ग गौरवचा आणि गझलेचा...

    07-May-2024
Total Views |
Gaurav Chavan

छंद असलेल्या क्षेत्रातच करिअर करायचे, हा मनाशी ठाम निश्चय करून, नव्याने शिकलेल्या उर्दू भाषेवर गझल लिहिण्यापर्यंत प्रभुत्व मिळवणार्‍या गझलकार गौरव चव्हाण यांच्याविषयी...
 
प्रत्येक कलाकाराने मानवी आयुष्यात आनंद पेरला आणि त्यातून आनंदाचेच पीक आले. कलाकार हा घडवला जात नाही, तर तो घडत असतो, आपल्या अंगभूत गुणांनीच! गौरव चव्हाण हे असेच एक कलाकार. सामान्य मराठी कुटुंबात जन्म झाल्यानंतर, दादरच्या बालकविहार या मराठी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे बालपणीच गौरव यांनी चित्रकला या विषयात ‘अखिल मुंबई बालभूषण पुरस्कार’देखील पटकाविला. तसेच ‘एलिमेंटरी’ आणि ‘इंटरमिजेट’ या परीक्षा ‘ए +’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण केल्या. पुढे क्रिकेटची आवड निर्माण झाली आणि फक्त क्रिकेटसाठी दादरमधील प्रसिद्ध शारदाश्रम शाळेत प्रवेश घेतला. पण, इथे आल्यावर मात्र रंगभूमीशी नाळ जोडली गेली, ती कायमचीच. शालेय जीवनात अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धा करत, त्या जिंकतच गौरव यांचा शालेय प्रवास पूर्ण झाला. मनात भिनलेली कलेची आवड आणि घरातील वाणिज्य शाखेचे पदवीधर यांंमुळे, नाखुशीनेच का होईना, अकरावीला वाणिज्य शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. पण, बारावीच्या महत्त्वाच्या वर्षाला, अचानक त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू शकला नाही. मग गौरव यांनी थेट प्रवेश घेतला तो, ज्या महाविद्यालयाने अनेक कलाकार घडवले, त्या रामनारायण रुईया महाविद्यालयात!

रंगभूमीची सेवा करण्याचे आपले स्वप्न इथे नक्की पूर्ण होईल, या एकाच इच्छेने रुईया महाविद्यालयात आलेल्या गौरव चव्हाण यांनी बारावीचे वर्ष काहीसा संयम ठेवत उत्तीर्ण केले. मग कला शाखेच्या पहिल्या वर्षापासूनच अभिनय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, नाटके, एकांकिका अशा स्पर्धांमधून गौरव स्वत:मधील कलाकाराला घडवत होते. याच कालखंडात त्यांची ओळख झाली ती उर्दू भाषेशी. गौरव यांच्या महाविद्यालयीन आयुष्यात ‘युथ फेस्टिव्हल’ या स्पर्धेत रुईया महाविद्यालय ‘परदा’ ही उर्दू एकांकिका करणार होते. त्यामध्ये एका मौलवीची भूमिका त्यांच्या वाटेला आली. इथेच पहिल्यांदा उर्दू भाषेशी त्यांचा संबंध आला. ही एकांकिका करताना भाषा हाच सगळ्यात मोठा अडसर असल्याचे गौरव यांच्या लक्षात आले. मग भाषेचा अभ्यास करण्यासाठी त्या भाषेतील मोठ्या साहित्यिकांचे साहित्य वाचण्यास त्यांनी सुरुवात केली. एखाद्या शब्दाचे उच्चार, त्याची लकब, त्याचा नेमका अभिप्रेत असलेला अर्थ, यासाठी अनेक तज्ज्ञांशी चर्चा करायला सुरुवात झाली. त्यातूनच गौरव यांना उर्दू भाषेचे सौंदर्य उमजत गेले. एकांकिका तर झाली, पण गौरव यांच्यावर आलेली उर्दूची मोहिनी काही केल्या कमी झाली नाही.

महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर आल्यावर, कला क्षेत्रातच काम करायचे, हे गौरव यांचे निश्चित होते. काही काळ या कलेशी निगडित क्षेत्रात काम केल्यावर, गौरव यांना एका प्रसिद्ध वृत्तपत्रात काम स्वीकारावे लागले. आयुष्याची दीड वर्ष कलेशिवाय राहावे लागल्याचे शल्य आजही मनाला असल्याचे गौरव सांगतात. पण, याच काळात त्यांनी आपल्यातल्या कलाकाराला जीवंत ठेवले, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेनेच! स्वातंत्र्यवीर पारतंत्र्यात अंदमानात कविता करत होते, मी तर मग स्वतंत्र देशात राहतोय. याच विचारातून नोकरीतून मिळणार्‍या फावल्यावेळात गौरव यांनी उर्दू गझला लिहायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मित्र हेच त्यांचे हक्काचे श्रोते. पण, नंतर मात्र आयुष्यात एक हक्काच श्रोता आला, तो म्हणजे त्यांची अर्धांगिनी. आजही त्यांच्या पत्नी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे साहजिकच मनाला एक सामर्थ्य मिळत असल्याचे गौरव अभिमानाने सांगतात. पुढे वृत्तपत्रातील नोकरी सोडल्यावर मात्र कला क्षेत्रातच आयुष्य घडवायचे, हे त्यांनी निश्चित केले. या क्षेत्रात घरातील कोणीही ‘गॉडफादर’ नव्हते आणि समोर दिसणारा संघर्ष अटळ होता. जे होते ते रुचत नव्हते आणि जे हवे ते मिळत नव्हते, असाच तो काळ होता. पण, याही काळात त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला.

दरम्यान, हक्काच्या ‘रुईया कट्ट्या’वरच्या चिन्मय मुनघाटे, योगेश घोले, सुशांत रिसबुड या मित्रांना कविता वाचून दाखवणे चालूच होते. गौरव यांचेे हे मित्रदेखील हिंदीत उत्तम कविता करणारे. त्यामुळे कट्ट्यावरच मैफिल रंगत होती. गौरव यांच्या टीमला पहिली संधी दिली, ती त्यांच्याच मित्र असणार्‍या अरूण कवल्लूर या मित्राने. त्याने दिलेल्या संधीमुळेच, ‘क्या कहने’ या कार्यक्रमाचा जन्म झाल्याचे गौरव आवर्जून सांगतात. आज गौरव आणि त्यांचे मित्र, ‘क्या कहने’ या गझल सादरीकरणाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. काही महिन्यांतच या कार्यक्रमाचे १८ प्रयोग झाले असून, पुढचा प्रयोग दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ११ मे रोजी होणार आहे. भविष्यात संधी मिळाल्यास स्वातंत्र्यवीरांच्या उर्दू गझलांना चालबद्ध करण्याचे स्वप्न असल्याचे गौरव सांगतात.

भारत को अब मन से जो नमन ना करे
ख़ास उनसे कोई हमदर्दी वतन ना करे
नफ़रतें प्यारी हैं उन्हे पर भारत देश नहीं
उन लोगों को इस मिट्टी में दफन ना करे

असा राष्ट्रभक्तीचा विचार घेऊन, नवीन कलाकृतीच्या माध्यमातून रंगभूमीची सेवा करणार्‍या गौरव चव्हाण यांना पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!


- कौस्तुभ वीरकर