IPO Update: टीबीओ टेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ येणार

८ ते १० मे पर्यंत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ उपलब्ध ,कंपनीकडून प्राईज बँड ८७५ ते ९२०रुपये निश्चित

    03-May-2024
Total Views |

TBO Tek
 
 
मुंबई: टीबीओ टेक लिमिटेड या ट्रॅव्हल एग्रीगेटर कंपनीने बाजारात आपला आयपीओ (IPO) आणायचे ठरवले आहे. मे ८ ते मे १० या कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी अँकर (Private) गुंतवणूकदारांकडून ७ मे रोजी बिडींग स्विकारणार आहे.किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी १६ समभाग (Shares) हे बिडींगसाठी उपलब्ध असतील. कंपनीकडून प्राईज बँड ८७५ ते ९२० रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे.
 
कंपनीने सांगितल्याप्रमाणे, या आयपीओत ४०० कोटींचे समभाग गुंतवणूकदारांना 'फ्रेश इश्यू' म्हणून उपलब्ध आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (OFS) साठी १२५०८,७९७ समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
 
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर आपल्या व्यासपीठाच्या विकासासाठी करणार आहे. ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्यासाठी तंत्रज्ञान विभागातील नवीन गुंतवणूकीत या निधीचा वापर करण्यात येणार आहे.ऑफर फॉर सेल मध्ये कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) गौरव भटनागर यांच्याकडील २०३३९४४ समभाग, मनिष धिंग्रा यांच्याकडे असलेले ५७२०५६ समभाग व एलएपी ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडकडे असणारे २६०६००० समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
 
एक्सिस कॅपिटल लिमिटेड, गोल्डमन सच इंडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, जेफ्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व जे एम फायनांशियल लिमिटेड या कंपन्या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.
 
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांच्यासाठी एकूण आयपीओतील ५ टक्के निधी गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIB) यामध्ये १५ टक्के निधी गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. १० टक्के वाटा किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असणार आहे.