उत्खननात सापडले महाभारत काळातील अवशेष; पुरातत्व विभागाची सूचक प्रतिक्रिया

    03-May-2024
Total Views |

Jaipur

जयपूर :
डीग जिल्ह्यातील बहज गावात सुरू असलेल्या उत्खननात कुशाण काळापासून महाभारत (Mahabharat) काळापर्यंत पाच कालखंडातील संस्कृतींचे अवशेष सापडले आहेत. ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ब्रिज परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खननाचे काम करण्यात आले आहे. सापडलेले पुरावे अतिशय अनोखे असल्याचे सांगण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कंद पुराणात डीगला दुर्गपूर म्हटले आहे. मथुरेपासून डीगचे अंतर २५ मैल आहे. द्वापार काळापासून कुशाण, मौर्य, गुप्त आणि मुघल कालखंडापर्यंतच्या खुणा या भागात सापडल्या आहेत. कुशाण राजांची हुविष्क आणि वासुदेव यांचीही नाणी येथे सापडली आहेत. जयपूर पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनी काही महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर उत्खननाचा प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालकांकडे पाठवण्यात आला होता. १० जानेवारीपासून याभागात उत्खननाते काम सुरु आहे.

हे वाचलंत का? : श्रीरामपूरमध्ये धर्मांधांकडून पोलिसावर दगडफेक; दोन जण जखमी

उत्खननादरम्यान अडीच हजार वर्षे जुने यज्ञकुंड, धातूची अवजारे, नाणी, मौर्यकालीन मातृदेवतेच्या मूर्तीसह गुंगा काळातील अश्वनीकुमारांच्या मूर्तीचे फलक आणि हाडांपासून बनवलेली अवजारे सापडली आहेत. महाभारत काळातील मातीच्या भांड्यांचे तुकडे देखील सापडले असून ते जयपूर पुरातत्व विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.

एएसआयचे म्हणणे आहे की असे अवशेष आणि साधने भारतात आतापर्यंत कुठेही सापडलेली नाहीत. उत्खननात आतापर्यंत २५०० वर्षांहून अधिक जुने अवशेष सापडले आहेत. सध्या एएसआयकडून खोदकाम सुरू आहे. अंदाजानुसार, महाभारत काळापासूनही प्राचीन संस्कृतीचे अवशेष येथे दफन केले गेले असावेत. डीग म्युझियमच्या नंद भवनात गॅलरी बनवून महत्त्वाचे पुरातत्व अवशेष प्रदर्शित करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे.

पुरातत्व विभागाचे अधीक्षक विनय गुप्ता यांनी सांगितले की, उत्खननात साधारणपणे पांढऱ्या रंगाचे मणी आढळतात, मात्र या गावातील ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाचे मणी सापडले आहेत. हे फार दुर्मिळ आहेत. यातील बहुतेक मणी शुंग काळातील आहेत. उत्खननात अश्विनीकुमारांची प्राचीन मूर्ती सापडली आहे. येथील हवन कुंडातही काही नाणी सापडली आहेत.