थोडे तरी शिवछत्रपती होऊया!

    04-May-2024
Total Views |
maharashtra
खरं तर आज देशभक्त कोणाला म्हणावे, हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्या मते जो आपले स्वतःचे काम प्रामाणिकपणे पार पडतो, त्यात कुचराई केलेली त्याला स्वतःला अजिबात आवडत नाही, तो खरा देशभक्त पण आजचे चित्र फार भयानक आहे. लोकांचा कल हा काम टाळण्याकडे जास्त दिसून येतो. लोक मिळेल त्यानिमित्ताने काम टाळत जातात, दुर्लक्ष करतात. थोडक्यात कष्टाळू लोकांपेक्षा कष्ट टाळू लोकांची संख्याच मोठी आहे.
 
शिवरायासी आठवावे
जीवित तृणवत मानावे
इहलोकी परलोकी उरावे कीर्तीरुपे
शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भूमंडळी.
 
शिवरायांचे कैसे चालणे
शिवरायांचे कैसे बोलणे
शिवरायांचे सलगी देणे कैसे
 
मित्रांनो, या ओळींच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचे जे वर्णन केले आहे, त्या वर्णनातून आपल्याला जो संदेश दिला आहे, तो फार महत्त्वाचा आहे. आपण आपल्या क्षेत्रात काम करत असताना नियमितपणे समर्थांनी महाराजांचे वर्णन करताना ज्या शब्दांचा वापर केलेला आहे, ते शब्द आठवावे व त्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करून बघावा. आपल्याला ते जमेलच असे नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत, तेथे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिभा आणि उत्तमता याची उंची गाठणे, हीच आज खरी शिवभक्ती आहे. पण, खरंच आपण आपले काम हे प्रामाणिकपणे करतो का?
 
विद्यार्थी असाल तर तो अभ्यासात रमतो का? मोबाईल सोडून मैदानावर घाम गाळणे त्याला आवडते का? मैदानावर जाऊन तो खेळतो का? टीव्हीच्या स्क्रीनपासून लांब राहतो का? आई-वडिलांचा आदर करतो का? गुरूंचे ऐकतो का? चांगले बोलतो का? आनंदी राहतो का? दुसर्‍यांना मदत करतो का? दुसर्‍यांना आनंद देतो का? चांगल्या गोष्टींचा विचार करतो का? चांगल्या गोष्टींच्या प्रसारासाठी प्रयत्न करतो का?
 
तर मोठ्यांसाठी सुद्धा ते आपल्या मुलांसमोर योग्य वर्तन करतात का? मोबाईलच्या स्क्रीन पासून सुरक्षित अंतर ठेवतात का? ते त्यांच्या आई-वडिलांचा आदर करतात का? संकट प्रसंगी ते आपल्या सहकार्‍यांना, मित्रांना, शेजार्‍यांना मदत करतात का? ते स्वतः आनंदी राहतात का? आणि दुसर्‍याला आनंद देण्याचा प्रयत्न करतात का? काही साधे पण योग्य नियम पाळतात का? उदाहरणार्थ, दुचाकीवर असताना हेल्मेट घालतात का? चारचाकी असेल तर सीट बेल्ट लावतात का? या देशाचे नागरिक या नात्याने संविधानाचे पालन करणे, त्यांना आवडते का? एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करण्यास जातात का? की मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे म्हणून आपल्या कुटुंबाला घेऊन फिरायला जातात? आपलं घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतात का? राष्ट्र कार्यामध्ये स्वतःचे योगदान देतात का? आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात योग्य तो कर भरतात का?
 
याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मग तो विद्यार्थी असो व नागरिक, कोणतीही व्यक्ती स्वतःची कर्तव्य ओळखून ती तो खरंच प्रामाणिकपणे करतो का? आपल्या कामाला न्याय देतो का? मग ते काम मनापासून स्वीकारलेले असो किंवा नसो, ज्याचा आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात मोबदला मिळतो, ते काम तरी आपण प्रामाणिकपणे करतो का? आपण जे काही काम करीत आहोत, ते उत्तमतेच्या आणि प्रामाणिकतेच्या कसोटीवर उच्च असले पाहिजे. आपल्या जवळपासच्या सर्वांना आपल्या कार्याचा चांगल्या अर्थाने हेवा वाटला पाहिजे. असे काम तो करतो का?
 
बोथट पुतळे पथापथावर
ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा
वांज गोडवे गाऊ नका
 
या भारतभूमीत अनेक महापुरुष होऊन गेले. आपण त्यांची जयंती-पुण्यतिथी चे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करतो, मिरवणुका काढतो, हार, गुच्छ, सत्कार, नाच, गाणी, ढोल, ताशे, गर्जना, आतिषबाजी यांचाही वापर करतो. पण, आपल्या स्वतःच्या कर्तव्याबाबत आपण प्रामाणिक नसतो, तेव्हा वाटते या गर्जना नसून नुसत्याच वल्गना आहेत. नाच, गाणी, आतिषबाजी नसून केवळ हुल्लडबाजी आहे. या सर्वांचा देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी किती उपयोग? एकसंघ बलशाली राष्ट्र नवनिर्मितीचे स्वप्न पाहणारा एक शिक्षक या नात्याने मला नियमितपणे प्रश्न पडतो, खरंच या महापुरुषांची नावे घ्यायचा तरी आपल्याला अधिकार आहे का? आपण महापुरुषांचे विचार स्वीकारतच नाहीत. त्यामुळे यातून फक्त वाढतात ते विकार.
 
असेच अनेक विद्यार्थी व नागरिक हे मेहनत न करता सगळं काही विनासायास कसे मिळेल, याचाच विचार करतात. अलीकडच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात पालकांकडून तक्रारी असतात. मुले ऐकत नाहीत, उलट उत्तर देतात, उद्धटपणे बोलतात. असे केल्याने त्यांना आपण मोठा पराक्रम केला असे वाटते, तर काही विद्यार्थी शाळा बुडवून नको ते उद्योग करतात. काही नागरिक घरात गंभीर समस्या असताना सुद्धा प्रसिद्धी व प्रतिष्ठेसाठी सामाजिक कार्यात मोठेपणा मिळवण्यात, बडेजाव करण्यात धन्यता मानतात. आपली मूलभूत कर्तव्ये प्रत्येकानेच नीट पार पाडणे आज काळाची गरज आहे, नाहीतर ‘लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ असे होण्याची दाट शक्यता असते.
 
’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असा विचार साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता तर...........
आपल्या कर्माने, लेखणीने, बुद्धीने, मनाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रतिभा आणि उत्तमतेची उंची गाठून ते कर्तृत्व या भारतमातेला अर्पण करण्याची आपली भावना, हीच खर्‍या अर्थाने शिवभक्ती असेल. खरं तर आज देशभक्त कोणाला म्हणावे, हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्या मते जो आपले स्वतःचे काम प्रामाणिकपणे पार पडतो, त्यात कुचराई केलेली त्याला स्वतःला अजिबात आवडत नाही, तो खरा देशभक्त पण आजचे चित्र फार भयानक आहे. लोकांचा कल हा काम टाळण्याकडे जास्त दिसून येतो. लोक मिळेल त्यानिमित्ताने काम टाळत जातात, दुर्लक्ष करतात. थोडक्यात कष्टाळू लोकांपेक्षा कष्ट टाळू लोकांची संख्याच मोठी आहे.
 
थोर महात्मे होऊन गेले
चरित्रे त्यांचे पहा जरा
आपण त्यांच्या समान व्हावे
हाच सापडे बोध खरा.
 
खरं तर आपलं काम मग ते नोकरी असो किंवा व्यवसाय असो, हा जितका आपल्या स्वतःसाठी आहे, त्याहून जास्त तो जनकल्याणासाठी/सेवेसाठी असतो. पण, ही गोष्ट आपल्या पचनी पडतच नाही. खर्‍या अर्थाने आपण मालक नसून त्यांचे (ग्राहकांचे) सेवक असतो. दुकानदार, विक्रेते, एखादी कंपनी यांच्यासाठी ग्राहक, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांच्याकडे येणारे नागरिक व शिक्षकासाठी विद्यार्थी हे त्यांना मिळणार्‍या सेवेने समाधानी झाले, तरच आपण यशस्वी झालो असे म्हणता येईल.
 
एक उदाहरण म्हणून सांगतो गैरसमज करून घेऊ नका, पण सत्य आहे. जर आपल्या उत्पन्नात कोणत्याही कारणाने मग तो पगार असेल, महिन्याला मिळणारा उत्पन्नाचा भाग असेल किंवा आपले स्वतःचे मासिक उत्पन्न असेल, ते जर नेहमीपेक्षा कोणत्याही कारणाने कमी आले, तर आपण चिंताग्रस्त होतो. पण, तीच गोष्ट आपण ज्यांची सेवा करत हे सर्व मिळवतो, त्या सेवेत जर काही कमतरता राहून गेली, तर आपण तितकेच चिंताक्रांत होतो का? हा खूप मोठा प्रश्न आहे? आज माझ्या कार्यालयात आलेल्या व्यक्तीचे काम मी करू शकलो नाही म्हणून किंवा माझ्या वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला व्यवस्थित लिहिता-वाचता येत नाही, म्हणून मी चिंताग्रस्त आहे, असं आपण किती वेळेला ऐकतो?
 
आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो म्हणजेच हक्काने आपला वारसा सांगतो. पण, नुसता वारसा सांगून काय उपयोग? आपल्या कर्तव्यात चूक होता कामा नये. हे महाराज सांगून गेले. कर्तव्याला चुकणारी पिढी ही देशासाठी घातकच, हेही महाराज सांगून गेले.
 
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारु।
श्रीमंत योगी॥
 
खर्‍या अर्थाने ही भूमिका आपल्याला पार पाडता आली पाहिजे. हे समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे वर्णन करताना लिहिले आहे. पण, आपल्यालाही ते मार्गदर्शक आहे, हे विसरता कामा नये.
याशिवाय समर्थ रामदास स्वामी महाराजांसाठी लिहितात यशवंत, कीर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, नीतीवंत, पुण्यवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील. हे प्रत्येक विशेषण महाराजांसाठी वापरलेले असले व त्यात प्रचंड मोठा अर्थ भरलेला आहे, तरी सुद्धा एक सामान्य नागरिक म्हणून मला यातलं काय घेता येऊ शकेल? काय करता येऊ शकेल? असा विचार नको का करायला?
 
महाराजांच्याच आदेशानुसार, जर या भूमीतील प्रत्येकाने आपण स्वीकारलेले काम प्रामाणिकपणे केले, आपली सर्व कर्तव्ये नीट पार पाडली तर ही भूमी पुन्हा सुवर्णभूमी होणे अशक्य नाही. सर्वकालिक महान इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीच्या जीवन-मरणाचा संघर्ष.” थोडक्यात, छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर भारतीय संस्कृती राहिलीच नसती. असे त्यांना म्हणावयाचे आहे.
महान हिंदी कवी भूषण म्हणतात-
 
काशी की कला जाती,
मथुरा मस्जिद होती।
अगर शिवाजी न होते,
तो सुन्नत सबकी होती।
 
अगदी अलीकडच्या कालखंडात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचल्या असत्या.” जंगलात जसा वणवा पेटतो व त्या वणव्यात जंगल भस्म होऊ लागते, तसे हे मराठी देशात सर्वत्र पसरले आणि परकीयांना उद्ध्वस्त करू लागले. न्यायमूर्ती रानडे याबद्दल म्हणतात, “हा केवळ एक वणवा नसून तो एक छत्रपतींचा विचार आहे, जो छत्रपतींनी दिला आहे.”
 
यावर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत, आपण तो विचार जगला पाहिजे. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला एकसंध ठेवण्यासाठी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी लढले पाहिजे. हाच तो विचार! पण, केवळ महाराज लढत नव्हते, म्हणजे केवळ लढाया करत नव्हते. तर राज्य कसे चालवावे, याचा आदर्श महाराजांनी घालून दिला. महाराजांच्या राज्यात प्रजा सुखी व समाधानी होती. ते खर्‍या अर्थाने रामराज्यच होते. शेतकर्‍यांच्या विकासासाठी कोणती पावले उचलावीत? न्यायव्यवस्था कशी असावी? शेतीच्या विकासासाठी काय केले पाहिजे? धर्माचे राज्य कसे असावे? कर पद्धती कशी पाहिजे? धरणं कसे व कुठे बांधावित? रयतेच्या दाण्यालाही धक्का लागता कामा नये, रयतेला त्रास होईल असे कोणतेही वर्तन राज्यातील प्रशासनाकडून होऊ नये. राज्यनीतीचे असावे. अर्थव्यवस्था कशी असावी? यासहित राज्य प्रशासनासंदर्भात अनेक गोष्टी महाराजांनी सांगून ठेवल्या आहेत. नरहर कुरुंदकर म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर थोडे तरी आपल्याला शिवाजी होता आले पाहिजे.”
-प्रा. प्रशांत शिरुडे
(लेखक के. रा. कोतकर माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे शिक्षक आहेत.)
 ९९६७८१७८७६