गोखले पुलाची जोडणी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार !

28 May 2024 12:05:22

gokhale

मुंबई, दि.२८:  अंधेरी पूर्व-पश्चिमेचा महत्वाचा दुवा असलेला गोपाळकृष्ण गोखले पुलाची उंची ही पश्चिमेला सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी जोडण्याचे काम वेगाने आणि ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सुरु आहे. हे काम वेळापत्रकानुसार दि.३० जूनपर्यंत पूर्ण होणार असा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. बर्फीवाला पूल हा गोखले पुलाच्या उंचीसोबत जोडण्याच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली कामे प्रगतिपथावर आहेत. अस्तित्वात असलेल्या सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उंचावून ती नवीन बांधलेल्या गोखले पुलाच्या पातळीला जोडण्याचे काम दि.१४ एप्रिल पासून सुरू करण्यात आले आहे.

सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) तसेच वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांचेद्वारे आरेखित केला गेला. ही कार्यपद्धती वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांचेद्वारे बनवण्यात आली. तर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई यांनी या कार्यपद्धतीची पडताळणी करुन त्यात काही सुधारणा सुचवल्या. आता या सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी ही मुंबई महानगरपालिकेमार्फत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांच्या निरीक्षणाखाली करण्यात येत आहे.

पुढील कामांना वेग

सी. डी. बर्फीवाला पुलाच्या शेवटच्या दोन तुळई (गर्डर) म्हणजेच पी ९ ते पी १० आणि पी १० ते पी ११ हे वेगळे करणे. ही तुळई वेगळी करण्यासाठी पीलर - पी ९ आणि पीलर - पी १० येथील आर. सी. सी. जॉईंट नियंत्रित पद्धतीने व पुलाच्या संरचनेला कोणताही धोका न पोहोचवता तोडणे. गर्डर पी ९ ते पी १० तसेच पी १० ते पी ११ हे समक्रमित प्रणाली द्वारे उचलणे व गोखले पुलाच्या पातळीशी जुळवणे. गोखले पुलाशी सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी जुळाल्यानंतर तोडलेले जॉइंट पुनश्च एकदा काँक्रिटींग करणे. नवीन बिअरिंग व जोडणी सांधे (एक्स्पांशन जॉइंट) बसविणे.

कामांची प्रगती

बर्फीवाला पुलाची पातळी ही पीलर पी १० येथे सुमारे ७५० मिलीमीटर इतकी उचलण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार ही पातळी जुळवण्याचे काम सद्यस्थितीला पूर्ण झाले आहे. तसेच, पीलर पी-११ येथे सुमारे १,३५० मिलीमीटर इतकी पातळी उचलण्याचे प्रस्तावित होते. त्यापैकी सुमारे १,२५० मिलीमीटर इतके उचलण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १०० मिलीमीटर पातळी उचलण्याचे काम येत्या २ ते ३ दिवसात पीलर ११ येथे जुळवण्याचे नियोजित आहे.नवीन बिअरिंगसाठी कार्यादेश देवून त्या आणण्यात आल्या. नवीन बिअरींगची चाचणी सोमवार, दि. २७ मे पर्यंत पूर्ण झाली आहे. हे नवीन बिअरींग प्रकल्पस्थळी तत्काळ आणण्यात येतील. उर्वरीत काम म्हणजे पी ९, पी १० आणि पी ११ येथील आर. सी. सी. काँक्रिट करणे, नवीन बिअरिंग बसविणे हे काम दिनांक ५ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. काँक्रिटच्या क्युरिंगनंतर सदर काम पूर्णत्वास जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
Powered By Sangraha 9.0