येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळणार

हवामान विभागाचा इशारा; सतर्कतेचे आवाहन

    04-May-2024
Total Views |


IMD latest update

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय हवामानशास्र विभाग (IMD) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीस (INCOIS) यांच्यामार्फत शनिवार दि. ४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० पासून ते रविवार दि. ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत, या ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याचा (IMD) हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, येत्या ३६ तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे, तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आलंय. (IMD)

अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (IMD)


उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे देखील आवाहन करण्यात येत आहे. तसेच, किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. तसेच, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारीचेही आवाहन करण्यात आलं आहे. (IMD)