अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर?

    03-May-2024
Total Views |

HW

 
ट्रम्प समर्थक रिपब्लिकन मतदार प्रांतांचा गट ‘रेड स्टेट्स’ आणि बायडन समर्थक डेमोक्रॅटिक मतदार प्रांतांचा गट ‘ब्ल्यू स्टेट्स’ या नावाने ओळखले जात आहेत. त्यावेळ सारखा सशस्त्र संघर्ष आता होण्याची शक्यता नसली तरी तीव्र राजकीय मतभेदांमुळे काही प्रांत सरकारे नक्कीच फुटून निघण्याचा विचार करु शकतील, असे राजकीय विचारवंतांना वाटते.

कॅलिफोर्निया आणि टेक्सास ही दोन राज्ये अमेरिकन संघराज्यातून बाहेर पडली आहेत. त्यांनी आपल्या एकत्रित सैन्याला ‘वेस्टर्न फोर्सेस’ असे नाव दिले आहे. हे सैन्य वेगाने संघराज्याची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.च्या रोखाने चाल करून निघाले आहे. वॉशिंग्टनमधल्या केंद्रीय शासनाने घटनात्मक तरतुदी बाजूला ठेवून तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदावर बसवलेला माणूस चांगला खंबीर आहे. त्याने अमेरिकन सेनाप्रमुखांना आदेश दिलाय की, हे बंड आणि हे आक्रमण कठोरपणे हाताळा. वाटल्यास नागरिकांवर देखील ड्रोन हल्ले चढवा नि हे बंड काबूत आणा!
 
आश्चर्याने थक्क होऊ नका किंवा घाबरून पण जाऊ नका. ही ताजी बातमी नसून ताज्या चित्रपटाचे कथानक आहे. अ‍ॅलेक्झ गारलंड या दिग्दर्शकाचा ‘सिव्हिल वॉर’ हा ताजा चित्रपट एप्रिलमध्ये अमेरिकेत सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा लेखकदेखील स्वत: गारलंडच आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका होणे अपेक्षित आहे. नोव्हेंबर २०२० मधल्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करुन निवडून आले होते, हे आपल्याला माहितच आहे. दि. ६ जानेवारी २०२१ या दिवशी जो बायडन यांनी ‘कॅपिटॉल’मध्ये म्हणजे अमेरिकन संसद भवनामध्ये राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी ट्रम्प समर्थक निदर्शकांनी ‘कॅपिटॉल’ इमारतीवर एकप्रकारे हल्लाच चढवून प्रचंड धुडगूस घातला होता. जो बायडन यांना शपथ घेताच येऊ नये, असा त्यांचा एकंदर प्रयत्न होता. तो सगळा अमेरिकन शिमगोत्सव आपण सर्वांनी दूरदर्शनवर लाईव्ह पाहिलाच असेल किंवा त्याबद्दल वाचले तरी नक्कीच असेल.
 
आता २०२४ची निवडणूक तोंडावर आली आहे. ट्रम्प यांना काय वाटेल ते करून पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हायचेच आहे. बायडन यांनी गेल्या तीन-सव्वा तीन वर्षांत कसलीही चमकदार कामगिरी करुन दाखवलेली नाही. ते ८१ वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृतीही यथातथा आहे. तरीही त्यांना पुन्हा राष्ट्रध्यक्ष व्हायचे आहे. देवळ मास्तरांच्या ‘संगीत शारदा’ नाटकातला खलनायक भुजंगनाथ हा ‘अवघे पाऊणशे वयमान, लग्ना अजुनि लहान’ असा असतो नि त्याला त्यांची नात शोभेल, असा शारदेशी लग्न करायचे असते. पण, नाटकाचे लेखक देवल मास्तर खंबीर असतात. ते वेळीच तरणाबांड नायक कोंदड याला पुढे आणतात. शारदेला योग्य वर मिळतो आणि शेवट गोड होतो. अमेरिकन लोकशाही संस्थांकडे सध्या कुणी देवल मास्तर (पक्षी : गोविंद बल्लाळ देवल) नाही म्हणजे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही बलाढ्य राजकीय प्रतिस्पर्धी पक्षांकडे अनुक्रमे बायडन आणि ट्रम्प यांच्याखेरीज कुणी तरणा, तगडा उमेदवारच नाही.
 
आणि त्यामुळेच तिथले राजकीय चिंतक, लेखक, कादंबरीकार, चित्रपट, दिग्दर्शक अशा सर्वांनाच अमेरिकन यादवी युद्धाच्या कालखंडाची आठवण होते आहे. आता मुळात हे यादवी युद्ध काय भानगड आहे, हे थोडक्यात बघूया. आज अमेरिका हे ५० राज्यांचे संयुक्त असे राष्ट्र आहे. पण, १७८९ साली जेव्हा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक झाली आणि जनरल जॉर्ज वॉशिंग्टन हा पहिला राष्ट्रध्यक्ष बनला, तेव्हा अमेरिकेत फक्त १३ राज्ये होती. पुढे क्रमश: आणखी राज्ये सामील होत जाऊन, १८६० साली म्हणजे पुढच्या सत्तर एक वर्षांमध्ये एकंदर राज्यांची संख्या ३३ झाली. या राज्यांमध्ये उत्तरेकडची आणि दक्षिणेकडची असा ठळक भेद निर्माण झाला. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये व्यापार, उद्योग, कारखानदारी जास्त होती, तर दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये हजारो एकर जमिनींवर पसरलेले मळे होते. या मळ्यांचे बागाईतदार मालक चांगलेच धनदांडगे होते. अमेरिका स्वतंत्र होण्याआधीपासूनच त्यांच्या मळ्यांवर आफ्रिकेतून पकडून आणलेले काळे लोक गुलाम म्हणून राबत होते. अमेरिकेतल्या लोकशाहीवादी विचारवंतांना आपल्या देशातील ही गुलामगिरीची प्रथा नष्ट करायची होती. हे विचारवंत मुख्यतः उत्तरेतले होते, तर दक्षिणेतल्या मळेवाल्यांचे म्हणणे असे होते की, गुलामगिरी नष्ट केल्यास आमच्या अफाट पसरलेल्या मळ्यांवर राबणार कोण?
 
या सामाजिक वादंगातच सन १८६० सालच्या अखेरीस निवडणूक झाली. रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार अब्राहम लिंकन जिंकला नि राष्ट्राध्यक्ष बनला. मार्च १८६१ मध्ये त्याने सूत्रे हाती घेतली. आता ते गुलामगिरी रद्द करणार असे दिसल्यावर दक्षिणी राज्यांनी ‘आम्ही संघराज्यातून बाहेर पडत आहोत,’ असे जाहीर केले आणि एप्रिल १८६१ मध्ये संघराज्यातील साऊथ कॅरोलिना या राज्यातील फोर्ट समट्र या लष्करी ठाण्यावर सरळ हल्लाच चढवला. हेच ते प्रसिद्ध अमेरिकन यादवी युद्ध!
 
दि. १२ एप्रिल १८६१ या दिवशी सुरू झालेले हे युद्ध दि. २६ मे १८६५ या दिवशी संपले. यात अखेर युनियनच्या सैन्याचा विजय झाला आणि ‘कॉन्फेडरसी’ म्हणजे दक्षिणी संस्थानांच्या सैन्याचा पराभव झाला. त्यांनी केलेली फुटून निघण्याची घोषणा रद्दबातल ठरली. दक्षिणी प्रांत अखंड अमेरिकेचेच प्रांत राहिले. अमेरिका अखंड अभंग राहिली. युद्ध चालू असतानाच ऐतिहासिक घोषणा केली. ‘एमॅनसिपेशन प्रोक्लमेशन’ म्हणजे मुक्तीची उद्घोषणा म्हणून ती आधुनिक मानवी इतिहासात प्रसिद्ध आहे.
 
असो. तर २०२० सालच्या ‘बायडन विरूद्ध ट्रम्प’ निवडणुकीपासून अनेकांना यादवी युद्धातल्या राजकीय आणि सामाजिक स्थितीची आठवण होते आहे. त्या काळच्या उत्तरी गट आणि दक्षिणी गटाप्रमाणे आता ट्रम्प समर्थक रिपब्लिकन मतदार प्रांतांचा गट ‘रेड स्टेट्स’ आणि बायडन समर्थक डेमोक्रॅटिक मतदार प्रांतांचा गट ‘ब्ल्यू स्टेट्स’ या नावाने ओळखले जात आहेत. त्यावेळ सारखा सशस्त्र संघर्ष आता होण्याची शक्यता नसली तरी तीव्र राजकीय मतभेदांमुळे काही प्रांत सरकारे नक्कीच फुटून निघण्याचा विचार करु शकतील, असे राजकीय विचारवंतांना वाटते. अशा दोन विचारवंतांची दोन गंभीर पुस्तके २०२२ सालीच बाजारात आली आहेत. बार्बारा वॉल्टर या बाईंचे ‘हाऊ सिव्हिल वॉर्स स्टार्ट’ आणि स्टीफन मार्श यांचे ‘द नेक्स्ट सिव्हिल वॉर’ ही ती पुस्तके. हे दोन्ही लेखक म्हणतात की, अमेरिकन लोकशाही व्यवस्था सध्या कमालीच्या नाजुक स्थितीत असून, लोकांचा शासन संस्थेवरचा विश्वास कधी नव्हे, इतका खालच्या पातळीवर गेला आहे.
 
अमेरिकेच्या प्रख्यात हार्वर्ड विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक फ्रेडटिक लॉजवॉल आणि ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातले इतिहासतज्ज्ञ अ‍ॅन्ड्रयू प्रेस्टन यांना वेगळ्या संदर्भात यादवी युद्ध आठवते. आहे. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा की, जेव्हा जेव्हा अमेरिका संकटात सापडते, तेव्हा यादवी युद्धाचे स्मरण तिला त्या संकटातून बाहेर काढते. १९३० साली अमेरिका महामंदीच्या तडाख्यात सापडली होती. तेव्हा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट याने समाजाला आठवण करुन दिली होती की, १८६१ ते १८६५ या काळात आपले पूर्वज याहीपेक्षा भीषण परिस्थितीला तोंड देऊन टिकून राहिले. आपणही तशीच हिंमत धरू आणि अमेरिका मंदीतून बाहेर पडली. १९६० साली गौरवर्णी आणि कृष्णवर्णी यांच्यातला सामाजिक तणाव कळसाला पोहोचला होता. तेव्हा कृष्णवर्णीयांचा नेता मार्टिन ल्यूथर किंग याने ‘आय हॅव अ ड्रीम’ या शब्दांनी प्रसिद्ध झालेले भाषण अब्राहम लिंकनच्या स्मारकाच्या पायर्‍यांवरून दिले होते आणि अमेरिका त्या सामाजिक फुटीरतेतून बाहेर पडली होती. लॉजवॉल आणि प्रेस्टन यांच्या मते, सन १८६५ नंतरची प्रत्येक अमेरिकन पिढी आपापल्या दृष्टीने यादवी युद्धाचा विचार करते, त्यावर चिंतन करते आणि त्यांना आपल्या वर्तमान अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो.
 
‘अमेरिकन यादवी युद्ध’ या विषयावर आत्तापर्यंत किमान ६० हजार पुस्तके लिहिली गेलेली आहेत. ‘द डेमन ऑफ अनरेस्ट’ हे एरिक लार्सन या लेखकाचे ताजे पुस्तक मार्च २०२४ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. यादवी युद्धाकडे समाज आणि राजकीय पक्ष कसकसे वाटचाल करीत गेले, याचे तारीखवार विश्लेषण करुन कार्लसन पुढे म्हणतो, “हा काही धूळभरला, जुनाट इतिहास नव्हे. लक्षात घ्या, २०२०च्या डिसेंबरमध्ये ट्रम्पसमर्थक जसे म्हणत होते की, डेमोक्रॅटिक पक्षाने विजय आमच्यापासून पळवून नेला आहे. अगदी तसेच १८६०च्या निवडणुकीत लिंकनच्या विरोधात उभे असलेल्या स्टीफन डग्लस- डेमोक्रॅ्रटिक, जॉन ब्रेकनरिज. सदर्न डेमोक्रॅट आणि जॉन बेल-युनियन, या पक्षाच्या समर्थकांचे म्हणणे होते. हे भांडण तीव्र होत अखेर फुटून निघण्याच्या आततायी निर्णय घेण्यापर्यंत पोहोचले. ही दीडशे वर्षांपूर्वीची कथा नाही, ही तर वर्तमान कथा आहे.”
 
जॉन मेशॅम या लेखकाने २०२२ साली ‘अ‍ॅण्ड देअर वॉज लाईट’ या नावाचे, तर २०२३च्या ऑक्टोबरमध्ये स्टीव्ह इन्सकीप या लेखकाने ‘डिफर वुई मस्ट’ या नावाचे, अशी अब्राहम लिंकनची चरित्रेच लिहिली आहेत. दोघांचेही म्हणणे असे की, वर्तमान खडतर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेला लिंकनसारख्या कणखर नेत्याची गरज आहे. अमेरिकेत किंवा एकंदरीत पश्चिमी देशांमध्ये असे गंभीर राजकीय, सामाजिक चिंतन करणारे विचारवंत आहेत, संस्था आहेत. त्यांची पुस्तके नियमित प्रसिद्ध होत असतात. लोक ती वाचत असतात. आपल्याकडे गंभीर राजकीय चिंतनात्मक लेखन याचा अर्थ, भारत देशाच्या अवनतीला हिंदू धर्म, हिंदू समाजाच्या श्रद्धा याच फक्त कशा कारणीभूत आहेत, हे हिंदूंचा पुन:पुन्हा अपमान करून ठासून मांडणे. त्यामुळे सर्वसामान्य हिंदू समाज असली चिंतनात्मक वगैरे पुस्तके वाचण्याच्या भानगडीतच पडत नाही. त्याने वाचलेच काही, तर तो कथा-कादंबर्‍या वाचतो. चित्रपट, नाटक आणि आता दूरदर्शन मालिका पाहतो.
 
मग, या करमणूकप्रधान साहित्य, वाड्.मय, नाटक, चित्रपट याद्वारे तरी कुणी समाजाचे प्रबोधन करू पाहतोय का? नाव नको. ‘सिंहासन’ ही अरुण साधूंची कादंबरी १९७५ सालची. लेखक स्वत: साम्यवादी असला तरी काँग्रेसी राजवटींनी लोकशाही व्यवस्थेची केलेली लक्तरे त्याने चांगलीच मांडली आहेत. पण, ती काहीच नव्हेत, अशा घटना नंतर घडल्या आहेत. १९७५चीच भीषण आणीबाणी, जनता पार्टी राजवट, १९७८चे शरद पवारांचे खंजीर खुपस पुलोद सरकार, १९८५ ते १९९२ पर्यंतचे अभूतपूर्व अयोध्या आंदोलन, अशा अमेरिकन यादवी युद्धापेक्षाही अत्यंत रोमांचक, अभ्यसनीय घटना आपल्याकडे आता-आता घडून गेल्या आहेत, आजही घडत आहेत. पण, त्यांच्यावर कथा, कादंबरी, नाटक, कविता काहीतरी लिहावे, असे कुणालाही वाटत नाही. दूरदर्शनवर येणारी प्रत्येक नवी मालिका पाहा. प्रेम आणि लग्न याखेरीज भारतातल्या लोकांना अन्य कोणत्याही समस्याच नाहीत, असेच एखाद्या परकीय माणसाला वाटावे. असो. तर ‘सिव्हिल वॉर’ या अ‍ॅलेक्स गारलंडच्या ताज्या चित्रपटात अखेर फुटीर सेना विजयी होते, असे दाखवले आहे. प्रत्यक्षात काय होते, ते आपण पाहूच!

- मल्हार कृष्ण गोखले