येशू-मोहम्मद पैगंबरांच्या जन्मावर कोणताही वाद झाला नाही मग श्रीरामाच्या जन्मावर शंका का? : न्यायमूर्ती कमलेश्वरनाथ

    04-May-2024
Total Views |

Justice Kamleshwarnath

मुंबई (प्रतिनिधी) :
"२५०० वर्षांपूर्वी येशू आणि १५०० वर्षांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मावरून या देशात कोणताही वाद नव्हता, तर मग आपल्याच प्रभू श्रीरामांच्या जन्माबद्दल आपल्याच घरात एवढी शंका का निर्माण झाली?", असे परखड मत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कमलेश्वर नाथ (Kamleshwar Nath) यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित त्यांच्या ‘यरनिंग फॉर राम मंदिर एंड फुलफिलमेंट’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी करण्यात आलेल्या ५०० वर्षांच्या संघर्षाचा उल्लेख करत ते म्हणाले की, वाल्मिकी रामायण आणि गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानस याची देखील शास्त्रज्ञांद्वारे पुष्टी देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी रामजन्मभूमीसाठी अनेक दशके चाललेल्या गुंतागुंतीच्या न्यायालयीन प्रक्रियेचा आढावा घेतला. ज्यामध्ये कोर्टाने ग्राह्य धरलेले साक्षीदार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेले उत्खनन, न्यायालयात सादर केलेली अस्सल कागदपत्रे आणि जगतगुरु रामभद्राचार्यजींच्या श्लोकांद्वारे तोंडी पुरावे यांचा समावेश होता.


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी १९६२ मध्ये राम मंदिराविरोधात मुस्लिमांनी दाखल केलेल्या खटल्याचा उल्लेख केला. याशिवाय १९८३ मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेची असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जेव्हा ही चळवळ सुरू झाली तेव्हा गरज भासली की सर्वप्रथम या विषयावर भारतीय जनतेला प्रबोधन करण्याची गरज आहे, तरच ही चळवळ बळकट होऊ शकते.

चंपत राय पुढे म्हणाले की, त्यावेळी राम मंदिराचे मुख्य पक्षकार देवकीनंदनजी होते. त्यांनी न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू जोरदारपणे मांडली. देवकीनंदनजी यांनी जेव्हा कमलेश्वर नाथ यांची अशोक सिंघल यांच्याशी ओळख करून दिली, त्यानंतर कमलेश्वर नाथ यांनी आपले सारे जीवन प्रभू श्रीराम यांना समर्पित केले आणि मंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयात दीर्घ लढा दिला.


Book Launching

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल जी यांचे भाषण हे तात्विक पैलूंवर प्रकाश टाकणार होते. ज्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने परकीय आक्रमकांनी भारत आणि भारतीय संस्कृतीवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. सोबतच श्रीरामाने प्रस्थापित केलेला आदर्श, हिंदूंच्या आंतरिक भावना आणि मोडकळीस आलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीच्या सततच्या प्रक्रियेचाही उल्लेख केला. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी कैकेयी, मंथरा, रावण, निषाद राज, भरत, लक्ष्मण इत्यादींच्या जीवनातील प्रसंगांवरून वर्तमान परिस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, पाश्चात्य तत्त्वज्ञान अधिकारांच्या जाणिवेला महत्त्व देते आणि भारतीय तत्त्वज्ञान कर्तव्याच्या भावनेला महत्त्व देते. सध्याच्या काळात आपण कर्तव्याच्या भावनेतून हक्काच्या जाणिवेकडे वाटचाल करत आहोत, ही आपल्या समाजासाठी चिंतेची बाब आहे.