वाशिंग्टन डी. सी : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने कार घुसवून ज्यूंना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने ज्यू विरोधी घोषणाही दिल्या. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यूंना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार, दि. २९ मे २०२४ न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये असलेल्या ज्यू स्कूलच्या बाहेर घडली. काही ज्यू विद्यार्थी आणि इतर व्यक्ती या शाळेच्या बाहेर उभे होते.
शाळेच्या बाहेर पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर असगर अली पांढरी कार घेऊन आला होता. यानंतर त्याने कार ज्यूंच्या दिशेने वळवली. त्याने अनेक वेळा असेच केले. तो ज्यूंना लक्ष्य करत राहिला. यावेळी तो 'मी सर्व ज्यूंना मारून टाकीन' असे ओरडत होता. त्याने सातत्याने ज्यूंना लक्ष्य केले. तो भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने कार चालवत राहिला. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. त्याच्या गाडीपासून वाचण्यासाठी ज्यू विद्यार्थी शाळेच्या आत गेले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ काढला आणि असगर अलीची ओळख पटवून त्याला अटक केली. तो ५८ वर्षांचा असून २० वर्षांपूर्वी पाकिस्तानातून अमेरिकेत आला होता. त्याने चौकशीत स्वत:ला टॅक्सी चालक असल्याचे सांगितले आहे पण त्याच्याकडे वैध परवानाही नाही. त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, द्वेषाचे गुन्हे आणि प्राणघातक हल्ला असे डझनभराहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी या घटनेतील पाच पीडितांची ओळख पटवली आहे. यापैकी तीन १८ वर्षीय तरुण, एक ४१ वर्षीय आणि एक ४४ वर्षीय पुरुष आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. असगर अली याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ज्यूंविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर यामध्ये मोठी वाढ झाली आहे.