शिर्डी : ज्या जागेवर विजय वडेट्टीवार निवडून येतात तिथेसुद्धा आता महायूतीचे लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत. त्यामुळे वडेट्टीवारांनी ४ जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. त्यांनी शुक्रवारी शिर्डीमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "विजय वडेट्टीवार जिथे निवडून येतात ती जागासुद्धा महायूतीचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी ४ जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी. लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये फूट अटळ आहे. त्यांच्यात फूट पडलेलीच आहे फक्त ती बाहेर येण्याचं बाकी आहे. कोण कोण बाहेर येणार हे निकालानंतर कळेल. निवडणूकीच्या काळात काँग्रेसमधील ज्या अदृष्य शक्तींनी आम्हाला मदत केली ते सगळे ४ जूननंतर प्रवेश करताना दिसतील. यात वडेट्टीवारांचं नाव असल्याचं आम्ही ऐकलं आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते! परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक १ वर
ते पुढे म्हणाले की, "साईबाबांचा आशीर्वाद मोदीजींसोबत राहावा आणि परत एकदा ५ वर्ष देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्यांचं नेतृत्व मिळावं. आमचा देश हिंदू राष्ट्राच्या दिशेने भक्कम होण्यासाठी देशाला मोदीजींचंच नेतृत्व मिळावं, ही साईचरणी प्रार्थना केली आहे."
यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली. ते म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही कुणीही सहन करणार नाही. हेच कृत्य जर भाजपच्या कार्यकर्त्याच्या हातून घडलं असतं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केवढा धिंगाणा घातला असता याचा विचारही करु शकत नाही. आपल्या हातात काय आहे आणि आपण काय फाडत आहोत याची आपल्याला चांगली जाणीव असते. कधी शिवरायांचा अपमान करायचा, औरंगजेबाचा उद्धार करायचा आणि कधी बाबासाहेबांचा अपमान करायचा आणि नंतर म्हणायचं की, ते आमचा बाप आहेत. मग अपमान करण्याची हिंमत कशी होते? त्यामुळे हे जाणूनबूजून केलेलं कृत्य आहे. यावरून मविआची मानसिकता स्पष्ट होते," असेही ते म्हणाले.