नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्य याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायलयाने नकार दिला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या नकारानंतर मुख्यमंत्री केजरीवालांच्या अंतरिम जामीनास मुदतवाढ देण्याच्या अर्जावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी प्रकृतिच्या कारणास्तव ७ दिवसांचा जामीन मागितला आहे. या याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार देत सरन्यायाधीश याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध करावी की नाही यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. सदर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या जे के माहेश्वरी आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला.
दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवालांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अंतरिम जामीनास मुदतवाढ देण्यास दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली. सदर याचिका दाखल करताना वकील सिंघवी म्हणाले की, सदर जामीन अटींचा भंग नसून निव्वळ मागणी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना ०१ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आता केजरीवालांना दि. ०८ जून २०२४ पर्यंत वाढवण्याची मागणी याचिकेमार्फत करण्यात आली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, एका आठवड्यात त्यांची काही वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे, त्यासाठी त्यांना या वाढीव जामिनाची गरज आहे. AAP ने सांगितले की डॉक्टरांनी केजरीवाल यांना गंभीर वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे, त्यांना त्यांच्या संपूर्ण शरीराचे पीईटी स्कॅन करण्यास सांगितले आहे. या कारणास्तव अरविंद केजरीवाल यांना एका आठवड्याच्या अतिरिक्त जामिनाची गरज आहे.