"मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात घेण्याचा..."; आव्हाडांच्या कृत्यावर फडणवीसांचं मोठं विधान

30 May 2024 16:49:58
 
Fadanvis
काशी : कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्याचा विचारदेखील महाराष्ट्र सरकारतर्फे कुणी केलेला नाही. आम्ही खोट्यांचा खोटेपणा उघडा पाडू, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीच्या विरोधात केलेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील कुठलाही श्लोक घेण्याचा विचारदेखील महाराष्ट्र सरकारतर्फे कुणी केलेला नाही. त्यासंदर्भात कुठली चर्चाही झालेली नाही. विरोधकच एकएक शोधून काढतात, तेच नरेटिव्ह तयार करतात आणि तेच आंदोलन करतात. मात्र, खोटं आंदोलन करण्याच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलाय. हा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही आणि या खोट्यांचा खोटेपणा आम्ही उघडा पाडू," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  जितेंद्र आव्हाडांविरोधात वातावरण तापलं! भाजपकडून राज्यभरात आंदोलनं
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. या प्रस्तावाला अनेक संघटनांनी विरोध दर्शवला. मात्र, जितेंद्र आव्हाड याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत.
 
बुधवार, २९ मे रोजी जितेंद्र आव्हाडांनी महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत या प्रस्तावाचा विरोध केला. परंतू, मनुस्मृतीचे पोस्टर फाडताना त्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचा फोटो असलेले पोस्टरच फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या या कृत्याचा राज्यभरात विऱोध करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0