नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील गीता कॉलनी भागात एका २५ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही महिला ज्या ई-रिक्षात बसली होती, तिच्या चालकाने तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात तपास केल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद उमर नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
पोलिस आयुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना यांनी सांगितले की, दि. २६ मे रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात दरोड्याशी संबंधित पीसीआर कॉल आला होता. तक्रार ऐकून पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पीडित महिला जखमी अवस्थेत आढळून आली. तीला रक्तस्त्राव होत होता. जखमी अवस्थेत पडलेल्या महिले जवळ तीचा तीन वर्षाचा मुलगा पडलेला होता.
पोलिसांनी तातडीने महिलेला रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची वैद्यकीय तपासणी केली असता आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले. महिलेने सांगितले की ती बिहारची रहिवासी असून पतीला भेटण्यासाठी पंजाबला जात होती. दि. २६ मे रोजी ती नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर उतरून सदर बझारला गेली. परतत असताना त्याने ई-रिक्षा घेतली असता ऑटोचालकाने तिला कोल्ड ड्रिंक दिले. तेच प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली.
यानंतर आरोपी महिलेला निर्जन भागात घेऊन गेला. तिथे आधी त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिला शुद्धीवर येताच महिलेने विरोध केला. यावर आरोपीने महिलेला गप्प करण्यासाठी तिच्या डोक्यावर वीट मारली. महिला पुन्हा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर महिलेचा फोन आणि तीन हजार रुपये रोख नसल्याचे आढळून आले.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. सुमारे ५०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बॅटरी रिक्षाची ओळख पटली आणि आरोपीचे चित्र समोर आले. यानंतर शोधमोहीम सुरू झाली. सुमारे दीडशे रिक्षामालकांची चौकशी केल्यानंतर उमरला पकडण्यात आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून पीडितेचा फोन आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली. उमरला पकडल्यानंतर उमरने यापूर्वीही दरोड्याच्या घटना केल्याचे समोर आले आहे. आता त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३०८, ३२८, ३७९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.