ससूनच्या कामाची श्वेतपत्रिका काढा : सुप्रिया सुळे

28 May 2024 13:24:06

Supriya Sule 
 
मुंबई : गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे. पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याने दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. तसेच याआधीही ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससून रुग्णालय चर्चेत आले होते. त्यामुळे रुग्णालयाच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सुळेंनी केली आहे.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतू, गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. तर आता कल्याणीनगर 'हिट ॲन्ड रन' प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटकदेखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे."
 
हे वाचलंत का? -  शरद पवारांवर तटकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले, "धर्म आणि समाजात..."
 
"वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. कोरोना काळातदेखील इथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते. शिवाय अनेक नामांकित डॉक्टर इथून शिकून गेले आहेत. परंतू, गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावरदेखील शंका घेतली जात आहे," असे त्या म्हणाल्या.
 
 
 
त्या पुढे म्हणाल्या की, "काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिलं जाणं योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0