आवाज कुणाचा!

    06-May-2024
Total Views |
दिवसेंदिवस वाढणार्‍या प्रदूषणाचे परिणाम भोगत असतानाच ध्वनिप्रदूषणाचे ही अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत, ध्वनिप्रदूषणाच्या याच उद्रेकाविषयी...


noise pollution

नुकतीच, 24 एप्रिलला आग्य्र्र्रात झालेली घटना, डीजेवर कोणती गाणी लावायची, याची बाचाबाची होऊन शेवटी वधुपित्याला ठार करण्यापर्यंत त्याची परिणती झाली. ’आवाज वाढव डीजे तुला...’ अशा गाण्याच्या तालावर भन्नाट नाचणारी प्रजा पाहून गदगदून येते. प्रचंड मोठ्या खोक्यातून अनेकपट वाढवलेला आवाज माणसाच्या सर्व संवेदना नष्ट करतो. हे डीजे संगीत जाता-जाता कानांची हानी करूनही जात असेल. पण, आपल्या जनमानसाला ध्वनिप्रदूषणाच्या खोलात जायची गरज वाटत नाही.

गोंगाट म्हणजे नको असलेला ध्वनी. पण, एखाद्याला नको असलेला ध्वनी दुसर्‍याला मनोरंजनाचे साधन वाटत असेल, तर? भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मुंबईला जगातील सर्वात गोंगाट करणारे शहर म्हणून ‘बहुमान’मिळाला आहे. शहरातील अफाट रहदारी आणि मनोरंजनाची अनेकविध साधने यामुळे 100 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनिपातळी आपल्या मुंबईची आहे. शहरातल्या विविध भागांची पाहणी डेसिबल मापकाने करून ‘नॉईस मॅपिंग’ केले जाते. किती सुसह्य आवाज असला पाहिजे आणि प्रत्यक्षात किती आवाज आहे, याचे परिमाण या नॉइस मॅपिंगमुळे लक्षात येते. मुंबईत या ध्वनिपातळी 70 ते 80 डेसिबल इतक्या जास्त आहेत. म्हणजेच, आपले आणि आपल्या अधिवासात राहणार्‍या अनेक पशुपक्ष्यांचे मनःस्वास्थ्य आणि आरोग्य संपुष्टात आणणार्‍या आहेत. कोणतेही सेलिब्रेशन, समारंभ आवाजाशिवाय होणारच नाही, अशी आपली धारणा असते. तसे नैसर्गिक कारणांनीदेखील ध्वनिप्रदूषण होऊ शकते, जसे, भूकंप, वादळवारे गडगडाट, विजेचा कडकडाट, चक्रीवादळ, ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे. अशा कारणांनी होणार्‍या नैसर्गिक ध्वनिप्रदूषणाला माणसाला आवरता येणार नाही. पण, मानवानेच निर्माण केलेल्या आवाजाला तर आपण बंद करू शकतो!

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवणारा हा आवाज अवास्तव तणावाचा स्रोत आहे. वाहने, औद्योगिक कारणांनी निर्माण होणारे यंत्रांचे आवाज, केकाटत राहणारे लाउडस्पीकर्स, ध्वनिप्रदूषणाच्या सोबतीने हवाप्रदूषण करणारे फटाके, अशा अनेक कारणांनी ध्वनिप्रदूषण होत असते. दूरदर्शन, ट्रान्झिस्टर, रेडिओ अशी आपल्या घरात असणारी मनोरंजनाची साधने आपण वाजवीपेक्षा जास्त आवाजात वाजवून ध्वनिप्रदूषण निर्माण करत असतो. शांतता क्षेत्रात ध्वनीची मर्यादा 50 डेसिबल असायला हवी. हॉस्पिटल, शाळा अशा ठिकाणी असे शांतता क्षेत्र असणे स्वाभाविक आहे. घरात आवाजाचे प्रमाण 55 ते 60 डेसिबलपर्यंत जाते, तर व्यापारी क्षेत्रात ते 65 पर्यंत जाते. या सर्व ध्वनिपातळ्या सखोल अभ्यासानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ठरवल्या आहेत. पण, लक्षात कोण घेतो?

आवाजामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश, अ‍ॅड्रिनलीन आणि कॉर्टिसॉल यासारख्या संप्रेरकांचा समतोल बिघडणे अशा अनेक नकारात्मक परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते. याशिवाय, श्रवणशक्ती कमी होणे, कधी-कधी ठार बहिरेपण येणे, या बाबी सहज घडतात. वाढलेल्या रक्तदाबामुळे डोकेदुखी, मळमळणे, पचनक्रियेत अडथळे हे परिणाम होतच असतात. विद्यार्थी किंवा एकाग्र चित्ताने काम करणार्‍या लोकांना आवाजाचा विलक्षण त्रास होतो. प्राण्यांनाही आवाजाचा खूप त्रास होतो. कुत्रे-मांजर हे पाळीव प्राणी आवाजाने घाबरून जातात. दिवाळीच्या सुमारास यांना पशुवैद्यक खास गोळ्या देऊन शांत ठेवतात. गायीगुरांवर आवाजामुळे होणार्‍या अनेक परिणामांपैकी ‘दूध आटणे’ हे महत्त्वाचे आहे. तसेच गोंगाटाच्या परिसरातील कोंबडी अंडी देण्याचे बंद करते. मिरवणुकीतील घोडे, हत्ती यांची तर करुणा करावी तेवढी थोडीच. पक्षी आवाजामुळे घाबरून अधिवास सोडून जातात. कित्येक तर कानठळ्या बसून मरतातदेखील.

छोटी बाळे आणि वृद्ध नागरिक आवाजामुळे त्रस्त होतात. जन्मतःच मुलांना आवाजाची भीती असते. पण, हेच मूल 17-18 वर्षांचे झाले की, आवाज वाढव डीजे या संस्कृतीचे पाईक होते किंवा कानांत सतत ‘बुचे’ घालून वावरते. या ‘ईअर बड्स’ किंवा ‘हेडफोन्स’ मुळे यांच्या श्रवणशक्तीवर विपरित परिणाम होतात. ध्वनिप्रदूषित ठिकाणी राहणार्‍या लोकांनादेखील ओरडून बोलायची सवय लागते. ध्वनिप्रदूषणाने संभाषणात अडथळा येऊन संभ्रम निर्माण होतात.

शासकीय पातळीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कायदेदेखील झाले. या कायद्याला ध्वनी प्रदूषण (नियंत्रण आणि नियमन), नियम 2000 छेळीश झेश्रर्श्रीींळेप (ठशर्सीश्ररींळेप रपव उेपीीेंश्र) र्ठीश्रशी, 2000 असे म्हटले जाते. या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला ध्वनिवर्धक (लाउडस्पीकर), कोणताही आवाज किंवा संगीतही निर्माण करणारे यंत्र, रात्री 10 नंतर लावता येत नाही. अशा आवाजाने स्थानिक व्यक्तींना निद्रानाश किंवा इतर त्रास होऊ शकतो. मात्र, बंद हॉल, नाट्यगृह अशा ठिकाणी आवाजनिर्मिती करता येऊ शकते.

आवाजाचा त्रास होत असेल तर कोणीही पोलिसाला 100 नंबरवरुन तक्रार देऊ शकतो. मात्र, आपल्या जनमानसाची मानसिकता, मजा आणि आवाज यांचे एकत्र वास्तव्य असेच असल्याने कोणीच त्याला विरोध करत नाही. विविध धर्मांच्या स्थळी आणि प्रत्येक मिरवणूक आणि कार्यक्रमाच्या वेळी कानठळ्या बसवणारा आवाज हवाच, अशी आमची मनःधारणा आहे. फटाक्यांच्या आवाजाने अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. दिवाळीच्या सुमारास रक्तदाब वाढलेल्या रुग्णांची संख्या ठळकपणे निदर्शनाला येते. दमेकरी आणि इतर श्वसनसंस्थेच्या रुग्णांनादेखील अशाच फटाक्यांपासून धोका संभवतो. हा तर ध्वनिप्रदूषणाच्या पलीकडला अजूनच एक परिणाम!

का नाही आम्ही बदलत? हजारो वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी आवाज करणे आवश्यकदेखील असेल. पण, आता जंगलेच नष्ट झाली. जनावरे संपली आणि माणसे जनावरे झाली, अशी परिस्थिती आहे. कायदे करून थोडेफार साध्य होईलदेखील, पण आपण स्वतःच या बाबतीत बदलणे आवश्यक आहे. सकाळच्या प्रहरी शांतपणे पक्ष्यांची सुमधुर किलबिल ऐकावी. निसर्गातील कमी डेसिबलचे आल्हाददायक आवाज ऐकावा. काकडआरतीच्या नावाखाली चालणारा बेसूर आणि भेसूर आवाज लाऊडस्पीकर बाहेरच्या बाजूला वळवून आसमंतात सोडू नये. तसेच बांग द्यायची असेल तर लाउडस्पीकरचा कर्णा प्रार्थनास्थळाकडेच आत वळवावा. मुळात ईश्वर असो वा अल्ला दोघांनाही शांतताच प्रिय असते, कारण, या शक्तिस्रोतासमोर लीन होताना आपण एकाग्रतेने त्याला शरण जावे, निसर्गाला जपावे. हे प्रदूषण व्हावे ही श्रींची इच्छा मुळीच नसते. आपणच त्याला आळा घातला पाहिजे.
- डॉ. नंदिनी देशमुख