कुलगुरू आणि दु:खी राहुल

    07-May-2024   
Total Views |
Rahul Gandhi

छत्रपती शाहू महाराज विद्यापीठाचे कुलगुरु आणि भारतीय विश्वविद्यालय संघाचे उपाध्यक्ष प्रा. विनय कुमार पाठक यांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या २०० कुलगुरुंनी राहुल गांधी यांना निषेधाचे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ”कुलगुरुंची नियुक्ती गुणवत्तेनुसार नाही, तर एका विशिष्ट संघटनेच्या इशार्‍यावर केली जाते असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे राहुल यांनी देशभरातील विद्यापीठांची बदनामी केली आहे.” यावर वाटते की, राहुल गांधी कुलगुरुंची, देशातल्या विद्यापीठांची अशी बदनामी का करत आहेत? काही लोकांना वाटते की, राहुल गांधी बालिश आहेत. पण, हा एक गैरसमजच. खरं तर, राहुल गांधींसारखा चतुर नेता भारतात नाही. काहीही काम न करता, देशात विरोधी पक्षाचा सर्वेसर्वा म्हणून टिकून राहणं सोपी गोष्ट आहे का? परदेशात जाऊन देशाबद्दल प्रतिकूल, वाईट बोलायचे, देशावर टीका करायची आणि परत त्याच देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवायची, हे राहुल गांधी यांना चांगले जमते. जानवे, टोपी आणि क्रॉस यांना कधी, कुठे, कसे वापरायचे याचे त्यांना उत्तम ज्ञान. ‘संविधान धोक्यात आहे, भाजप आरक्षण संपवणार, दलित अल्पसंख्याकांचे हक्क संपवणार’ अशी भाषा काय ते बालिश म्हणून करत असतात का? तर अजिबात नाही. असे करून त्यांना देशातल्या गरीब आणि श्रीमंतांचे विभाजन करायचे असते. हिंदू धर्माच्या जातीचे विभाजन करायचे असते. आताही देशातल्या कुलगुरुंच्या नियुक्तीवर संशय घेताना राहुल यांचा मानस काय असेल? तर सरळ आहे, विद्यापीठांमध्येही रामनाम, हिंदुत्व स्वत:सोबत देशाचा विकास आणि मोदींबद्दल बोलणारी तरूणाई प्रकटली आहे. काँग्रेसच्या काळातली जेएनयु सगळ्यांना माहिती आहेत. त्यातल्याच ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ असे म्हणणार्‍या कन्हैयाला काँग्रेसने दिल्लीतून उमेदवारी दिली. कदाचित राहुल यांना चिंता असावी की, विद्यापीठांमध्ये कन्हैया, उमर खालीद, शरजील इमामसारखे विद्यार्थी सध्या घडताना दिसत नाहीत. त्यामुळे देशाचे तुकडे करण्याची भाषा करणारे विद्यार्थी आता कमी झालेत. याला काारणीभूत कुलरुगुच आहेत. कारण, ते आता असे विद्यार्थ्यांचे फाजील-फालतू लाड करत नाहीत. कुलगुरु देशभक्त, धर्मसमाजनिष्ठ असून, ते देशाच्या युवापिढीला योग्य ते वळण देत आहेत, याचे तर दु:ख राहुल गांधींना नसावे?
 
समाजाची फसवणूक : रोहित

२०१६-१७ साली कबिरांचे नाव घेऊन चालणार्‍या संघटनांचे लोक डफली वाजवत म्हणायचे, ‘शाहू, फुले, आंबेडकरांना लाल सलाम! दलिताच्या पोराला रोहित वेमुलाला लाल सलाम!’ पण, नुकताच काँग्रेसशासित तेलंगण सरकारच्याच पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट मांडला की, रोहित हा मागासवर्गीय नव्हताच, तर त्याच्या आईने खोटे सर्टिफिकेट बनवले. रोहितने आधी एका विषयात पीएचडी पूर्ण न करताच सोडली. मग दुसर्‍यांदा दुसर्‍या विषयावर पीएचडी करायला घेतली. पण, अहवालानुसार पीएचडी विषयाचा अभ्यास कमी आणि विद्यापीठातील जातीपातीच्या राजकारणामध्येच रोहित मश्गुल असे. मागासवर्गीय जातीच्या आधारे त्याला शिक्षणासाठी दरमहा २५ हजार रूपयेही मिळत होते, ते काही त्याच्या आईच्या घरखर्चासाठी दिले जाणारे पैसे नव्हते. मात्र, रोहितच्या आत्महत्येनंतर त्याच पुरोगामी तथाकथित मानवतावाद्यांनी म्हटले की ”गरीब, दलित रोहितच्या घरी २५ हजार रुपये घेऊन जायचे म्हणून हिंदुत्ववादी लोकांना ते आवडले नाही. त्यामुळे त्याची तक्रार करून ते पैसे द्यायचे थांबवले.” पण, न्याय, सत्य काय आहे? रोहितने खोटे सर्टिफिकेट बनवले नसते, तर कदाचित एखादा मागसवर्गीय विद्यार्थी त्या जागी शिकत असती. मागासवर्गीय बांधवांचा हक्क लाटून वर त्यांच्यासाठीच काम करतो, असा आव आणणार्‍या रोहितला डाव्या चळवळीने ‘हिरो’ ठरवले. नुकतेच जाहीर झालेल्या अहवालानुसार, खोटे जात सर्टिफिकेट लावले, आपण केलेली लबाडी उघड झाली, तर आधीच्या जातीच्या आधारे घेतलेल्या शिक्षणातून मिळालेल्या शैक्षणिक पदव्या परत घेतल्या जातील, अशी रोहितला भीती होती. या दडपणातूनच त्याने आत्महत्या केली. यावर रोहितच्या आईने म्हटले की, रोहित मागासवर्गीय नव्हता, हे पोलिसांना कुणी सांगितले? खरं तर आई असल्यामुळे रोहितची खरी जात कोणती, हे त्या सिद्ध करू शकतात. पण, तसे होताना दिसत नाही. मृत्यूनंतर सगळे संपते हे खरेच. तरीसुद्धा अहवालानुसार रोहित मागासवर्गीय नसेल, तर रोहितने वरवर बाबासाहेबांचे नाव घेत गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलती लाटल्या, हे समर्थनीय नाही. तसे करून त्याने आंबेडकरी समाजाची फसवणूक केली, हे दृष्टीआड करता येत नाही.


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.