आठवणीतले नाना...

    04-May-2024
Total Views |
nana
 
हिंदू समाज हा सर्वधर्मीयांना समानतेने वागवणारा आहे. ही त्याची स्वाभाविक मनोधारणा आहे. हिंदू या देशात अल्पसंख्याक झाला, तर धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभावच काय, तर देशाची हजारो वर्षांची समृद्ध संस्कृती व एकमेव असलेले हिंदूंचे स्थान नष्ट होईल. असे हे विपरीत घडू नये, हिंदू समाज संघटित व्हावा. संघटनेत बळ असते. सर्व समाजाचे सुख-दु:ख एक असते. आम्ही सर्व एक आहोत. भाऊ-भाऊ आहोत, हे तत्व, विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचे रान केले, आयुष्याची आहुती दिली, हिंदू समाज संघटन हेच ध्येय ठेवून जीवनभर कणाकणाने व क्षणाक्षणाने जे जे अंतिम श्वासापर्यंत झिजले, त्यातील माझ्यासारख्या स्वयंसेवकांनी साक्षात सहवासाने अनुभवलेले नानाराव ढोबळे. ‘नाना’ याच नावाने हजारो स्वयंसेवक त्यांना ओळखत. त्यांचे नाव गोविंद श्रीधर ढोबळे. स्वत:च्या नावाच्या प्रसिद्धीचा मोहसुद्धा त्यांच्या मनाला कधी शिवला नाही.
 
गत १०० वर्षे नानाराव ढोबळे यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी अहोरात्र संघकार्याच्या वाढीसाठी परिश्रमांची पराकाष्टा केली. समाजाच्या सर्व क्षेत्रात संघकार्याचा विस्तार केला. संघ शाखा हे संघकार्याचे शक्तीस्थान-संघस्थान! त्यातून समाजासाठी, देशासाठी प्रसंगी प्राणांची पर्वा न करता कार्यकर्ते घडले, घडतात.
 
नानाराव ढोबळे मूळचे जळगावचे. तारुण्यात पदार्पण करतानाच संघकार्याच्या रूपाने चालणार्‍या देशकार्यात स्वत:ला झोकून देण्याचे त्यांनी ठरवले. असे ठरविणे, निश्चयाने ते निभावणे सोपे नव्हते. संघकार्य म्हणजे काट्या-कुट्यांचा मार्ग असल्याचे भान संघ स्वयंसेवकाला दररोज संघशाखेवरील प्रार्थनेतच होते. भारतमातेला परमवैभवाला नेण्याच्या ध्येयाचे दररोज स्मरण संघशाखेतील प्रार्थनेनेच होते.त्याला अनुसरून ध्येयाच्या दिशेने आचरण, तीच जीवनाची दिशा आपण समाजात कुठेही असलो, तरी मी या समाजाचा घटक. समाजाचा मी, समाज माझा आहे. त्याच्या सुखात माझे सुख. त्याचे दु:ख, ते माझे दु:ख या भावनेनेच स्वयंसेवकाचे आचरण अपेक्षित असते.
 
नानाराव ढोबळे नाशिकला विभाग प्रचारक होते. म्हणजे नाशिक, धुळे असे या काळातील भौगोलिक रचनेच्या कार्यक्षेत्रात ते संघकार्यासाठी पोटातील उपास व अंगातील तापास न जुमानता झटले. माणसे जोडली. प्रेमाने, जिव्हाळ्याने आपलीशी केली. संघाला जोडली. कार्यरत केली. मग ते वनवासी भागातील असो वा खेड्यापाड्यातील, प्रत्येक जातीपातीत नाना त्यांच्या घरातीलच एक झाले. त्यांच्यासकट प्रसंगी धावून गेले. इतरांनाही ती प्रेरणा दिली. ती प्रेरणा संघकार्याच्या विराट रूपाने आज जगभर व्यापक झालेली आहे. अशावेळी नानाराव ढोबळे आठवतात. त्यांच्यासारखे अगणित प्रचारक आठवतात. संसार सांभाळून संघासाठी संघर्षशील परिश्रमी कार्यकर्ते स्वयंसेवक आठवतात.
 
१९५२ सालचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला दुष्काळ असो, १९६२ सालचे चीनचे आक्रमण असो, १९६२ ते १९७२च्या आसपास काही वर्षे पडलेले दुष्काळ असो, समाजाला सावरण्यासाठी नानांनी इतरांना साथ देऊन दुष्काळ विमोचन कार्यात केलेले काम दुष्काळी भागातील त्यावेळच्या हयात असलेल्या सर्वांना प्रकर्षाने आठवते. गहिवरून टाकणारा तो आठव नानाराव ढोबळे यांचे थोरपण व तपस्वी असल्याची जाणीव करून देतो. १९६३ साली स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी साजरी झाली.१९७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३०० वर्षे पूर्ण झाली. या सर्व कार्यक्रमांचे साजरेपण मोठ्या धूमधडाक्याने देशभर-घरोघरी-गावोगाव गाजले. नानांच्या अंगात जणू काही वीरश्री संचारली होती. असे नाना सर्वत्र आयोजनासाठी फिरले. अखंड प्रवास, भेटीगाठी घेतल्या, पायाला भिंगरी लावल्यागत. नानांचा तो उत्साह दगडालाही चेतना देईल, असा होता, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
 
पुढे नाना महाराष्ट्र प्रांत-बौद्धिक प्रमुख झाले. नानांची ओघवती वाणी व शब्दसंपत्ती थोर साहित्यिकांच्या पंक्तीत बसणारी होती. ‘राष्ट्रभक्त खंडोबल्लाळ’ या पुस्तकातून नानांनी तरुणांसाठी देशप्रेमाचे साक्षात धगधगते व्यक्तिमत्त्व साकार केले. ‘समाजतळातील मोती’ या पुस्तकातून समाजातील सामान्य माणसातील असामान्य गुणरत्ने त्यांनी अतिशय यथार्थपणे एकेका व्यक्तिचित्रणाच्या वर्णनातून, माहितीतून व्यक्त केली आहे.
 
नानांबद्दल लिहायला माझी लेखणी पुरेशी नाही. शब्द अपुरे आहेत. त्यांचे स्मरण मनाला गहिवरून टाकते. असे अनुभव हे स्वानुभव असतात. हे खरे असले तरी नानाराव ढोबळे व त्यांचे महान व्यक्तिमत्त्व इतिहासातील सामाजिक संघटनांच्या इतिहासात मुख्यत्वे रा. स्व. संघाच्या कार्य इतिहासाचे अलिखित पान आहे. नाना ढोबळे यांच्या पुण्यस्मृतीस कोटी कोटी वंदन व आदरांजली अर्पण करतो.

-दि. क. देशमुख