मुंबई: जूनमध्ये होणारी ओपेकची बैठक लक्षात घेता क्रूड (कच्च्या) तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारातील कच्च्या तेलाच्या उत्पादन व पुरवण्यात घसरण होत असताना तेलाचे भाव अधिक महाग होऊ शकतात. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या भारताच्या सर्वात मोठ्या रिफायनरी कॉम्प्लेक्सने रशिया सोबत 'डील' केलेले आहे.
मध्यपूर्वेतील तेल घेण्यासाठी युएस व पाश्चिमात्य देशांची मदत घेण्यापेक्षा आता रिलायन्स रशियाकडून तेल स्वस्तात विकत घेणार असल्याचे समजते आहे. यासाठी रिलायन्सने रशियाच्या रोजनेफट (Roseft) बरोबर १ वर्षांचा करार करून ३ दशलक्ष बॅरेल तेल विकत घेणार आहे. पाश्चिमात्य देशातील युरोप व अमेरिकेशी व्यापार करण्यापेक्षा भारत व रशियाने एकमेकांसोबत कराराला प्राधान्य द्यायचे ठरवले असल्याने तेलाची ही नवी भागीदारी रशिया व भारताची असणार आहे.
एकीकडे ओपेक देश तेलाची किंमत वाढवण्याची शक्यता असताना रशियाकडून भारताला स्वस्तात तेल मिळू शकते. ओपेक राष्ट्र आगामी २ जूनच्या बैठकीत तेलाच्या दरावर खलबत सुरू करण्याची शक्यता आहे.भारताने यापूर्वी रशियाशी व्यवहार करताना रुपये, दिराम, युआन या चलनात व्यवहार केला होता.
या करारावर स्पष्टता देताना, 'Rosneft तेल कंपनीसाठी भारत हा एक धोरणात्मक भागीदार आहे,' रशियन कंपनीने प्रसारमाध्यमांचा प्रश्नांना ईमेल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, ती भागीदारांसोबतच्या गोपनीय करारांवर भाष्य करत नाही. तसेच 'भारतीय कंपन्यांसोबतच्या सहकार्यामध्ये उत्पादन, तेल शुद्धीकरण आणि तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या व्यापारातील प्रकल्पांचा समावेश आहे.' असे म्हटले आहे. रिलायन्सने या कराराबाबत अजून भाष्य केलेले नाही.