अमेठी ते रायबरेली, पराभवाचीच खेळी!

    03-May-2024
Total Views |

Rahul
 
काँग्रेसच्या शाही घराण्याची मानसिकता आजही सरंजामशाहीवादीच. आपण कोणाचेही नाव, कधीही जाहीर केले, तरी मतदार आपल्यालाच निवडून देतील, ही मस्ती आता काँग्रेसला चांगलीच भोवणार आहे. आता आपल्या कर्तृत्त्वशून्य मुलाला मतदारांनी निमूटपणे निवडून द्यावे, अशी अपेक्षा त्या बाळगीत असून यापेक्षा मतदारांचा अपमान दुसरा कोणता असेल!
 
अखेरीस गांधी घराण्याची पदकमले रायबरेलीच्या मातीला लागली तर! लोकसभा निवडणुकीसाठी रायबरेली मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीस शेवटचे काही तास उरले असताना काँग्रेसचे सारे शाही घराणे रायबरेलीच्या विमानतळावर अवतीर्ण झाले. तेथून राजकन्या पिंकी ऊर्फ प्रियांका गांधी थेट अमेठीला रवाना झाल्या, कारण तेथेही जीव टांगणीला लागलेला प्रियांका यांचा वैयक्तिक सचिव आणि काँग्रेसचा संभाव्य उमेदवार येरझारा घालीत होता. काँग्रेस आता आपल्या स्वीय सचिवांमार्फत ही निवडणूक लढवीत आहे, ही अमेठीच्या खासदार व भाजपच्या लोकप्रिय नेत्या स्मृती इराणी यांची टीका कितीही खरी वाटली, तरी ती या शाही घराण्याच्या विशेषाधिकाराचा भंग करणारी आहे. कारण कोणावर मेहेरबानी करायची, ते राजा ठरवितो.
 
असो. मायबाप वाचकांनी आता वर्तमानकाळातील वास्तवाला सामोरे जावे. जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीत काँग्रेसच्या या शाही घराण्याला अखेरची घरघर लागलेली दिसते. सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तेथेच गांधी घराण्याची उलटगणती सुरू झाली आहे. सोनिया राज्यसभेवर गेल्यानंतर तो अखेरचा गडही ढासळला आहे, हे ४ जूनला सिद्ध होईल. या अखेरच्या क्षणापर्यंतच्या सस्पेन्समागे गांधी घराण्यातील अंतर्गत साठमारी आहे. किंबहुना, जाहीरपणे राहुल गांधी आपल्या धाकट्या बहिणीला कितीही मिठ्या मारून प्रेमप्रदर्शन करीत असले, तरी त्यांना प्रियांका गांधी यांना ना पक्षात मोठे होऊ द्यायचे आहे ना संसदीय क्षेत्रात. काँग्रेसचे माजी नेते आणि प्रियांका गांधी यांचे विश्वासू आचार्य प्रमोद कृष्णम यांनीच या अंतर्गत साठमारीचा गौप्यस्फोट केला. प्रियांका गांधी यांना काँग्रेसमध्ये सरचिटणीस करण्यात आले खरे, पण त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी टाकण्यात आलेली नाही. प्रियांका यांना पक्षाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष करण्याची सूचनाही राहुल गांधी यांनीच नाकारली होती. आताही अमेठीतून प्रियांका यांना उमेदवारी देण्यास राहुल गांधी यांनी मनाई केली होती, असे कृष्णम यांनी सांगितले.
 
राहुल गांधी हे रायबरेलीतून नाइलाजास्तव लढत आहेत. स्वातंत्र्यानंतर राजीव गांधी यांच्या हत्येनंतरची काही वर्षे सोडल्यास, गांधी घराण्यातील एकही व्यक्ती उत्तर प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली नाही, असे घडले नव्हते. त्यामुळे यंदा असे घडते, तर ही गोष्ट काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मनोधैर्यावर मोठा आघात करणारी ठरली असती. उत्तर प्रदेशात आता काँग्रेसला कसलेही भवितव्य राहिलेले नाही, हे काँग्रेसच्या आणि गांधी घराण्याच्याही लक्षात आले आहे. संभाव्य पराभवाला भिऊनच सोनिया गांधी यांनी राज्यसभेचा मार्ग पत्करला होता. राहुल गांधी यांना ना अमेठीशी काही देणे-घेणे आहे, ना वायनाडशी. त्यांना केवळ संसदेवर निवडून येण्यात स्वारस्य आहे. वायनाडमध्ये त्यांचे आवडते मतदार बहुसंख्येने असल्याने, त्यांनी गेल्या निवडणुकीत पराभवाचा अंदाज आल्यावर एक मिनिटही वाया न घालविता वायनाडचा रस्ता धरला होता. आताही राजकीय दबावापोटी त्यांना रायबरेलीतून मारून मुटकून उभे राहावे लागत आहे.
 
ज्याप्रकारे काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली येथील आपले उमेदवार जाहीर केले, ती गोष्ट या दोन्ही मतदारसंघातील मतदारांचा घोर अपमान करणारीच. यावेळी लोकसभा निवडणूक न लढवता, संसद सदस्य होण्यासाठी राज्यसभेचा सुरक्षित मार्ग स्वीकारण्याचा निर्णय सोनिया गांधींनी घेतला, पण अनेक दशके त्यांना नियमितपणे निवडून देणार्‍या रायबरेलीतील मतदारांना या निर्णयाबाबत त्यांनी विश्वासात घेतले नव्हते. आपल्याला निवडून देणे हे या मतदारसंघातील मतदारांचे कर्तव्य आहे, असे भलेही गांधी घराण्याला वाटत असले, तरी भारतात आजही लोकशाही आहे. केवळ निवडणुकीचा अर्ज देण्यापुरते अमेठीला येणार्‍या कर्तृत्त्वशून्य राहुल गांधी यांना मतदारांनी गेल्या वेळी धडा शिकविला.
 
त्यांच्याजागी अमेठीत राहून अमेठीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार्‍या स्मृती इराणी यांना मतदारांनी भरभरून मते दिली. गेल्या पाच वर्षांत स्मृती इराणी यांनी अमेठीचा पूर्ण कायापालटच केला. तेथील त्यांच्या विकासकामांची जंत्री या पानावरही मावणार नाही, इतकी मोठी आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी अमेठीत एक घर घेऊन तेथेच आपले बस्तान बसविले. आपल्या समस्यांशी इतका समरस झालेला उमेदवार अमेठीवासीयांनी कधी बघितलाच नव्हता. वेळेवर अडचणीला धावून येणार्‍या या उमेदवाराला नाकारण्याइतके अमेठीवासीय ना कृतघ्न आहेत, ना अडाणी. त्यामुळे यावेळी स्मृती इराणी केवळ विजयीच होतील असे नव्हे, तर त्या दणदणीत फरकाने निवडून येतील.
 
राजकीय जीवनात वावरणार्‍याने पराभवाला भ्यायचे नसते. भारतात राहुल गांधीच काय, प्रत्यक्ष इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही मतदारांनी घरी बसविले होते. पण, नंतर त्यांना निवडूनही दिले होते. त्यामुळे राहुल गांधींनी २०१९मध्ये पराभव झाल्यावर अमेठी सोडण्याचा घेतलेला निर्णय निव्वळ स्वार्थी आणि मतदारांचा अपमान करणारा होता. उलट २०१४ मध्ये पराभव झाल्यावरही स्मृती इराणी यांनी अमेठीत स्वत:ला गाडून घेतले आणि तेथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या मदतीला त्या धावल्या. परिणामी, २०१९ मध्ये मतदारांनी त्यांना निवडून दिले. त्यानंतरही इराणी यांनी अमेठीत आपला वावर आणि संपर्क कायम राखला.
 
रायबरेलीत राहुल गांधी यांचा पराभव अटळ आहे. कदाचित वायनाडमध्येही ते पराभूत होतील. उद्या चुकून रायबरेली व वायनाडमध्ये राहुल गांधी विजयी झालेच, तर ते कोणत्या मतदारसंघाची निवड करतील? अर्थातच वायनाडची! एकवेळ राहुल गांधी यांनी फक्त वायनाडमधून निवडणूक लढविली असती आणि जरी ते त्यात पराभूत झाले असते, तरी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल काही प्रमाणात विश्वास निर्माण झाला असता. पण, आता अखेरच्या क्षणी रायबरेलीतील उमेदवारी जाहीर केल्याने राहुल गांधी यांच्या हातून तेलही गेले, तूपही गेले आणि हाती फक्त धुपाटणे आले आहे!