मुंबई : परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावर खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आहेत. यावेळी त्यांनी शेतशिवारात फेरफटका मारत पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
"परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी..."
अशा कवितेच्या ओळी लिहित त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून त्यांनी शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घासही खाऊ घातले.
हे वाचलंत का? - "मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात घेण्याचा..."; आव्हाडांच्या कृत्यावर फडणवीसांचं मोठं विधान
तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते, अशा भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या आहेत.