावेत.”

पुण्यातील रास्तापेठेत गणपती मंदिरात पहिला ज्ञानयज्ञ ठरला. सुरूवात केवळ चार लोकांनीच झाली. पण, जशी नदी उगमाच्या ठिकाणी थेंबाथेंबानेच वाहत असते. समुद्ररूप धारण करते. अगदी तद्वतच एकावेळी दहा हजारांहून जास्त श्रोते असणारे तत्वज्ञानाचे वक्ते स्वामीजी बनले.नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताला अशा मार्गदर्शनाची व दिग्दर्शनाची निकडीची गरज होती. कारण, देश वैदिक तत्त्वज्ञानापासून दूत जात होता. त्यांचे प्राथमिक लक्ष्य हिंदूंचे हिंदुत्वात धर्मांतर करणे, हे होते. हे कार्य आव्हानात्मक होते. त्यांना सुरूवातीपासूनच विरोधाला तोंड द्यावे लागले. प्रत्येकजण जणू काही त्यांच्य विरुद्ध होता. तथाकथित धर्मशास्त्रींची मक्तेदारी संपुष्टात येईल म्हणून प्रखर टीका करून विरोध केला. सुशिक्षित वर्ग बुद्धिजीवी बनला होता. पाश्चिमात्यांचे अनुकरण करून भौतिकवादी व नास्तिक झाला होता. आर्य संस्कृती, अध्यात्म, हिंदुत्व, भारताची प्राचीन परंपरा याचा विसर पडला होता. स्वामीजींनी प्रयत्न सोडले नाहीत. यश हा आमचा जनसिद्ध हक्क आहे. ते त्यांनी दाखवून दिले. ‘चिन्मय मिशन’च्या रूपाने आजही ते कार्यरत आहेत.अध्यात्मविद्या प्रसाराच्या हेतूने अनेकानेक उपक्रम सुरू केले व आजही जोमाने सुरू आहेत. गीता, उपनिषदे, पुराणे, रामायण व इतर धर्मग्रंथांवर अभ्यासात्मक प्रवचन मालिकाही सुरु आहे. सुरूवातीला तीन-तीन महिने प्रवचनांची मालिका व्हायची. काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे कालावधी सात दिवसांचा होत गेला. आज सर्व भाषांमध्ये ही प्रवचने सुरू आहेत.
 
साधना शिबिरे

एखाद्या तीर्थक्षेत्री, आश्रमांमध्ये पूर्णवेळ रहिवासी साधना, जिथे साधकांना फक्त श्रवण, मनन, निधीध्यासन करण्याची संधी मिळते. भोजन इ. सर्व व्यवस्था आश्रमातर्फे केली जाते. (कालावधी एक वर्ष, दीड महिना, ६ महिने, ७ दिवस, शनिवार / रविवार) अभ्यास वर्ग-आठवड्यातून एक वारी दीड तासांचा हा वर्ग जिथे १५-२० जण एकत्र येऊन विशेष मार्गदर्शनासहित शास्त्राध्यायन करतात.

देवी वर्ग - महिलांसाठी दुपारच्या वेळी भजन व अध्ययनाचा आठवड्यातून एक वर्ग. सामाजिक उपक्रम जसे अन्नदान, वस्त्रदान इ. वैद्यकीय शिबिरे इ.

शिशुविहार - संस्कार हे बालपणातच व्हावेत, याकरिता तीन ते पाच वर्षे वयोगटासाठी संस्कार वर्ग
 
बालविहार - पाच ते १२ वर्षे वयोगटासाठी साप्ताहिक वर्ग

किशोर केंद्र - १३ ते १७ वयोगटासाठी साप्ताहिक विशेष संस्कार व अभ्यास वर्ग. सहली, कार्यशाळा, वैदिकपाठ इ.
 
युवाकेंद्र - १८ ते ३२ वयोगटासाठी साप्ताहिक अभ्यास वर्ग. शास्त्राचे प्राथमिक अध्ययन, गतिशील अध्यात्माद्वारे सुप्त युवाशक्तीचा विकास. विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, नाटक, वाद-संवाद, सामाजिक कार्यक्रम वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, गिर्यारोण इ.

सेतुकारी वर्ग - ३५ ते ४५ वयोगटातील कर्मचारी वर्गासाठी. काळाप्रमाणे हा वयोगट जबाबदार्‍यांनी व्यस्त असतो. घर, लहान मुले, वयस्क मंडळी, सण, व्रत वैकल्ये, नातीगोती, व्यवहार, सामाजिक व्यवहार. अशांसाठी अतिशय मार्गदर्शक अभ्यास.

वानप्रस्थ संस्थान, पितामह सदन - वृद्धांसाठी प्रशिक्षण, शिबिरे, साधनेसहित निवासी व्यवस्था

सांदिपनी साधनालये - आत्मविद्या प्राप्त करणार्‍या मुमुक्षुंसाठी पूर्णवेळ वेदांत प्रशिक्षण. आश्रमात राहून प्राचीन गुरुकुल पद्धतीप्रमाणे सेवा, अध्ययन व साधना.

आश्रम, मंदिरे - आध्यात्मिक साधना, भक्ती, धार्मिक, सांस्कृतिक व्रत, पूजापाठ, वैकल्ये, सण, वार इ. साठी.

पुरोहित प्रशिक्षण - वैदिक सनातन धर्मातील पौरोहित्य - षोडष संस्कार विधी, जन्मानंतरचे षोडष संस्कार, वेद, ऋचा, पुराणे, मंत्र, स्तोत्र पाठ

चिन्मय वाणी (ग्रंथ प्रकाशन व विक्री), चिन्मय व्हिजन प्रोग्रॅम (आदर्श शिक्षण पद्धती), चिन्मय आंतरराष्ट्रीय निवासी विद्यालय, चिन्मय व्यवस्थापन संस्था (मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट), चिन्मय ग्राम विकास संस्था, चिन्मय आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान (चिन्मय इंटरनॅशनल फाऊंडेशन), चिन्मय विभूती, चिन्मय नादबिंदू, चिन्मय विश्वविद्यालय, चिन्मय मिशन हॉस्पिटल, चिन्मय अनाथालये, चिन्मय ऑर्गनायझेशन फॉर रूरल डेव्हलपमेंट, अशा अनेक स्वरूपातून ‘चिन्मय मिशन’ काम करते अशा या ‘चिन्मय मिशन’च्या कार्यास ७३ वर्षे झाली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून आधुनिक समस्यांवर कार्य करीत प्राचीन वैदिक हिंदू सनातन संस्कृती जपणे व उत्थान करणे, हे अविरत कार्य सुरू आहे. परमपूज्य गुरूदेवांच्या १०८व्या जयंती वर्षानिमित्त या कार्याचा लाभ समाजातील सर्वांना व्हावा, यासाठी हे अर्घ्यदान.


स्वामिनी निष्कलानंदा