संवादसेतू आयोजित कथा स्पर्धांचे निकाल जाहीर; १२ कथांचा डिजिटल कथासंग्रह प्रकाशित

    29-May-2024
Total Views |

samvad setu 
 
मुंबई : संवादसेतू दिवाळी अंक दरवर्षी कथा स्पर्धा आयोजित करत असतात. यावर्षी स्पर्धेला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहून अजून ६ पारितोषिके वितरित करण्यात आली. ऐकू १२ पारितोषिके यावर्षी जाहीर झाल्याने विजेत्या कथांचा एक कथासंग्रह प्रकाशित करून त्याची डिजिटल प्रत सुद्धा प्रकाशित करण्यात आली. दि. २९ मे रोजी निकाल जाहीर झाल्याचे संवादसेतूच्या संपादक वंदना बोकील कुलकर्णी युआननी सांगितले. स्पर्धेतील कथांचे परीक्षण लेखक, समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले. गांधार पारखी, सीमा मुसळे, सोमनाथ एखंडे, गणेश गोडसे, साई तांबे आणि प्राजक्ता शिंत्रे यांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत तर रोहिणी होरे, तानुकिर्ती देशपांडे,राहुल शिंदे, अभय वळसंगकर, रोहन पांडे आणि विवेक वैद्य यांना उतेजनार्थ पारितोषिके देण्यात आलेली आहेत.
 
निकालाबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, "आम्ही संवाद्सेतू या आमच्या दिवाळी अंकातर्फे गेली ४ वर्षे वासंतिक कथा स्पर्धेचे आयोजन करत आलो आहोत. घसघशीत पारितोषिकांच्या या स्पर्धेला देशातून आणि विदेशातून अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असतो. याही वर्षी महाराष्ट्रातील अनेक गावांतून, मोठ्या शहरांतून कथा आल्या. ग्वाल्हेर, चेन्नई, इंदोर, बडोदा,झारखंड, जमशेदपूर इत्यादी दूरदूरच्या ठिकाणांहून कथालेखकांनी भाग घेतला. काही जणांनी तर एकापेक्षा अधिक कथा पाठवल्या! विदेशातून मस्कत, दुबई, लंडन, न्यू जर्सी इत्यादी ठिकाणांहून कथा दाखल झाल्या. प्रतिसाद वाढता असला की आनंदाबरोबर जबाबदारीही वाढते. या वर्षी २०० पेक्षा अधिक कथा आल्या. त्यातून सहा सर्वोत्कृष्ट कथांना विविध ज्येष्ठ कथाकारांच्या नावाचे प्रत्येकी रू.५००० /- असे पारितोषिक जाहीर केले होते.पण हा भरभरून प्रतिसाद आणि स्पर्धेतील कथांची गुणवत्ता पाहता आणखी ६ विशेष लक्षवेधी कथा निवडून त्यांना प्रत्येकी रू. १००० चे रोख पारितोषिक देण्याचा निर्णय आम्ही आनंदाने घेतला. त्यानुसार आता एकूण १२ कथा आम्ही निवडल्या आहेत. शिवाय स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कथा वाचण्याची अनेकांनी उत्सुकता दाखवली म्हणून त्या १२ कथांचा एक डिजीटल अंक ही आम्ही कालच प्रकाशित केला आहे. हा अंक pdf स्वरूपात विनामूल्य स्वरूपात उपलब्ध केला आहे."