'अरे हाय काय अन् नाय काय'... माधव परत येतोय १५ वर्षांनी

28 May 2024 10:58:54
'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा १५ जूनला शुभारंभ
 

prashant 
 
मुंबई : ‘अरे हाय काय अन् नाय काय'... असे म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव आठवतो का? रसिकांना हास्याची मेजवानी देणारा माधव मध्यंतरी रंगभूमीवरुन दिसेनासा झाला होता. पण आता पुन्हा माधव रंगभूमीवर येणार असून रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे.
 
यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना प्रशांत दामले म्हणाले की, “गेला माधव कुणीकडे या नाटकाचे सलग आम्ही १८०२ प्रयोग केले होते. पण २००५ साली नाटकाचे प्रयोग बंद झाले. पण आता पुन्हा हे नाटक आम्ही घेऊन आलो आहोत. हे नाटक माझ्यासाठी विशेष आहे कारण माझ्या नाट्यसृष्टीच्या कारकिर्दीत हे पहिलं सुपरहिट ठरलेलं नाटक होतं आणि विशेष म्हणजे मी या नाटकामुळे माझी नोकरी देखील सोडली होती. आणि ६३ चं प्रयोग करण्यामागचं कारण ६३ हे माझं वय असल्यामुळे गेला माधव कुणीकडे या नाटकाचे ६३ प्रयोग करणार आहोत.” निखळ विनोद सातत्याने करत राहणं फार कठीण असल्यामुळे आजच्या पिढीपर्यंत जुनी नाटकं पोहोचावी हा मानस असल्याचे देखील प्रशांत दामले म्हणाले.
 
'गेला माधव कुणीकडे' या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने 'ब्रेक' घेतला होता खरा पण रसिक प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४.००वा. होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’अॅप वर सुरु होईल.
 
वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाच्या पुन:प्रत्ययाचा आनंद फक्त ६३ प्रयोगांमध्येच अनुभवण्यास मिळणार आहे. या नाटकात प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.
Powered By Sangraha 9.0