मुंबई : बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण आता सहकाऱ्यांना घरगडी समजलं जातं, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार नाही त्यांची शिवसेना खरी शिवसेना होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्व लोकांना उबाठा गटामध्ये मिळालेली वागणूक आणि शिवसेनेत मिळणारी वागणूक यातील फरक कळल्याने त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. केवळ विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात केलेलं काम आपल्यासमोर आहे आणि लोकं प्रभावित होऊन इकडे येत आहेत. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांचे विचार पटणारे सर्वजण आमच्याकडे येत आहेत. हा कारवा अजून मोठा होत जाणार आहे."
"आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कुणी मोठा नाही आणि कुणी छोटा नाही. कुणी मालक नाही आणि कुणी नोकर नाही. परंतू, तिकडे (उबाठा) मालक नोकराप्रमाणे वागवत होते. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. पण आता सहकाऱ्यांना घरगडी समजलं जातं. लोकांना केवळ मानसन्मान हवा असतो बाकी काहीच अपेक्षा नसते," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये आणि उबाठा गटामध्ये सावळा गोंधळ आहे. एका उमेदवाराला उमेदवारी दिल्यावर त्याचा प्रचार सुरु होतो. पण त्यानंतर दुसऱ्या उमेदवारालाही एबी फॉर्म दिला जातो. यावरुन पक्षात असलेलल्या गोंधळाच्या आणि संभ्रमाच्या परिस्थितीमुळे त्यांना जिंकण्याचा विश्वास नाही," असेही ते म्हणाले.