पाकिस्तानहून आलेले २५० रामभक्त श्रीरामललाचरणी लीन

    04-May-2024
Total Views |

Pakistan Rambhakt

मुंबई (प्रतिनिधी) :
अयोध्येत २२ जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर श्रीरामाचे भव्य मंदिर (Ram Mandir) भाविकांसाठी खुले करण्यात आले. रामललांचे दर्शन घेण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून लोक अयोध्येत येत आहे. पाकिस्तानहून आलेल्या २५० रामभक्तांनी अयोध्येत शरयू नदीत स्नान करून रामललांचे नुकतेच दर्शन घेतले व मनोभावे पूजाही केल्याचेही समोर येत आहे. अयोध्या सिंधी समाज आणि सिंधी सेंट्रल पंचायतीतर्फेही या भाविकांचे स्वागत करण्यात आले.

पाकिस्तानातील सुमारे ३० शहरांतील २५० सिंधी भाविकांनी आपल्या अयोध्या दौऱ्यादरम्यान श्रीराम मंदिराबरोबरच हनुमानगढ़ी, कनक भवन, नंदीग्राम यासोबतच काही प्राचीन मंदिरांनाही भेटी दिल्या आहेत. छत्तीसगडच्या रायपूर येथील प्रसिद्ध शदानी दरबारचे प्रमुख साई डॉ. युधिष्ठिर लाल यांनी या रामभक्तांच्या गटाचे संयोजन केले होते. ज्याप्रमाणे पाचशे वर्षांनंतर रामजन्मभूमीवर भव्य श्रीराम मंदिर बांधले गेले, त्याप्रमाणे सिंध प्रांतही एक दिवस भारताचा भाग बनेल; असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हे वाचलंत का? : रोहित वेमुलाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी होणार! 'हे' आहे कारण

भारतात पूर्ण शांतता असून रात्री उशिरापर्यंत लोक रस्त्यावर फिरू शकत आहेत. सर्व सण उत्साहाने आणि श्रद्धेने साजरे केले जात आहेत, मिरवणुका काढल्या जात आहेत. पाकिस्तानात मात्र खुलेपणाने सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य नाही. अशी खंत पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जवाहर येथील गोविंद राम माखेजा या रामभक्ताने व्यक्त केली. सोबतच राम मंदिराच्या उभारणीमुळे पाकिस्तानातील सिंधी समाजात उत्साह असल्याचे सिंधमधील मीरपूर माथेलो येथील रहिवासी ओमप्रकाश यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनाने भारताचे नशीब आणि चित्र बदलले असल्याचेही काहींनी यावेळी म्हटले.