नानाराव ढोबळे कर्मयोगी भक्त

    04-May-2024
Total Views |
chattisgarh

रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील प्रमुख प्रचारक व प्रांताचे बौद्धिक प्रमुख असलेल्या गोविंद श्रीधर तथा नानाराव ढोबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने या पुण्यात्म्याचे पुण्यस्मरण करणारा हा लेख...
 
नानांचा व माझा प्रत्यक्ष परिचय कधी झाला, ते आता नेमके आठवत नाही. परंतु, ते तेव्हा नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा जो ‘नाशिक विभाग’ म्हणून संघरचनेत ओळखला जात असे, त्या विभागाचे विभाग प्रचारक होते. १९६० ते १९७०च्या दशकात ते विभाग प्रचारक होते. तत्पूर्वी जवळजवळ दहा वर्षांपर्यंत ते धुळे जिल्हा प्रचारक होते. संघाचा प्रचारक म्हणजे अविवाहित राहून, स्वतःचे घरदार सोडून संघकामासाठी पूर्णवेळ देणारा कार्यकर्ता. कै. नानाही असेच नोकरी सोडून १९४४ पासून संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले, ते जीवनाच्या अंतापर्यंत म्हणजे दि. १५ ऑगस्ट १९८६ पर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त संघकार्यच केले.
 
१९४५ ते १९४७ हा काळ देशाच्या दृष्टीने अत्यंत धामधुमीचा होता. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात आले असतानाच, देशाची फाळणी होण्याची चिन्हेही दिसू लागली होती. त्यामुळे सामान्य माणसांच्या विशेषतः हिंदूंच्या मनात एक प्रकारची असुरक्षिततेची भावना व अस्वस्थता निर्माण झालेली होती. रा. स्व. संघ हिंदूंचे संघटन करण्यासाठी निर्माण झालेला असल्याने, सर्वत्र संघाविषयी एक विश्वासाची भावना हिंदूंमध्ये स्वाभाविकपणे होती. त्यातून संघशाखांची संख्या व शाखेवर येणार्‍यांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली होती. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊ नये, असे सर्वच देशभक्त नागरिकांना तीव्रतेने वाटत होते. दुर्दैवाने देशाची फाळणी झाली. महात्मा गांधींची हत्या झाली. संघावर बंदी घातली गेली. संघ स्वयंसेवकांनी मोठा सत्याग्रह केला. त्यात सहभागी झाल्याने अनेकांच्या नोकर्‍याही गेल्या. हजारो स्वयंसेवकांना तुरुंगवास झाला.
 
याच्या जोडीला राजकीय पक्षांचा संघविरोधी प्रचार शिगेला पोहोचला होताच. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सामान्य नागरिक संघापासून दुरावला. संघात गेल्यामुळे आपली नोकरी जाईल, व्यवसायावर परिणाम होईल, या भीतीपोटी लोक आपला संघाशी संबंध लपवू लागले. अशा विपरित-विरोधी वातावरणात संघ प्रचारक अत्यंत कष्टपूर्वक संघाचे काम करत होते. प्रेमभावनेने लोक संघकार्यास जोडण्याचे काम सातत्याने करीत राहिले. नानाराव ढोबळे हे अशा कष्टाळू आणि श्रद्धावान प्रचारकांमधील अग्रणी होते. मराठवाड्यात कै. दत्ताजी भाले, कै. जनुभाऊ रानडे, प. महाराष्ट्रात कै. दामुअण्णा दाते, सोलापूर धाराशीवमध्ये कै. सुरेशराव केतकर, कोकणात कै. वसंतराव केळकर, कै. दामुअण्णा टोकेकर, अशी कितीतरी नावे घेता येतील की, ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अक्षरशः शेकडो तरूणांना संघकार्यासाठी प्रेरणा दिली.
 
एक अत्यंत भावनाशील व्यक्तित्व लाभलेले नाना प्रभावी असे वक्तेही होते. भाषणात देशाची व हिंदू समाजाची दुःस्थिती श्रोत्यांसमोर ठेवताना त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांतही अश्रू येत व श्रोत्यांच्याही. इतिहासातील संदर्भ देताना ऐकणार्‍यांचे भान हरपून आपणही आपल्या देशासाठी असा त्याग व पराक्रम केला पाहिजे, हे स्फुरण चढत असे. ‘समाजातील सर्व घटक माझे बंधूच आहेत. त्यांच्याशी माझा व्यवहार किती आत्मीयतापूर्ण असला पाहिजे,’ हे सांगताना त्यांच्या खेडोपाडी झालेल्या प्रवासातील अनेक अनुभव अशा शब्दांत मांडत असत की, त्यात उल्लेख केलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा ऐकणार्‍याच्या मनात तीव्रतेने येत असे. असे अनुभव सांगताना त्यांच्या बोलण्यात संत साहित्यातील संदर्भ, अभंग, ओव्या अशा सहजपणे येत की, त्यामुळे त्यांचा अभ्यास व त्याचे जीवनातले प्रकटीकरण श्रोत्यांच्या समोर मूर्तिमंत उभे आहे, असे वाटत असे.
 
त्यांचे स्वतःचे सर्वांशीच वागणे-बोलणे इतके हृदयापासून व आत्मीयतेने ओतप्रोत असे की, त्याचा प्रभाव समोरच्यावर पडल्याशिवाय राहत नसे. सुमारे ६०-७० वर्षांपूर्वीच्या त्या काळात संघाची कार्यालये सर्वत्र नसत. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेच, तर एखाद्या भाड्याच्या जागेत असत. संघ प्रचारकांचा निवास कार्यवाह संघचालकांच्या वा अन्य एखाद्या प्रमुख कार्यकर्त्याच्या घरीच असे. शहरात वा गावात पायी हिंडूनच गाठीभेटी होत असत. अन्य गावी जायचे झाल्यास एसटी वा रेल्वे हेच साधन. तालुक्याच्या अंतर्गत तर पायीच जावे लागे. धुळे जिल्ह्यासारख्या वनवासीबहुल (त्यावेळी आजचा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातच होता) जिल्ह्यात नानांचा शेकडो किमीचा असा पायी प्रवास रणरणत्या उन्हात झाला. या प्रचंड पायपिटीमुळे पुढे त्यांना टाचेचे दुखणे जडले ते कायमचेच!
 
त्यांची राहणी अतिशय साधी. दुटांगी धोतर, पांढरा सदरा असा वेश. त्यांना झब्बा घातलेलेही कधी बघितले नाही. सदोदित प्रसन्नवदन असलेले नाना रस्त्यात दुरून जरी दिसले तरी धावत जाऊन त्यांना भेटावे-बोलावे असे वाटे, अशी जादू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. त्यांचे हास्य त्यांच्या हृदयापासून असलेला स्नेह, प्रेम प्रकट करत असे व तेच समोरच्याच्या हृदयास भिडत असे. त्यामुळे कोणीही त्यांच्याशी मोकळेपणे बोलू शकत असे. असा संवाद होण्यापूर्वी कितीही मनःस्ताप देणारा प्रसंग घडून गेलेला असला, तरी त्याचा लवलेशही त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नसे वा बोलण्यातूनही जाणवत नसे. सदा प्रसन्न आणि अत्यंत प्रेमळ असे त्यांचे व्यक्तित्त्व होते. त्यांचे सर्वांवरच निःस्वार्थ, निरपेक्ष मातृवत प्रेम होते. अनेकांची अनेक कौटुंबिक कामेही ते आनंदाने करीत असत, तेही अशा सहजतेने की, ते जणू त्या कुटुंबाचे सदस्यच आहेत. त्यामुळे ते अनेक कुटुंबांतील ज्येष्ठ सदस्य होते.
 
त्यामुळे अनेक कुटुंबांना त्या कुटुंबातील सुखदुःखाच्या प्रसंगी नाना आपल्या जवळ असावेत, असे मनापासून वाटत असे. सुखाच्या प्रसंगी त्यांचा पवित्र प्रेमळ खेळकर सहवास लाभून आनंद द्विगुणीत व्हावा आणि दुःखाच्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या सांत्वनेमुळे धीर येऊन आल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याचे बळ प्राप्त व्हावे, अशी भावना बाळगणारी शेकडो कुटुंबे व स्वयंसेवक या तीनही जिल्ह्यांत आहेत. कौटुंबिक कलहसुद्धा त्यांनी सामोपचाराने मिटविलेले मला माहीत आहे. अशा प्रसंगी त्या वादातील ज्या व्यक्तीला आपल्यावर अन्याय झाला, असे वाटून त्यांचा राग व रोषही नानांनी सहन केला व त्यांच्याशीही पूर्ववत प्रेमळ व्यवहार ठेवला. कालांतराने अशा व्यक्तींना नानांच्या निःस्वार्थ, निरपेक्ष प्रेमाची प्रचीती येऊन आपण नानांवर उगीच राग धरला, असा पश्चात्तापही होई. नानांची भूमिका मात्र एका पद्यात म्हटल्याप्रमाणे’कलह मिटावे परस्परांतील, ऐक्य बीज रुजवावे! ऐक्याच्या वटवृक्षावर संघपुष्प विलसावे! स्वदेश सेवे वाचुनी दुसरा पंथ अम्हांस नसावा’ हीच राहून सर्वांनी संघकार्यात सक्रिय राहावे, हीच असे. यासाठीच ते झिजत होते.
 
’आत्मवत् सर्व भूतेषु’ असे अलौकिक जीवन जगणारे नाना प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य माणसासारखे जगत, दिसत, वागत व बोलत असत. सर्वसामान्य माणसे, स्वयंसेवक कार्यकर्त्यांमध्ये ते मिसळून जात. त्यांच्याशी समरस होत असत. त्यांच्यातील असामान्य गुणवत्तेचे त्यांना फार कौतुक वाटत असे व ती गुणवान माणसे समाजासमोर यावीत, यासाठी त्यांनी ‘समाजतळातील मोती’ हे पुस्तक लिहून त्यात खेड्यापाड्यांत राहणार्‍या अनेकांचे वर्णन केले आहे. अशा सर्वसामान्य माणसांसाठी ते खपत होते. त्यांच्यावरच निष्ठा व विश्वास ठेवून काम करीत होते. बा. भ. बोरकरांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे ’अंगीकारीली ज्यांची निष्ठा, त्यांच्यास्तव ठोकरून प्रतिष्ठा! परलोकाहून प्रियकर आम्हा श्वानाचा विश्वास, आम्हाला चिरंतनाचा ध्यास!’ संघटित एकात्म समरस हिंदू समाज उभा करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता.
 
याच भूमिकेतून त्यांनी समाजातील अशिक्षित, दीनदुबळ्या, उपेक्षित, वंचित राहिलेल्या समाजघटकांसाठी धुळे जिल्ह्यातील १०० टक्के भिल्ल वस्तीच्या अक्कलकोस या गावात एक सहकारी शेतीचा प्रयोग केला होता. दुर्दैवाने त्याला पहिल्या वर्षी यश आले नाही. परंतु, समाजातील चांगुलपणावर आत्यंतिक विश्वास ठेवणार्‍या नानांनी पुढच्या वर्षीही तो प्रयोग संघाच्या स्थानिक प्रमुख स्वयंसेवकांचा विरोध असतानाही केला व काही प्रमाणात तो यशस्वी झाला. परंतु, पुढच्याच वर्षी आणीबाणी लागू होऊन संघावरही बंदी आली व तो प्रयोग पुढे सुरू ठेवता आला नाही. परंतु, नानांचा समाजातील चांगुलपणावर असलेला दृढ विश्वास व याच प्रयोगात केवळ नानांच्या शब्दाखातर आपली खासगी कामे बाजूला ठेवून सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची नानांवर असलेली श्रद्धा, आदर व विश्वास ठळकपणे दिसून आला.
 
शेवटचे आजारपण सोडले, तर नानांना विश्रांती घेताना कधी मी तरी बघितलेले नाही. त्यांच्या या तपःपूत जीवनामुळे त्यांच्या सहज बोललेल्या वाक्यांनाही सुभाषितांचे मूल्य प्राप्त झाले होते. एकदा जळगाव येथे एक क्षेत्रीय स्तरावरच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची तीन दिवसांची बैठक होती. त्या बैठकीची व्यवस्था जळगाव शहर कार्यवाह यांनी करायची होती. काही महत्त्वाच्या कामासाठी कार्यवाहंना त्याच कालावधीत बाहेरगावी जाणे भाग पडले. त्यांनी अन्य कार्यकर्त्यांना ही जबाबदारी सोपवली. बैठक नीट पार पडली. व्यवस्थाही चांगली झाली. काही दिवसांनी नाना जळगावला आले असता शहर कार्यवाह त्यांना म्हणाले, ’‘नाना, माझ्या लक्षात आले आहे की, मी येथे असताना जी व्यवस्था झाली असती, त्यापेक्षाही अधिक चांगली मी नसताना झाली.” त्यावर नाना लगेच म्हणाले, “अण्णा, म्हणूनच आपण असून नसल्यासारखे राहायला शिकले पाहिजे.” माझ्या दृष्टीने हे वाक्य सुभाषितच नव्हे, तर अमृतवचन आहे. या प्रसंगानंतर हेच अण्णा दोन वर्षे प्रचारक म्हणून गेले होते. हा नानांच्या बोलण्याचा प्रभाव होता.
 
ऐकणार्‍याला भारून टाकणारे वक्तृत्व ही नानांना काही जन्मजात किंवा अनुवांशिक देणगी नव्हती, तर संघकार्य करत असताना त्यांच्या हृदयात जागृत झालेल्या समाज आणि मातृभूमीची भक्ती यांचे ते प्रकटीकरण होते. त्यांचे ध्येयासाठी जे संपूर्ण समर्पण होते, त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून त्यांचे वक्तृत्व असे ओजस्वी व परिणामकारक झालेले होते. बाराव्या अध्यायात भगवंतांनी भक्ताची जी ३६ लक्षणे सांगितली आहेत, ती सर्वच्या सर्व नानांच्या जीवनात प्रकट झालेली आपण बघतो. अशा या कर्मयोगी भक्ताच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना ही शब्दसुमनांनी वाहिलेली आदरांजली. नानांच्या स्मृतीस शतशः वंदन...
-गोविंद यार्दी
९७६३७२५७२९