पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथील लॉ कॉलेजमध्ये २२ वर्षीय हर्ष राजची हत्या करण्यात आली. दि. २७ मे २०२४ रोजी हल्लेखोर मास्क घालून आले होते. त्यांनी हर्ष राजला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात हर्ष राजचा मृत्यू झाला. हल्लखोरांची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. हर्ष राज पाटणा येथील बीएन कॉलेजमध्ये बीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. विधी महाविद्यालयात त्यांचे परीक्षा केंद्र होते.
परीक्षा देऊन बाहेर येताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हर्ष हा मूळचा बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील माझौली गावचा रहिवासी होता. त्यांचे वडील व्यवसायाने पत्रकार आहेत. हर्ष स्वत: सामाजिकदृष्ट्या सक्रिय होता. त्यांनी लोकनायक युवा परिषद नावाची संस्थाही चालवली. काही दिवसांपूर्वी तो समस्तीपूरमध्येही प्रचार करत होता.
येथील एनडीएच्या उमेदवार शांभवी चौधरी त्यांना आपला भाऊ मानत होत्या. या त्याच शांभवी चौधरी आहे, ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरभंगा येथील सभेला संबोधित करताना आपली मुलगी असे वर्णन केले होते. रिपोर्टनुसार, दि. २५ मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर हर्ष पटनाला परतला. पाटणा युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियनची निवडणूक लढवण्याची तयारीही त्यांनी केली होती. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाटणा विद्यापीठ २८ मे रोजी बंद राहणार आहे.
हर्षच्या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही रिपोर्ट्सनुसार कॉलेजमध्ये काही काळापूर्वी दांडिया नाइट्सचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आयोजक हर्ष होता. यावरून त्याचा विद्यार्थ्यांच्या एका गटाशी वाद सुरू होता. त्याच्या हत्येत लॉ कॉलेज आणि पटेल हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लॉ कॉलेजच्या गेटबाहेर हल्लेखोर हर्षची वाट पाहत होते, असे सांगण्यात येत आहे.
परीक्षा देऊन तो बाहेर येताच त्याच्या बुलेटवर बसला, त्याचवेळी डझनभर मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला लाठ्या, रॉड आणि विटांनी जबर मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला पीएमसीएचमध्ये नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचला नाही. त्याच्या हत्येनंतर विद्यापीठातील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या मदतीने पोलिस हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.