मुंबई : उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३ दिवसात बिनाशर्त माफी मागण्यास आपल्या वकीलामार्फत सांगितले आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असे सांगितले आहे. ज्यात मानहानी, अब्रुनुकसानीचा फौजदारी, दिवाणी खटला दाखल करण्यात येईल. सामना या वृत्तपत्रातून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जाणूनबूजून प्रतिमेस धक्का लागेल असे विधान केले होते. त्यामुळेच राऊतांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत शिदेंनी अफाट पैशाचा वापर केला. प्रत्येक मतदारसंघात शिदेंनी किमान २५-३० कोटी रुपये वाटले. मतदारसंघातील उमेदवार पाडण्यास वेगळे बजेट होते. तसेच अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले, असा खळबळजनक दावा संजय राऊतांना सामनाच्या रोखठोक सदरातून केला होता. दि. २६ मे २०२४ रोजी सामनाच्या रोखठोक ह्या सदरात राऊतांना हा दावा केला होता. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत ही अशाच प्रकारचा दावा राऊतांनी केला होता. लेखात लिहल्याप्रमाणे, "नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी, शाह, फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरी यांचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतर फडणवीस हे नाईलाजाने प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनी पुरवली, असे संघाचे लोक नागपूरात उघडपणे बोलताना दिसत आहेत", असे ही राऊत म्हणाले होते.