मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एका सोने व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी आणि त्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक पोलिस हा स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
अविनाश जाधव हे त्यांचे मित्र वैभव ठक्कर, त्यांचा ड्रायव्हर आणि इतर सहा जणांसह मुंबईतील झवेरी बाजारातील एका सोने व्यापाऱ्याच्या दुकानात पोहोचले. त्यावेळी त्यांनी त्या व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण करत ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अविनाश जाधव यांच्यावर लोकमान्य टिळक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अविनाश जाधव यांच्या मारहाणीचा व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये ते पोलिसांसमोरच एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.
हे वाचलंत का? - काकांचा पुतण्याला मोठा धक्का! रोहित पवारांचे कट्टर समर्थक दादा गटात
यावर माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, "मला एका व्यक्तीचा फोन आला असून तिथे एका बाईला कोंडून ठेवण्यात आल्याचे त्याने मला सांगितले. त्यानंतर जेव्हा मी तिथे पोहोचलो त्यावेळी एका मुलीला बंदी बनवून ठेवलं होतं. ती मुलगी आवाज देत होती. त्यामुळे त्या मुलीला बाहेर काढण्यासाठी मी त्याच्या कानाखाली मारली. माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे," असे ते म्हणाले.