होळकर घराणे आणि खंडोबा

30 May 2024 21:20:44
article on Holkar family and Khandoba


अहिल्यादेवी होळकर या सत्त्वशील शासनकर्त्या होत्या. राजसत्ता, धर्मसत्ता, संस्कृती आणि मानवता यांचा सुरेख संगम त्यांच्या ठाई होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील तीर्थक्षेत्री त्यांनी अनेक विकासकामे केली. भक्तभाविकांना सोयीसुविधा पुरविल्या. केदारनाथ येथील भक्त निवास, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसाठी तलाव, गया येथील स्थापत्य, रामेश्वर येथील उदारहस्ते दान प्रक्रिया अशा अनेक थोर कार्यांसोबत मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरीच्या खंडोबा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आणल्या. कारण, खंडोबा हे होळकर घराण्याचे कुलदैवत होते. धनगराची बानूबाई चंदनपूरची. ती खंडोबाची द्वितीय पत्नी. तिचे आणि होळकर घराण्याचे ज्ञातीचे ऋणानुबंध होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि लोककल्याणकारी राज्याची संकल्पना कृतीत आणली. केवळ ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ अशीच संकल्पना त्यांनी राबविली नाही, तर त्यांनी सर्वधर्मसमभाव राखत रयतेचे राज्य केले. छत्रपती शिवरायांच्या शिलेदार मावळ्यांनी अटकेपार झेंडा रोवला. छत्रपतींच्या निष्ठावंत सरदारांनी जिवाचा कोट करून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. शिंदे, घोरपडे, निंबाळकर, दाभाडे, गायकवाड आणि इंदूरचे होळकर या सरदारांची नावे अग्रक्रमाने घेता येतील. थोरले मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा सुंदर समन्वय साधून, छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची परंपरा अधिक पुढे नेली.

अशा या इंदूरच्या होळकर घराण्याची शिवकुलातील क्षेत्रपाल देवता खंडोबा यावर अपार श्रद्धा होती. या कुलदैवताच्या मंदिरासाठी होळकर कुटुंबाने मुक्तहस्ते दान केले. नुसतेच दान केले नाही, तर आपल्या दूरदृष्टीने स्थापत्यशास्त्राच्या विविध बांधकामांना स्थायी स्वरूप दिले. ‘तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनी।’ असे संतांनी म्हटले असले, तरी शक्तिकुळातील आणि शिवकुळातील अनेक क्षेत्रपाल देवता हा भक्तांचा परमश्रद्धेचा विषय होता आणि आजही आहे. त्यामुळेच संत रामदास स्वामींसह अनेक संतांच्या रचनांमध्ये तीर्थक्षेत्रांची यात्रावर्णने आहेत. समर्थ रामदास स्वामींनी जेजुरी यात्रावर्णन रचले असून, जेजुरीच्या खंडोबाच्या दीपमाळा, महाद्वार, गडकोट, वाघ्या-मुरळ्यांची जागरणे, खेटे घालणे, लंगर झोडणे आदी वर्णने जेजुरीच्या खंडोबासंदर्भात दिसतात. छत्रपती शिवराय, पेशवे, गायकवाड, होळकर आदींनी क्षेत्रपाल देवतांच्या मंदिरांचे जीर्णोद्धार केल्याचे उल्लेखही ताम्रपट, शिलालेखांंवरून आढळून येतात.

आता होळकर सरदारांचे कुलदैवत खंडोबा होते, यासंदर्भात सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांच्या चरित्रसंग्रहात एक कथा आहे. मुरलीधर मल्हार अत्रे लिखित आणि सुधारित आवृत्तीचे संपादक डॉ. देविदास पोटे यांच्या या चरित्रग्रंथातील कथा संक्षिप्त स्वरूपात अशी - पुणे जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठी जेजुरीजवळ होळ-मुरुम या गावी मल्हाररावांचा जन्म इसवी सन 1693 ला झाला. त्यांच्या वडिलांच्या नावे खंडुजी वीरकर, ते जातीचे खुटेकर धनगर समाजात सनगर, कनगर, खुटेकर असे उपसमाज आहेत आणि या उपसमाजांची निर्मिती प्रामुख्याने त्यांच्या व्यवसाय भिन्नतेमुळे झाली असावी. खंडूजी वीरकर यांचा चरितार्थ शेतीपोतीवर चालत असे. पण, मल्हारराव अवघे तीन वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. खानदेशातील मौजे तळोदेे परगणे सुलतानपूर हे मल्हाररावांच्या मामाचे म्हणजे भोजराजजी बारगळ यांचे गाव.


मल्हाररावांसह त्यांच्या मातोश्री भोजराजजी या आपल्या भावाच्या घरी राहायला गेल्या. मल्हारराव मेंढरे चारायचे काम करीत. भर उन्हात मल्हारराव एका वडाच्या झाडाच्या छायेत झोपले. त्यांना निद्रा लागली, तोच एक नाग वारुळातून बाहेर पडून फणा काढून मल्हाररावांच्या डोक्यावर सावली धरू लागला. मल्हाररावांची आई त्यांना शिदोरी घेऊन आली, तेव्हा मल्हाररावांच्या शिरावर नागाने आपला फणा धरल्याचे पाहून आई घाबरली. ती भोजराजजी व ग्रामस्थांना घेऊन आली. या सर्वांना पाहून नाग वारुळात गेला. हा घडलेला प्रकार मल्हाररावांच्या आईने एका ब्राह्मणाला सांगितला. तेव्हा ब्राह्मण उद्गारला, ’‘बाई, तुझा मुलगा पृथ्वीपती होईल. पण, वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत त्याला खूप जपावे लागेल.” मल्हाररावांच्या मामांस पुढे आणखी एक दृष्टान्त झाला. ते कुलस्वामी खंडेरायाच्या दर्शनाला जेजुरीच्या कडेपठारावर चालले आहेत. काळाकुट्ट अंधार आणि गर्द झाडी, सोसाट्याचा वारा अशा भयाण अवस्थेत कडेपठार डोंगरावर वणवा लागल्याप्रमाणे प्रकाश पडला. तो वणवा नव्हता, तर पेटलेल्या दिवट्यांचा प्रकाश होय. नेमकी अशीच स्थिती दसर्‍याच्या आदल्या दिवशी कडेपठारवर असते.

हजारो दिवट्यांचा प्रकाश आणि ‘येळकोट येळकोट जयमल्हार, कडेपठार महाराज की जय...’ प्रस्तुत लेखकाने प्रत्यक्ष हा अनुभव खंडोबाच्या छबिन्यात घेतला आहे. मल्हाररावांच्या मामांची अनुभूती काही वेगळी नाही. मृदंग, टाळ, वीणा, घाटी, दिमडी, तुणतुणे अशा वाद्यांच्या साथीने खंडोबाचा गुणानुवाद सुरू असतो. वाघे-मुरळ्या नाचत असतात. समर्थ रामदासांनी या सोहळ्याचे वर्णन, ’रात्रभारी निवांत वेळा वाटे जणू गाती कोकीळ’ असे केले आहे. मल्हाररावांच्या मामांस मार्तंडाची तेजःपुंज मूर्ती सिंहासनावर बसलेली दिसली. कडेपठारवर एक वृद्ध भोजराजाजीला म्हणाला, “परमेश्वर कृपेने तुझा भाचा खरोखरच विख्यात विभूती होईल.” मल्हाररावांच्या मामांनी त्यांना मेंढरे चारण्याचे दिलेले काम त्याच्याकडून काढून घेतले आणि मल्हाररावांना घोड्याच्या पानांचे काम दिले. घोडदौड करण्याचे शिक्षण दिले. मल्हारराव युद्धकुशल झाले, त्यांना पुढे चांदवडची सुभेदारी, माळव्याची सुभेदारी प्राप्त झाली. ते पेशव्यांशी एकनिष्ठ होते. अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांची भेट झाल्यावर मल्हाररावांनी अहिल्यादेवींना बालवयातच सून म्हणून स्वीकारले.

एकंदरीत खंडोबाभक्ती होळकरांच्या रोमारोमांत होती. दि. 10 जुलै 1729 रोजी मल्हाररावांनी जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे बांधकाम सुरू केले. मल्हाररावांना 1723 मध्ये खंडेराव या पुत्राची प्राप्ती झाली. दि. 20 मे 1733 रोजी खंडेराव आणि अहिल्यादेवींचे लग्न झाले. कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांना मार्च 1754 रोजी वीरगती प्राप्त झाली. अहिल्यादेवी आणि मल्हाररावांचे नातू मालेराव यांना 1756 मध्ये अनुक्रमे वेरूळ, अंबड हे परगणे मिळाले.

पती खंडेराव यांच्या वीरगतीनंतर अहिल्यादेवींनी राज्यशकट हाकताना पेशव्यांशी एकनिष्ठता कायम ठेवली. ‘श्रीमंतांंच्या कल्याणात आमचे, जगताचे कल्याण आहे’ असे त्या नेहमी म्हणत.

इंदूरचे कवी राजाराम दौलत गडकरी यांनी अहिल्यादेवींवर एक गौरवपर कविता केली आहे. ती अशी -


तिचा आत्मविश्वास जागता हीच तिची शक्ती॥
भक्तांनाही भक्तपणे देत मोक्षप्राप्ती॥
ब्रह्मांडातील क्रिया चालल्या विशिष्ट हेतूनी॥
चाले तज्ञा वरुनी ती जी चालन रुपानी॥
सामर्थ्यांचे सर्व शक्तिचे तिचं क्रिया हाती॥
पराक्रमाने अपार तिला ज्ञान नेत्र असत॥
आचरणे ही जागृत होता आत्माशक्ती देही॥
निजसत्तेची निजसत्त्वाची सत्ता करि येई ॥
ही सत्ता नच राजाची॥
अहिल्यादेवी होळकर या सत्त्वशील शासनकर्त्या होत्या. राजसत्ता, धर्मसत्ता, संस्कृती आणि मानवता यांचा सुरेख संगम त्यांच्या ठाई होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील तीर्थक्षेत्री त्यांनी अनेक विकासकामे केली. भक्तभाविकांना सोयीसुविधा पुरविल्या. केदारनाथ येथील भक्त निवास, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसाठी तलाव, गया येथील स्थापत्य, रामेश्वर येथील उदारहस्ते दान प्रक्रिया अशा अनेक थोर कार्यांसोबत मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरीच्या खंडोबा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आणल्या. कारण, खंडोबा हे होळकर घराण्याचे कुलदैवत होते. धनगराची बानूबाई चंदनपूरची. ती खंडोबाची द्वितीय पत्नी. तिचे आणि होळकर घराण्याचे ज्ञातीचे ऋणानुबंध होते.


जेजुरीच्या खंडोबाचे मंदिर सन 1608 मध्ये बांधण्यात आले. सन 1735 मध्ये मल्हारराव होळकरांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले. 1739 साली चिमाजी अप्पा आणि मल्हारराव होळकर यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळविला आणि काही घंटा हस्तगत केल्या. त्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराला दान दिल्या. मल्हारराव होळकर यांनी 1742 साली गडावरील दगडी कमानीचे काम पूर्ण केले. 1758 ला गडावरील नगारखान्याचे काम पूर्ण केले. अहिल्यादेवी होळकरांच्या काळात 1770 मध्ये किल्लेसदृश तटबंदीचे काम पूर्ण झाले. तुकोजीराव होळकर, खंडोजीपुत्र मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचे शिलालेख मंदिर परिसरात आढळतात. एकूण 23 शिलालेख मंदिर परिसरात आढळतात. त्यातील पाच शिलालेख होळकर घराण्याचे आढळतात. मंदिरासमोर लहानमोठ्या मिळून दहा दीपमाळा आणि एक अष्टकोनी टेहळणी बुरुज आहे. मंदिराचा मुख्य सभामंडप 16 दगडी खांबावर टेकलेला आहे. राहुल वावरे यांनी होळकर रियासतीचे संशोधन सन 2012 पासून सुरु ठेवले असून, होळकर घराणे आणि खंडोबा या विषयीची माहिती माहितीजालावरही उपलब्ध आहे.


प्रस्तुत लेखकाचा संशोधनाचा विषय खंडोबा आणि त्याचे विधिनाट्य जागरण हा होता. त्यामुळे त्यांनी गुरुमित्र जर्मनीच्या हीडलबर्ग विद्यापीठाचे धर्मशास्त्र विभागाचे प्रमुख दिवंगत डॉ. गुन्थर सोन्थायमर यांच्यासोबत अनेकवार धनगर समाज त्यांची मौखिक गीते (बाण्या) जोतिबा, म्हस्कोबा, खंडोबा ही धनगर समाजाची दैवते यांच्याबाबत चर्चा केली. तसेच प्रस्तुत लेखकाने गुरु संत साहित्य आणि लोकसाहित्याचे गाढे संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा सुंदर समन्वय होता. खंडोबा अहिल्यादेवींचे परमश्रद्धेय कुलदैवत होते. त्यामुळे जेजुरीच्या तीर्थक्षेत्र विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता, हे नाकारता येत नाही.



प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
(लेखिक लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)
Powered By Sangraha 9.0